सकाळ मधे सकाळीच एक सुंदर लेख वाचला तोच तुमच्या साठी सादर करीत आहे ......
हा लेख खालील लिंक वर देखिल मिळू शकेल
http://epaper.esakal.com/esakal/20100307/5133767082025601382.htm
सकाळ च्या सौजन्याने
।। मॉं तुझे सलाम ।।
डॉ. श्री बालाजी तांबे
Sunday, March 07, 2010 AT 12:00 AM (IST)
स्त्री आणि पुरुष यांच्यात केवळ शरीरभेद नाही। स्त्री अधिक संवेदनशील, श्रद्धावान आहे; तिला देवत्वाचे अस्तित्व अधिक जाणवते. पुरुषाचे लक्ष मात्र भौतिकतेकडे; जडत्वावर अधिकार गाजविण्याकडे अधिक असते...
भारतीय तत्त्वज्ञानानुसार, अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर) व समृद्धी देणारी लक्ष्मी, दुसऱ्या टोकाला शक्ती देणारी व संरक्षण करणारी महाकाली दुर्गा आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदूमध्ये ज्ञानसंकल्पना देणारी महासरस्वती असते। अशा प्रकारे या तीन शक्तींना महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती असे स्थान दिलेले आहे. पूजा जरी पुरुषदैवताची केली जात असली तरी चर्चा होते ती त्याच्या शक्तीची, त्याच्या असलेल्या स्त्रीशक्तीची, हेही आपल्याला लक्षात ठेवावे लागेल.
"मातृदेवो भव'... स्त्रीला माता म्हणून संबोधित करताना तिला स्वतःचेच अपत्य असणे अभिप्रेत नसावे। स्त्रीची सर्जनशीलता, संस्कार, प्रेरणा देण्याची क्षमता, सर्वांकडे हृदयभावाने पाहून दिलेले प्रेम व कर्तृत्व यामुळे ती जननी वा जगज्जननी म्हणून ओळखली जाते.
स्त्रीचे महत्त्व समजून घ्यायचे असेल तर विश्वेश्वरीची प्रार्थना या ठिकाणी दिलेली आहे ती लक्षात घ्यायला हवी। या प्रार्थनेवरून अनादिकाळापासून भारतीयांना झालेली स्त्रीत्वाची
ओळख समजून येते।देवि प्रपन्नार्तिहरे प्रसीदप्रसीद मातर्जगतोऽखिलस्य ।प्रसीद विश्वेश्वरि पाहि विश्वं त्वामीश्वरी देवि चराचरस्य ।।
जो कोणी देवीला शरण असेल, ज्या कोणाची तिच्याकडे काही इच्छा असेल, जो कोणी देवीकडे काही मागत असेल त्याचे दुःख हरण करणारी अशी जी देवी, ती आमचेही दुःख नाहीसे करो। संपूर्ण विश्वाची ती माता आहे, म्हणून आपल्या सर्व अपत्यांवर ती प्रसन्न होवो. ती विश्वमाता म्हणजेच विश्वेश्वरी आहे, म्हणून ती संपूर्ण विश्वाचे रक्षण करो. हे देवी, सर्व चराचर सृष्टीच्या उत्पत्तीचे कारण असलेली तू साक्षात आदीश्वरी आहेस.
याचप्रमाणे एका ठिकाणी व्यासांनी मातृस्तोत्रातून मातेचा महिमा सांगितला आहे,
नास्ति गासमं तीर्थं नास्ति विष्णुसमः प्रभुः।नास्ति शंभुसमो पूज्यो नास्ति मातृसमो गुरुः।।
गंगा हे पुण्यतीर्थ आहे। कारण गंगेची बरोबरी मेंदू आणि मेरुदंडात भरलेल्या सोमरसाशी केलेली आहे. हा सोमरस जेवढा उत्तम असेल, सर्व शरीरात पोचू शकेल तेवढे उत्तम परमकल्याण व्यक्तीला प्राप्त होईल. विष्णू ही देवता आहे आपल्या नर्व्हस सिस्टीम (चेतासंस्था) म्हणजे शरीरातील संपूर्ण चलनवलन आणि संवेदना संस्थेला जबाबदार असते. एकूण सर्व शारीरिक व्यवहार, कला व कर्तृत्व यांना प्रतिष्ठा मिळावी म्हणून शिवग्रंथी कार्यरत असते. शिवग्रंथीचे काम नीट चालावे म्हणून शिवाचे पूजन केले जाते, असे या ठिकाणी म्हटले आहे.
गंगेसारखे दुसरे तीर्थ नाही, विष्णूसारखी दुसरी देवता नाही, शंकरासारखे दुसरे पूजनीय आणि उपासनीय कोणी नाही, त्याप्रमाणे आईसारखा दुसरा गुरू नाही, म्हणजेच आई हीच परमगुरू आहे। दुसऱ्या कोणत्याही गुरूची आईशी तुलना होऊ शकत नाही.
गुरूंकडे जाऊन अनेक विद्या शिकता येतात। शालेय जीवनाचा अभ्यास कसा करायचा, व्यायाम कसा करायचा, कुस्ती कशी करायची, पेटी-तबला वगैरे वाद्ये कशी वाजवायची, गायचे कसे, शिवणकाम, भरतकाम कसे करायचे, अशा अनेक गोष्टी अनेक प्रकारच्या शिक्षकांकडे जाऊन शिकता येतात; परंतु प्रत्यक्ष जीवन कसे जगायचे आणि कसे यशस्वी करायचे, हे आईच शिकवते. आईच्या तुलनेत दुसऱ्या कोणत्याही गुरूला महत्त्व येऊ शकत नाही. स्त्रीची जी अनेक रूपे आहेत त्यात जगतजननी किंवा माता हे रूप सर्वात मोठे आणि अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणून "मॉं तुझे सलाम'!
पृथ्वी ही धरित्रीमाता, पृथ्वीमाता म्हणून मान्यता पावलेली आहे। कारण पृथ्वीच्या पोटातूनच, गर्भातूनच सर्व वस्तुजात, प्राणिमात्र, मनुष्यमात्र तेथूनच उत्पन्न झालेले असतात. वस्तुजात (मटेरिअल) व शक्ती (चैतन्य) ही अस्तित्वाची दोन टोके असणे साहजिकच आहे. ही दोन विरुद्ध टोके असून, वर्तुळाकार व्यवस्थेत बसविलेली असल्याने ती एकमेकांत परिवर्तनीय आहेत. हेही साहजिक आहे, की पृथ्वी खाली असल्यामुळे तिचे लक्ष व प्रवाह आकाशाकडे आणि आकाशाचे (चैतन्याचे) लक्ष व प्रवाह पृथ्वीकडे असतो. शक्ती बांधून ठेवता येत नाही, शक्ती संग्रहित करता येत नाही, ती खालच्या दिशेने वाहून जाते, म्हणजेच संपते; वस्तू मात्र परिवर्तनीय आहे व त्यात सुधारणा होऊ शकते. स्त्री ही अधिक संवेदनशील व श्रद्धावान आहे, तिचे लक्ष आकाशात- चैतन्याकडे असल्याने तिला श्रेष्ठत्वाचे-देवत्वाचे अस्तित्व अधिक जाणवते. पुरुषाचे लक्ष मात्र भौतिकतेकडे म्हणजेच जडाकडे, जडत्वावर अधिकार गाजवण्याकडे, जडत्वाचा संग्रह करण्याकडे असते. स्त्री ही तिच्या कुलात असलेल्या पृथ्वीला "सुजलाम् सुफलाम्' करण्याचा प्रयत्न करते, तर पुरुष तिच्यावर आपला अधिकार गाजवून ती आपल्या मालकीची करण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी स्त्री वा पुरुष हा भेद केवळ शरीरभेदाने केलेला नसून, प्रथम स्वभावातील स्त्रीत्व वा पुरुषत्व जाणून घेतल्यावर नंतर शरीरभेदानुसार स्त्रीलिंग, पुंलिंगाचा विचार करता येतो. या चढाओढीत पुरुषाने स्त्रीला वस्तू समजून तिच्यावर स्वामित्व अधिकार दाखविण्यासाठी प्रयत्न केला व तिच्यात असलेला चैतन्याचा प्रवाह, तिच्यात असलेली मार्दवता, शालीनता यांच्याकडे दुर्लक्ष केले. एकूण अनेक वर्षांच्या पृथ्वीवरच्या जीवनाकडे लक्ष टाकले तर असेच झालेले दिसते. वर पाहिलेल्या श्लोकातसुद्धा या पृथ्वीमातेचे वर्णन आलेले दिसते.
अस्तित्वाची दोन टोके हा पाया धरला तर जड-चैतन्याच्या मिलनाची जी लीला- त्याला काही अर्थच राहणार नाही। या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला जड व एका टोकाला चैतन्य असले, तरी त्याला स्वरूप येते जेव्हा त्यात एक संकल्पना येते व हा त्रिकोणाचा वरचा शिरोबिंदू असतो. असे म्हणतात, की स्त्रीच्या मेंदूच्या पेशी व त्यात असलेल्या संकल्पना (प्रोग्राम्स) पुरुषाच्या मेंदूत असलेल्या संकल्पनांपेक्षा अगदी वेगळ्या असतात. पुरुष अस्तित्वाचा एक त्रिकोण व विरुद्ध दिशेत असलेला स्त्री अस्तित्वाचा त्रिकोण यांच्या मिलनातून दिसायला लागते श्री, संपत्ती व निसर्गचक्राचे अव्याहत वाढणारे क्षेत्र किंवा जन्माला येते एक पेशी, त्यातून जन्माला येते मूल व त्यातून पुढे तयार होते प्रजा. स्त्री ही पुरुषापेक्षा एक पायरी वर असते असे म्हणण्याचे कारणच असे आहे, की स्त्री चैतन्यावर दृष्टी ठेवून जगणारी, भावना व चारित्र्य यांना किंमत देऊन त्यांची जोपासना करून आपल्या अपत्यात सहृदयता वाढविणारी असते. पुरुष मात्र एकूण वस्तुजाताच्या वाढीतच जास्ती उत्क्रांत राहतो. पुरुषांच्या बाबतीत जेवढे शौर्य महत्त्वाचे असते तेवढी स्त्रीच्या बाबतीत शालीनता व लज्जा हे गुण महत्त्वाचे असतात. म्हणून "मॉं तुझे सलाम'!
एखाद्या गुलाबाच्या बागेत उभे राहिले असता या गुलाबाच्या बागेचे क्षेत्र किती आहे, त्यात किती गुलाब येतात, त्यापासून किती गुलकंद तयार होईल, त्यापासून किती फायदा होईल, असा विचार पुरुष करतो। या गुलाबाचा सुगंध वातावरणात भरून राहिल्यामुळे सर्जनाच्या कल्पना कशा सुचू शकतात वा प्रेम, प्रीती कशी वाढते व त्याहीपलीकडे जाऊन या जमिनीत सुंदर, कोमल, सुगंधित गुलाब कसे उगवले, ही परमेश्वरी लीला कशी काम करते, याचे चिंतन स्त्री करते. त्यामुळे वरवर पाहता असे वाटते, की पुरुषाची दृष्टी वैज्ञानिक आहे व स्त्री श्रद्धेने जास्त जगत असते. यात फरक एवढाच करावासा वाटतो, की पुरुषाची अधिक श्रद्धा असते जडावर व स्त्रीची अधिक श्रद्धा असते अमूर्त निर्गुण, निराकारावर व प्रेमावर. स्त्री व पुरुष, दोघेही श्रद्धा ठेवतात; पण त्यांच्या श्रद्धेची क्षेत्रे वेगवेगळी असतात. ज्या वेळी अंधश्रद्धेचा विषय येतो त्या वेळी स्त्रिया जशा अंधश्रद्धेच्या बळी पडू शकतात, ते क्षेत्र चमत्काराचे असू शकते. पुरुष विज्ञानाच्या सीमा न ओळखता त्याचा स्वीकार करतात, हीही एक प्रकारची अंधश्रद्धाच आहे असे म्हणायला हरकत नाही.
"सर्पात मी वासुकी आहे, वृक्षांमध्ये मी अश्वत्थ आहे' वगैरे भगवंतांनी श्रीमद्भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात म्हटले आहे। "जगातल्या सर्व सौंदर्यात स्त्रीचे सौंदर्य मी आहे' असे भगवंतांनी म्हणायला हरकत नाही. सौंदर्याचे आकर्षण, मग ते सौंदर्य स्त्रीचे असो की ताजमहालाचे- सर्वांनाच असते. कारण सौंदर्य हा एक दैवी गुण आहे ही एक दैवी संपदा आहे. स्त्रियांना शुक्राचे, लवचिकतेचे, सौम्यत्वाचे, सौंदर्याचे वरदान मिळालेले असते, त्यामुळे पुरुषांना स्त्री प्रेरणारूप ठरू शकते. तिच्या इच्छेसाठी तिला आनंद वाटावा म्हणून अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी पुरुषांनी केलेल्या दिसतात.
साधारणतः असा एक समज असतो, की स्त्रीला दागदागिन्यांची, कपड्यांची हौस असते; रत्न, हिरे वगैरेच्या बाबतीत स्त्री अधिक मोह दाखवते, परंतु महाभारतात ज्या वेळेला द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग येतो तेव्हा श्रीकृष्णांनी केवळ अनेक प्रकारच्या, किमती साड्या दिल्या, म्हणून द्रौपदी श्रीकृष्णांना सतत स्मरणारी, त्यांच्यावर प्रेम करणारी, त्यांनी आपल्या पाठीशी सतत राहावे, असे म्हणणारी झाली नाही, तर वस्त्रहरणाच्या वेळी तिचा जो आत्मसन्मान नष्ट होत होता, तिच्या स्त्रीत्वावर जे आक्रमण होत होते, ते श्रीकृष्णांनी टाळले होते। श्रीकृष्णांमुळे तिला आत्मसन्मान मिळाला, तिचे लज्जारक्षण, तिची प्रतिष्ठा श्रीकृष्णांनी दिलेल्या साड्यांनी सांभाळली. आपल्याला या प्रसंगातल्या फक्त साड्या दिसतात, परंतु त्यामागची प्रतिष्ठा दिसत नाही.
स्त्रीला अनेकानेक, कितीही वस्तू पुरवल्या, पण तिच्यावरचे प्रेम कमी झाले किंवा तिचा मान ठेवला नाही, तर तिचे समाधान कधीच होणार नाही। तेव्हा स्त्री ही आत्मसन्मानाची, प्रतिष्ठेची भुकेली आहे. घरदार, वस्त्रप्रावरणे, दागदागिने या सर्व गोष्टी जरी स्त्रीला प्रिय असल्या तरी त्या तिचे सौंदर्य वाढवून पुरुषाला कार्यप्रेरणा देण्यासाठी उपयोगात आणलेल्या असतात. शिवाय या गोष्टी नीट सांभाळून ठेवण्याचे, त्यांचे संरक्षण करण्याचे कामही स्त्रीच करत असते.
पुरुष हा घराबाहेर फिरणारा, तर स्त्री ही सर्वांना एकत्र आणणारी असते। एखादी सुंदर स्त्री असली तर तिच्या आजूबाजूला दहा माणसे जमणे अवघड नसते. स्त्री नातेसंबंध, हितसंबंध, पाहुणे-रावळे, मित्रमंडळी वगैरे सर्वांना एका ठिकाणी गोळा करते आणि त्यासाठी लागणारी सुविधा पुरवते, समृद्धीची व्यवस्था करते. घरदार, पैसाअडका, दागदागिने यामागे वस्तूचा लोभ नसून, ती सर्व एका विशिष्ट कामासाठी एकत्र केलेली पायाभूत सुविधा आहे, असे म्हणायला हरकत नाही.
सद्यपरिस्थितीत, स्त्रीवर झालेल्या अन्यायाचे परिमार्जन म्हणून, स्त्रीला जडवस्तू समजून तिचा दुरुपयोग केला गेला त्याची भरपाई म्हणून, स्त्रीला कामामध्ये प्राधान्य मिळावे, तिने सर्व क्षेत्रांत पुढे यावे, तिने तिच्या मर्जीप्रमाणे वागावे, तिला जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात, अशा तऱ्हेचे अनेक कार्यक्रम केलेले दिसतात, पण नुसत्या अशा कार्यक्रमांनी स्त्रीला योग्य न्याय मिळणार नाही, तिला बरोबरीला आणता येणार नाही। स्त्रीला आत्मसन्मान मिळणे, स्त्रीला तिची प्रतिष्ठा पुन्हा देणे खूप गरजेचे आहे. ती पुरुषापेक्षा अधिक शक्तिवान आहे, हे स्वीकारून तिला दर्जा मिळणे महत्त्वाचे आहे.
इतिहासातल्या स्त्रिया पाहिल्या तर त्यांचे चरित्रही खूप काही सांगून जाते। राजा व राणीला प्रजा अपत्यासारखी असते, म्हणून झाशीची राणी स्वतःचे अपत्य पाठीवर घेऊन, हातात तलवार घेऊन प्रजारूपी अपत्याचे रक्षण करायला गेलेली दिसते.
स्त्रीचा मूळ मातृस्वभाव सेवेत, शौर्यात वगैरे सगळीकडे दिसून येतो। आपल्या प्रजेला व मनुष्यमात्राला यात्रा करणे सोपे व्हावे व नदी, सरोवरे यांचा लोकांनी लाभ घ्यावा, त्यांचा प्रसार व्हावा, या हेतूने पुण्यश्लोक अहल्याबाई होळकरांनी प्रजेच्या आध्यात्मिक गरजा व पर्यावरण यांची काळजी घेऊन अनेक धर्मशाळा, नदीवर घाट बांधले. यातून त्यांनी स्त्रीचे आध्यात्मिक स्वरूप, तसेच प्रजेचे व पर्यावरणाचे हित कसे साधायचे, याचे मार्गदर्शन केले.
अत्यंत आणीबाणीच्या काळात समाजाला राष्ट्रप्रेम, स्वदेश, निष्ठा वाढविण्याची गरज असताना, परकीयांनी सत्ता गाजवून प्रजेवर केलेले अन्याय दूर करण्यासाठी खंबीर नेतृत्व व कणखर राजाची गरज आहे, हे ओळखून जिजाई मातुःश्रींनी शिवबाला शिक्षण देऊन तयार केले। आईसारखा दुसरा गुरू नाही, हे व्यासांचे वाक्य खरे ठरवून स्त्रीमधला दूरदर्शीपणा व संस्कार देणाऱ्या गुरूची ताकद जिजाऊंनी दाखवून दिली.
भारतीय इतिहासात वा जगाच्या इतिहासात स्त्रियांनी अनेक अनेक प्रकारे संपूर्ण पृथ्वीच्या रक्षणासाठी, म्हणजे लोककल्याण, पर्यावरणाचे कल्याण, भौतिक समृद्धी व आध्यात्मिक उन्नती यासाठी कसे प्रयत्न केले, याची अगणित उदाहरणे सापडतील। हे सर्व पाहिल्यावर स्त्री एक पायरी वर कशी आहे आणि स्त्री ही परमदेवता कशी आहे, हे सहज लक्षात येईल. म्हणून "मॉं तुझे सलाम'!
द्रौपदी यज्ञातून प्रकट झालेली म्हणजे यज्ञकन्या होती, तसे पाहता प्रत्येक स्त्री ही अग्निकन्याच असते. म्हणजे ती शरीरव्यवस्थेतील अग्नीच्या (हार्मोनल सिस्टीम) संतुलनावरच तिचे जीवन, सौंदर्य, सर्जनशीलता, क्षमता अवलंबून असते. म्हणून स्त्रीच्या मानसिकतेचा तिच्या हार्मोनल सिस्टीमवर खूप मोठा परिणाम होतो. तसेच बाहेरच्या पर्यावरणाचासुद्धा खूप मोठा परिणाम स्त्रीच्या अस्तित्वावर होतो. अनेक वर्षांनंतर खरोखरच जर स्त्रीला समानाधिकार द्यावा असे वाटत असेल तर स्त्रीला तिचा आत्मसम्मान व प्रतिष्ठा पुन्हा मिळणे आवश्यक आहे. काम करण्याचा अधिकार, स्वतःच्या मतानुसार निर्णय घेण्याचा अधिकार किंवा कामाचा मोबदला मिळत असताना तिला डावे-उजवे होणार नाही, याची दक्षता घेणे, या गोष्टी तर करायलाच पाहिजेत; परंतु मूळ आवश्यकता आहे ती स्त्रीच्या आत्मसन्मानाची. ज्या ज्या वेळी स्त्रीच्या वस्त्राला वा पदराला कुणी हात लावेल त्या त्या वेळी योग्य वेळी कडक शासन झाले नाही तर समाजाने आपला आत्मसन्मान ठेवला आहे, असे तिला वाटणारच नाही. तेव्हा स्त्रीला आत्मसन्मान व प्रतिष्ठा देण्याचा संकल्प या स्त्री-दिनाच्या निमित्ताने होणे आवश्यक आहे. तसेच पर्यावरणाचा व स्त्रीचा संबंध समजून घेऊन आपण पर्यावरणाचा जेवढा ऱ्हास करू तेवढे स्त्रीचे अस्तित्व संपत जाईल, हे लक्षात घेऊन पर्यावरणाची काळजी घेणे ही पर्यायाने स्त्रीला मदत करण्यासारखे आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. जगात जर काही सौंदर्य, कला, नीती, चारित्र्य, समृद्धी, उत्क्रांती वाढावी असे वाटत असेल तर स्त्रीकडे लक्ष ठेवून तिच्या आवश्यकतांची पूर्ती करणे आवश्यक आहे. अशी पूर्ती करताना तिच्यावर आपण उपकार करतो आहोत, अशी भावना न ठेवता तिची योग्यता आहे म्हणून, तिचा अधिकार आहे म्हणून तिला सन्मान व प्रतिष्ठा देणे आवश्यक आहे. म्हणून "मॉंतुझे सलाम'!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment