म टा मध्ये संजय झेंडे नि लिहिलेला एक चांगला लेख वाचला .... सादर करीत आहे तुमच्या साठी
हा लेख खालील लिंक वर देखील मिळू शकेल
खरोखरच काही वेळेला सामान्य लोक किती असामान्य काम करून जातात हेच चैत्राम पवार ह्यांनी दाखवून दिले आहे. अर्थात त्यांना सामान्य म्हणायच का हा प्रश्नच आहे. पुढील वेळी धुळ्याला गेलो कि नक्की जाईन बारीपाडयाला
म टा च्या सौजन्याने
बारीपाडा. २० वर्षांपूर्वी ते एक ओसाड गाव होतं. आज मात्र ते आदर्श गाव ठरलं आहे. हे कसं झालं, त्याचाच वेध...
धुळे जिल्ह्यातील बारीपाडा हे ७५० लोकवस्तीचे आदिवासी गाव सध्या आधुनिक पर्यटनस्थळ म्हणून आकारास येत आहे. महिन्यात साधारणपणे १०० ते १५० पाहुणे या गावात येतात. यामध्ये देशातील निरनिराळ्या प्रांतांबरोबरच परदेशातून येणाऱ्या नागरिकांचाही समावेश असतो. लवकरच या ठिकाणी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील भेट देणार आहेत. अर्थात बारीपाडा हे काही सातपुड्यातील तोरणमाळसारखे थंड हवेचे ठिकाण नाही किंवा त्याठिकाणी एखादे प्राचीन शिल्प अथवा मंदिरही नाही. तरीदेखील बारीपाड्यास भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवसे वाढते आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बारीपाडा हे आदर्श खेड्याचे एक मॉडेल आहे.
सन १९९१मध्ये कुऱ्हाडबंदीचा कायदा बारीपाड्यात कठोरपणे अमलात आणण्यास सुरुवात झाली. त्यामुळे परिसरातील ११०० हेक्टरवरील जंगल अबाधित राखणे शक्य झाले. या मूलभूत प्रयोगामुळेच बारीपाड्याची वाटचाल आज स्वयंपूर्ण खेड्याच्या दिशेने सुरू आहे. जंगल आणि जल संवर्धनासाठी लोकसहभागतून राबविण्यात आलेले विविध प्रयोग, पाण्याच्या पातळीत झालेली वाढ त्याअनुषंगाने शेतीत झालेले परिवर्तन, ग्रामस्थांच्या राहणीमानात झालेले बदल आणि गावात शिक्षण, आरोग्य आणि ऊर्जा याविषयी निर्माण झालेली जागरुकता या एकाच ठिकाणी अभावानेच आढळणाऱ्या बाबी पाहण्यासाठी बारीपाड्यामध्ये वर्दळ वाढते आहे. वाढलेली वर्दळ कॅश करण्याची संधी बारीपाड्यातील बचत गटांनी घेतली आहे. येणाऱ्या पाहुण्यांसाठी जेवण बनविणे, बारीपाड्याच्या गुऱ्हाळात तयार होणारा पौष्टिक गुळ तसेच बासमतीच्या पंक्तीत बसणारा बारीपाड्याची नवी ओळख झालेला तांदूळ पॅकिंग करून विकणे हा नवीन उद्योग पाहुण्यांच्या वाढत्या संख्येमुळे भरभराटीस येत आहे. बारीपाड्यातील अनेक वस्तूंनी आठवडे बाजाराची कक्षा ओलांडून मोठ्या शहरांमधील सुपरशॉपीमध्ये स्थान मिळविले आहे. गेल्या वषीर् नऊ टन सेंदीय तांदूळ विकण्यात आला.
धुळे शहरापासून सुमारे १०० किमी अंतरावर साक्री तालुक्यातील पिंपळनेरपासून २५ किमीवर बारीपाडा आहे. बारीपाड्यास स्वतंत्र ग्रामपंचायत नाही. मांजरी ग्रामपंचायतीच्या पाच पाड्यांपैकी एक पाडा असे सध्या बारीपाड्याचे शासन दरबारी अस्तित्व आहे. नैऋत्येकडे गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यातील आहवा तालुक्याची सीमा तर दक्षिणेस नाशिक जिल्हा. जवळच असलेल्या शेंदवड-मांजरी डोंगरात धुळे जिल्ह्याची जीवारेखा असलेल्या पांझरा नदीचे उगमस्थान. या निसर्गरम्य परिसरात असलेलं बारीपाडा.२० वर्षांपूवीर् एक ओसाड गाव होतं. सर्रास वृक्षतोडीमुळे जलचक्र बिघडलेलं. पाण्याची पातळी खालावलेली आणि पावसावर अवलंबून असलेली शेती पाण्याअभावी विस्कळित झालेली. गावातील राबणारे हात रोजीरोटीच्या शोधात बाहेर पडलेले. व्यसनाधिनता, कौटुंबिक कलह आणि जन्मोजन्मीचे दारिद्य. या दुष्टच्रकातून गावाला बाहेर काढायचं कसं हा मनाला घोर लावणारा प्रश्न एम.कॉम.पर्यंतचं शिक्षण घेऊन गावात परतलेल्या चैत्राम देवचंद पवार या तरुणास अस्वस्थ करीत असे. साक्री तालुक्यातील मालपूर-कासारे गावात पाहिलेल्या वृक्ष पालखी सोहळ्यातून प्रेरणा घेऊन चैत्रामने कुऱ्हाडबंदीचा कायदा ग्रामस्थांसाठी अमलात आणण्याचा निर्धार केला. जंगल तोडणाऱ्यास दंड असा नियम झाला. त्यामुळे अनेक समस्या, अडचणी, भांडणे असे टप्पे पार करीत या कायद्यामुळे जंगलतोडीवर निर्बंध आले. त्याच बरोबरीने दरवषीर् सामूहिकपणे वृक्षलागवडीचे प्रयोग होऊ लागले. पिंपळनेर परिसरातील वार्सा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आदिवासींसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्याचं पूर्णवेळ काम करणाऱ्या डॉ.आनंद फाटक यांची चैत्राम आणि सवगंड्यांची भेट झाली; संवाद वाढला आणि बारीपाड्याच्या उत्थानाचे नवे पर्व सुरू झाले. डॉ. फाटक यांनी बारीपाड्यातील उत्साही तरुणांची सहल राळेगणसिद्धी, पाबल (जि.नगर) येथे नेली. तेथील प्रयोगांची पाहणी करण्यात आली. अण्णा हजारेंशी चर्चा झाली. तेव्हापासून बारीपाडा ग्रामविकास संकल्पनांची अंमलबजावणी करणारी प्रयोगशाळाच ठरली. जनसेवा फाउंडेशन, वनवासी कल्याण आश्रम या संस्थांची जोड मिळाली.
कुऱ्हाडबंदीचे सकारात्मक परिणाम तीन-चार वर्षांत दिसू लागले. जंगल सांभाळल्यामुळे पाणी अडविले गेले, जमिनीची धूप थांबली. ग्रामस्थांनी सुमारे ३५० दगडी बांध बांधले, पांझर तलावाची ऊंची वाढविली. त्यामुळे पाण्याची पातळी वाढली. बारीपाड्याच्या ग्रामस्थांना तीन किमी अंतरावरून पाणी आणावे लागत असे. आज परिसरातील पाच पाड्यांचा पाणीपुरवठा बारीपाड्यातून होतो. स्वत:ची शेती पाण्याअभावी विस्कळित झाल्याने बाहेरगावी मजुरीसाठी जाणारा शेतकरी बारीपाड्यात थांबू लागला. तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या परंपरागत पिकांबरोबरच ऊस, कांदा, बटाटा, लसूण, सोयाबीनसारख्या नगदी पिकांचे उत्पादन शेतकरी घेऊ लागला. स्थलांतराचे प्रमाण घटले. परिसरातील पाड्यांमधील मजूर मजुरीसाठी पाड्यास येऊ लागले. विविध बचत गट, समित्यांमार्फत आरोग्य, शिक्षण, ऊर्जाविषयक जागृती यावर भर देण्यात आला. कुपोषणाचे प्रमाण घटले, वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व पटले. पाल्यांना किमान चवथीपर्यंत शिकवावे अन्यथा दंड भरावा, शाळेत नियमित न येणाऱ्या शिक्षकांचीही दंडापासून सुटका झाली नाही. विजेच्या तारांवर आकडे टाकणाऱ्यांचे मन वळविण्यात आले. मीटरसाठी आग्रह करण्यात आला. गोबर गॅस प्लॅन्ट, शोष खड्यांच्या निर्मितीमुळे गटार विरहित गाव या विविध प्रयोगांमुळे बारीपाडा चचेर्त आले. अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरले. परदेशात कौतुक झाले.
ऑस्ट्रेलियातून आलेल्या शैलेश शुक्ला या तरुणाने आपला पीएच.डी. प्रबंध बारीपाडा केंदबिंदू ठेवून लिहिला. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी वास्तव्य केले. अनेक मान्यवर, जलतज्ज्ञ बारीपाड्यात येऊन गेले. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा, मार्गदर्शक सूचनांचा लाभ बारीपाड्यने करून घेतला. त्याचाच एक भाग म्हणजे बारीपाड्याच्या जंगलात पिकणाऱ्या नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या वनभाज्यांचे प्रदर्शन भरविण्याचा प्रयोग सुरू झाला. दरवषीर् ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये वनभाज्यांचे प्रदर्शन भरते. गेल्यावषीर् आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनात विविध ७० वनभाज्यांपासून ६८५ प्रकारच्या चविष्ट भाज्या तयार करण्यात आल्या. या प्रयोगातनूच पुढे दुर्मिळ वनौषधींच्या संवर्धनाचा विषय समोर आला. परिसरातील वैदंूचे संमेलन आयोजित करण्याचा परिपाठ सुरू झाला. त्यांच्या परंपरागत ज्ञानाचा लाभ करून घेत वनऔषधींचा दस्तावेज तयार करण्याचा उपक्रम सुरू आहे. वनौषधींचे पृथ:करण व अधिक संशोधन यासाठी काही संस्थांची मदत घेण्यात येत आहे. मधुमक्षिका पालन, महू फुलांपासून तेल काढणे इत्यादी उत्पन्नाच्या साधनांची जोड मिळाल्याने गावातील बचत गट समृद्ध झाले. बारीपाड्यास भेट देणारा प्रत्येकजण गुरू असतो, या भावनेने पाहुण्यांकडे पाहणाऱ्या चैत्राम पवारच्या बारीपाड्यास जिज्ञासूंनी एकदा भेट देण्याची, सन २०२०मध्ये अपेक्षित समर्थ भारतातील एक समर्थ खेडे प्रत्यक्ष पाहण्याची संधी घ्यावी आणि ग्रामस्थांना कौतुकाची थाप देण्यास हरकत नाही.