Wednesday, April 14, 2010

अंबरनाथमध्ये मनसेची सत्त्वपरीक्षा ; बदलापुरात म्हात्रेंची अडचण

लोकसत्ता च्या सौजन्याने


ठाणे/प्रतिनिधी ,बुधवार, १४ एप्रिल २०१०
अंबरनाथ आणि बदलापूरच्या नगरपालिका निवडणुका अखेर पार पडल्या. आता साऱ्यांचे लक्ष १० मे रोजी होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे लागले आहे. अंबरनाथला कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने मनसे, तसेच अपक्षांची भूमिका पालिकेवर कुणाचा झेंडा फडकणार हे ठरविणार आहे. बदलापूरमध्ये ३४ जागांपैकी शिवसेना - १२, भाजप- सात यांचे संख्याबळ १९ होते, तर राष्ट्रवादी काँग्रेस - १०, काँग्रेस - एक, मनसे - तीन आणि अपक्ष - एक असे मिळून १५ संख्याबळ होते. या आकडेवारीमुळे बदलापुरात पुन्हा युतीची सत्ता येणार हे वरवर निश्चित दिसत असले तरी तिथे वामन म्हात्रेंना नगराध्यक्षपद देण्यास या दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांचा विरोध आहे. या मुद्दय़ावर युतीची गणिते बिघडली तर राष्ट्रवादी (१०) भाजप (७) आणि कॉंग्रेस तसेच अपक्ष प्रत्येकी एक असेही एक एकोणीसचे गणित येथील राजकीय वर्तुळात मांडले जात आहे. युतीच्या सत्तेत आपण नगराध्यक्षपदाचे दावेदार असणार का, या प्रश्नावर वामन म्हात्रे यांनी मात्र पक्ष देईल तो आदेश प्रमाण मानू असे ‘वृत्तान्त'शी बोलताना सांगितले, तर नगराध्यक्ष राम पातकर यांनी युतीशिवाय सत्तेसाठी मांडल्या जाणाऱ्या वेगळ्या समीकरणाची शक्यता स्पष्टपणे नाकारली.
अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी (९), रिपाइं (८), कॉंग्रेस (३) असे २० नगरसेवकांचे संख्याबळ आहे. त्यांना बहुमतासाठी सहा इतर नगरसेवकांचे समर्थन आवश्यक आहे. आठ अपक्ष नगरसेवक निवडून आले असले तरी त्यातील चार नगरसेवक शिवसेना समर्थक आहेत. येथे मनसेची भूमिका निर्णायक मानली जात असली तरी त्यांची अवस्था ‘इकडे आड तिकडे विहीर' अशीच आहे. कारण युती अथवा आघाडी कोणत्याही एकास पाठिंबा देणे त्यांच्यासाठी पुढे होऊ घातलेल्या कल्याण-डोंबिवली तसेच मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकीला सामोरे जाताना गैरसोयीचे ठरणारे आहे. हा पुढील राजकीय प्रवास विचारात घेऊन मनसे तटस्थ राहिली तर येथील सत्तेचा पेच अधिकच बिकट होईल. भाजपचे एक मत मिळाले तरीही सेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी नऊ मतांची आवश्यकता लागणार आहे आणि सर्वच अपक्षांचा पाठिंबा गृहीत धरला तरी त्यांना एक मत कमी पडत आहे. अशा परिस्थितीत येथे नगराध्यक्षपद तसेच सत्तेसाठी मोठय़ा प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. येथे राष्ट्रवादीचे विद्यमान शहराध्यक्ष सदा पाटील नगराध्यक्षपदाचे दावेदार मानले जातात. थोडक्यात, युती आणि आघाडीच्या रस्सीखेचीत मनसेला सत्वपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. मनसेच्या मतविभाजनाचा कॉंग्रेस आघाडीला फायदा होतो, असा आरोप वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीपासून शिवसेना करीत आली आहे.
लोकसभा तसेच सहा महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील आकडेवारी त्यासाठी उदाहरणादाखल दिली जाते. आता प्रत्यक्ष वेळ आल्यावर राज ठाकरे कोणता निर्णय घेतात, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे

No comments:

Post a Comment