Monday, July 19, 2010

'मुंबै'च्या तिजोरीवर मतांचा 'बॅलन्स'?

म टा च्या सौजन्याने


सहकारी चळवळ आणि राजकारण याचा जवळचा संबंध असल्यानेच मुंबै बँकेकडून उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या ५०० कोटी रुपयांतून मराठी तरुणांना स्टॉल्स देण्याच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या योजनेवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईतील नेते नाराज झाले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर केलेली ही घोषणा आपले खाते साफ करणारी आणि मनसेचा मतांचा बॅलन्स वाढविणारी ठरण्याची भीती दोन्ही काँग्रेसला वाटत आहे.

मुंबै बँकेच्या अध्यक्षपदी मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांची अलीकडेच निवड झाली. सहकार क्षेत्रातील ही अग्रगण्य बँक मनसेच्या ताब्यात येताच त्या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांची भेट घेऊन मुंबईत २५ हजार स्टॉल्ससाठी जागा देण्याची मागणी केली. मुंबै बँक मराठी तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी अल्प व्याजदरात ५०० कोटी रुपये उपलब्ध करून देणार असल्याचे राज यांनी सांगितले. मुंबै बँकेवर सर्व पक्षांची मंडळी असल्याने यामध्ये कुणीही राजकारण पाहू नये, असेही राज म्हणाले.

बेरोजगारांसाठी प्रथमच योजना

मुंबै बँकेचे अध्यक्षपद मनसेचे आमदार प्रवीण दरेकर यांच्याकडे असले तरी बँकेचे नऊ संचालक राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. काँग्रेसचे तीन संचालक असून शिवसेना व भाजपचा प्रत्येकी एक संचालक आहे. वर्षानुवषेर् बँकेवर दोन्ही काँग्रेसचा कब्जा असताना मुंबै बँकेने बेरोजगारांसाठी एवढी मोठी रक्कम उपलब्ध करून दिली नाही. आताच मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही योजना राबवली तर त्याचा लाभ मनसेला किती होईल व दोन्ही काँग्रेसला किती होईल याबद्दल काँग्रेस वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीशी चर्चा करू

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार कृपाशंकर सिंह म्हणाले की, मराठी तरुणांना स्टॉल्स देण्याची मनसेची मागणी वाचल्यावर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबै बँकेवर वरचष्मा आहे. हा पक्ष राज्यात काँग्रेसबरोबर सत्तेत आहे. अशावेळी मुंबई महापालिका निवडणुकीत कोणती भूमिका घ्यायची हे ठरणे गरजेचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री लवकरच याबाबत बैठक बोलावून राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

अधिक बारकाईने लक्ष

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद वर्मा म्हणाले की, सहकार चळवळीत पक्ष नसतो. मुंबै बँकेवर मनसेचे काही लोक निवडून आले आहेत. मात्र तरीही राज ठाकरे यांनी केलेली मागणी आम्ही दुर्लक्षित केलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष या नात्याने प्रत्येक वॉर्डमध्ये पक्षबांधणीचे काम करीत असताना अशा मागणीकडे अधिक बारकाईने लक्ष दिले जाईल.

No comments:

Post a Comment