मित्रानो, सादर करीत आहे मला एक आवडलेला लोकप्रभे मधील लिहिलेला लेख। फुल्या फुल्या डॉट कॉम च्या सदरामधे आलेला हा लेख ह्या पत्त्यावर देखिल वाचता येइल
http://www.loksatta.com/lokprabha/20091127/fulya.htmहा लेख लोकप्रभा ह्या अंकातून घेतला आहे (दिनांक २७/११/२००९)
राष्ट्रभाषा यानेकी हिंदुस्थानी बोलीत कसम खाण्याचा आपल्या देशात रिवाज आहे। त्यात मरहट्टय़ांची बोली याने की मराठी ही एक भंकस बोली आहे। आजतलक ती बोली शिकून घेण्याची काही वजह नव्हती. काय गरज पडते? लेकिन चुनून आल्यानंतर ती बोली मी शिकून घेईन असे तुम्ही जाहीर केले होते.
जनाबेआलम अबु असीम आजमी यांस कृतानेक कुर्निसात.दोन ब दोन हप्त्यांपूर्वी आपल्याशी महाराष्ट्राच्या भर विधानसभेत काही मराठी नतद्रष्टांनी बदसलुकी केली, त्याबद्दल मुआफी मागण्यासाठी हे खत आपल्याला दरोबस्त रवाना करीत आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाच्या मरगट्टय़ा काफरांच्या एका पक्षाने आपल्याशी असे वागायला नको होते. नको होते! नको होते!!हा वाकई जुलुम झाला. भर सभागृहात ‘फाऽऽड’ असा आवाज घुमला आणि महाराष्ट्राचा नक्शा आपल्या गाल-ए-आजमवर उमटला, असे अखबारवाले आणि खबरवाले यांनी जाहीर करून टाकले. राष्ट्रभाषेचा मुखभंग
झाल्याची आवई आपल्या समाजवादी पार्टीचे मुल्लायम सिंग यांनी उठवली. हे सरासर झूठ आहे. आम्ही खुदबखुद दोनशे तीस वेळा तोच नजारा वेगवेगळ्या च्यानलांवर पाहिला. वेगवेगळ्या कोनातून पाहिला. कधी खडे होऊन पाहिला. कधी कूदकर पाहिला. कधी गडबडा लोळत पाहिला. कधी खटियावर लेटून पाहिला. कधी पेट धरधरुन पाहिला. कधी कधी तर आंखे मिटूनदेखील पाहिला. पण या सगळय़ा नजाऱ्यांमध्ये आम्हाला ‘फाऽऽड’ असा आवाज काही ऐकू आला नाही. आमचे कान कमालीचे तेजतर्रार आणि गध्यासारखे लंबेदेखील आहेत. कुठे खाटखुट झाले तरी बराबर ऐकू येते. तरीही आम्ही तो आवाज सुनण्यात कमी पडलो, हे मात्र खरे आहे. शायद असेही घडले असेल, की कुणी तुमच्या कानफटात मारलीच नसेल, आणि नुसतीच आवई उठवली असेल!.. खुदा खर करे आजमीसाहब, आपके कान और कान के नीचे का मैदान हमेशा सलामत रहे! पण इथेच आपल्याला होशियार राहण्याची गरज आहे. ही मराठी माणसे न केलेल्या कामगिरीचे श्रेय उपटण्यात माहीर आहेत, हे आपण ध्यानात ठेवावे. न मारलेल्या कानफटीच्या जोरावर ही मंडळी सॉलीड टीआरपी मिळवतात, आजमीसाहेब. सारा प्रसंग आमच्या नजर-ए-नाचीजसमोर तरळतो आहे.. आपण आपली तश्रीफ उचललीत आणि आस्ते कदम निघालात, जसा जंगलात शेर आपल्या गुहेकडे जातो. जसा आलमगीर आपल्या तख्ताकडे जातो. जसा र्टेबाज मुर्गा आपल्या आवडत्या मुर्गीच्या खुराडय़ाकडे तुरा वळवतो.. इर्दगिर्द बाकडय़ांवर बसलेल्या नामुरादांचे नाकुर्निसात स्वीकारल्यासारखे करत तुमची सफेदपोश मूरत जणू ‘सिटीवॉक’ करीत जात होती. तो नजारा पाहून आमच्यासारख्या हितचिंतकांची, सच सच सांगतो, नींद उड गई! आजमीसाहब, या काफरांच्या मुंबईत राहून, त्यांच्या नाकावर टिच्चून टगेगिरी करणे, सगळ्यांनाच जमते असे नाही. आपण तर इथे येऊन थेट शिवसेनेच्या वाघावरच असे काही डरकाळलात, की बस. मरहट्टय़ांच्या मुलखात येऊन बेदर्कार सियासती मामल्यात त्यांचा सफाया करणे, बाकायदा पोलिटिकल पार्टी चालवणे, ही सीधीसाधी चीज नाही.नुकतीच तुम्ही चुनावमधली जीत हासिल केली होतीत. एका नाही तर दोन ठिकाणी तुम्ही चुनून आलात. (चुनचुन के बदला लूंगा.. असा डायलॉग पिच्चरमध्ये आपण ऐकत आलो, त्यापैकीच तर हे चुनून येणे नाही ना?) महाराष्ट्राच्या विधानसभेत राष्ट्रभाषा, याने की हिंदुस्थानी जबानमध्येच कसम खाण्याची आपण कसम खाल्ली होतीत. त्याप्रमाणे आपण कसम खाण्यास सुरुवात केलीत, आणि एक दढियल काफिर उटला. प्रथम आम्हाला वाटले की कुणी मौलवीच आपल्याला कसम देण्यासाठी बोलावण्यात आला आहे. पण त्या दढियल इसमाने तुमच्यासमोरचे मेज-ए-कसम याने की पोडियम उभ्याचे आडवे केले. तेव्हा मोठय़ा मनाने तुम्ही ते पोडियम हलकेच ढकलून त्याला दयाळू मनाने मदद केलीत, हेदेखील आमच्या नजरेतून सुटले नाही! आपला दिल दरिया आणि गाल समुंदर आहे जनाब आजमीसाहेब! (हा मुहावरा थोडा वेगळा आहे, पण इथे आम्ही तो वेगळा इस्तेमाल करत आहोत !) त्यानंतर आपल्याला मनसेच्या गनिमांनी घेराव केला. बहुत गुस्ताख घोषणाबाजी केली. ललकाऱ्या दिल्या. पण आपण शेरदिल आहात. त्या साऱ्या दमबाजीला आपण धीराने तोंड दिले. पण ‘तोंड दिले’ म्हणजे अक्षरश: तोंड द्यायचे का आजमीसाहेब? मुलुंड नावाच्या एका बेकार उपनगरातून चुनून आलेल्या शिशिर शिंदे, राम कदम, वगैरे काफरांनी आपल्याशी हुज्जत घातली, तेव्हा ते कोणत्या जुबानमध्ये बोलत होते? ‘ऐसा नै चलेगा, आपनेको मराठीमेच शप्पत लेना पडेंगा बोलेगा तो पडेंगाच..’ अशा भयानक बम्बैय्या हिंदीत आपल्याशी कोणी बोलले का? आजमीसाहेब, इतकी वर्षे हे मरगट्टे मुंबईत राहाताहेत, पण हिंदीच्या यांच्याइतक्या चिंध्या कोणी केल्या नसतील. काहीही करा, यांना हिंदी जबान येत नाही, म्हणजे नाहीच. इस मुंबईमें सब के लिए जगह है, सिवाय हिंदी के! आपल्या उत्तर भारतातून येणारे आणि आलेले बांधव (त्यांना भय्या म्हणतात!) तेदेखील मराठी शिकून घेतात, पण यांना कोणी समझावे? या मनसेच्या लोकांना तर जमूरियत कशाशी खातात हेसुद्धा ठाऊक नाही. हेच शिशिर शिंदे मागे एकदा आम्हाला जमूरियतचा अर्थ विचारत होते. जमूरियत हे एक बादशहा कोल्ड्रिंकमध्ये मिळणारे फालुदासारखे पेय आहे, अशी त्यांची धारणा होती. आम्ही त्यांना त्याचा अर्थ सांगितला. बहुत साल पहले एका फादरच्या कानाखाली या शिंदेसाहेबांनी करकरीत ओढली होती. क्रिकेटच्या पिचवर क्रूड ऑइल ओतण्याचा कल्पक प्रकार यांनी केला होता. त्यांनी तुमची गचांडी धरली, यात नवल ते काय? राम कदम, वसंत गिते, रमेश वांजळे यांचीही थोडय़ाफार फरकाने हीच ष्टोरी आहे, साहेब! गाल दिसला की फाऽऽड आणि काच दिसली की खऽऽळ्ळ्ळ्!!कुलाब्याला तुमचे ‘सिटीवॉक’ नावाचे चपलाबुटांचे दुकान आहे. तेथील जोडा चांगला टिकाऊ आणि टणक आहे. ‘तिथून घ्या, मी सांगून ठेवतो, चाळीस टक्के सहुलियत मिळेल,’ असे आपण भर सभागृहात मोठय़ा मनाने यांना सांगत होता, ते प्रत्यक्ष आम्ही पाहिले. पण यांनी त्याचा अर्थ काय काढावा? आजमीने आम्हाला जोडा दाखवला, म्हणून आम्ही पेटून उठलो आणिनंतर पुढचा प्रकार घडला, असे हे सांगू लागले. हे त्यांना शोभते का! वस्तुत: तुम्ही त्यांना जोडे दाखवून मोठी दोस्ती निभावत होता, पण यांनी पराचा कौव्वा केला. आजमीसाहेब, झूट बोले, कौव्वा काटे!राष्ट्रभाषा यानेकी हिंदुस्थानी बोलीत कसम खाण्याचा आपल्या देशात रिवाज आहे. त्यात मरहट्टय़ांची बोली याने की मराठी ही एक भंकस बोली आहे. आजतलक ती बोली शिकून घेण्याची काही वजह नव्हती. काय गरज पडते? लेकिन चुनून आल्यानंतर ती बोली मी शिकून घेईन असे तुम्ही जाहीर केले होते. आता खरे तर तुमचा एवढा शब्द पुरेसा होता. ज्या बोलीशी आपला काडीचा रिश्ता नाही, ठेवण्याची मनशा नाही, ती बोली केवळ अवामसाठी शिकून घेण्याची तयारी तुम्ही दाखवलीत, यातच सारे आले! पण या नामुरादांना त्याचे काय?लेकिन आजमीसाहब, संभालके रहना. आपल्याकडे ईदला महागामोलाचा बकरा हलाल करायचा रिवाज आहे. कुणी अमीरजादा दोन पाच लाखांचा खुर्दा उधळून तो बकरा बादामपिश्त्यांचा खुराक देऊन पाळतो आणि शेवटी त्या बकऱ्याला हलाल व्हावे लागते आणि सागुती बनून तो घराघरात वाटला जातो. या मनसेवाल्यांनी तुमचा बकरा तर नाही ना केला? तुमचा बळी देऊन यांची ईद तर साजरी होणार नाही ना? हा सगळा त्या मरगट्टय़ांचा गनिमी कावा आहे. त्याची इत्तला देण्यासाठीच खरे तर आम्ही हे खत लिखण्यास प्रवृत्त झालो आहोत.आजमीसाहेब, ही मरगट्टी जात मोठी हरामी आहे. ऐसी झगडेल, उखडेल आणि बिगडेल कौम दुसरी कुठेही नसेल! स्वत: कामधाम करत नाहीत. दुसरा करू लागला, तर त्याच्याशी हुज्जत घालतात. त्यात हे मनसेवाले अभी अभी काही ज्यादाच बेमुर्वतपणा करू लागले आहेत. राज ठाकरे नावाचा एक बहुत गुस्ताख लडम्का त्यांचा मुखिया आहे, आणि त्याला मदरशात दुरुस्त बर्ताव कसा करतात याची तालीम मिळालेली नाही. त्याच्या छावणीतल्या काही पुंडांनी हा बनाव घडवून आणला असावा, असा शक आमच्या मनी येतो. कानफटात खाल्ल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतो. कानफटात काय कोणीही खाते. खरे सांगायचे तर दोन्ही हात गालांवर ठेवूनच आम्ही आमचे बचपन गुजरले. कोण कधी वाजवेल काय भरोसा? जवानीत दोनचारदा लेडीज सँडल खाता खाताबचलो. आजमीसाहब, कानफटात खाल्ल्याचे दु:ख नसते, कानफटात खाताना कुणीतरी बघणे असह्य वाटते. सच बोलतो की झूट ते तुम्हीच सांगा! त्या राम कदम नावाच्या नाचीज इसमाने तुमच्या खूबसूरत मुखडय़ावरून आपला राकट तळहात घुमवला, तेव्हा आसपास केवढी भीड होती. टीव्हीवाल्यांचे भोचक कॅमेरेदेख़ील होते. रोना इसी बात का आता है. गुपचूप गल्लीत हात धुऊन घेतले तर फार इज्जतचा फालुदा होत नाही. पण अशी जाहीर रिअॅलिटी शोसारखी वाजवणे, फारच कमीनापन आहे. पण आजमीसाहब, तुम्हालाही हेच हवे होते ना! राज ठाकरेने मराठीत शपथ घेण्याचा इशारा दिला तेव्हाच तुम्ही हिंदी जबानमध्ये कसम खाण्याचा इरादा जाहीर केला होतात. यावर बव्हाल होणार हे तर साऱ्यांनाचा मालूम होते. कारण मुद्दा मराठी शपथ की हिंदी हा कधी नव्हताच! कारण मराठीत कसम खाल्ली काय आणि हिंदुस्थानी बोलीत खाल्ली काय, की फर्क पैंदा? मराठीत कसम खाणारे ती पाळतात, आणि हिंदीत ईश्वर को साक्षी रखकर शपथ लेता हूं म्हणणारे झूटे असतात, असे थोडीच आहे!गंमत म्हणजे आजमीसाहब, ही कसम अशी आहे की ती कोणीच कधीही पाळत नाही. असल्या कसमा खाऊन उटपटांग धंदे करणारे सियासती चूहे आम्ही पाहिले नाहीत का? असल्या कसमा या फक्त रिवाज असतो. इसीलिए मराठीवालेही नाही, हिंदी वा संस्कृत वा अंग्रेजीवालेही बेधडक ही कसम खाऊन टाकतात. लेकिन आप का इरादा अलग था. मनसेवाल्यांना ललकारने के वास्ते आपण ही कसम हिंदीत खाल्लीत. त्याचा सभागृहाशी इमानदार राहण्याशी काहीही संबंध नव्हता. खास बात तो ये है साहब, की तुमचा इरादा आणि त्यांचा इरादा सगळय़ांना मालूम होता. अगदी अवाम म्हणजे पब्लिकलासुद्धा! तरीही हा मसला झाला. मनसेचे चार आमदार चार साल के लिए बाहर हो गए. आपल्याला मुलायम सिंग यादव यांनी शाब्बाशी दिली. लालू प्रसाद यादवांनी पाठ थोपटली. आपला सत्कार होणार असेही ऐकतो आहोत. बधाई हो! राष्ट्रभाषेसाठी एक काय शंभर कानफटात खायची तुमची तय्यारी असेल, याबद्दल आमच्या मनात बिलकुल शंका नाही. हा महात्मा गांधींचा देश आहे. कुणी एका गालावर मारली, तर दुसरा गाल पुढे करावा, असे संस्कार आहेत इथे. पण आजमीसाहब, आता जमाना बदलला आहे. दोन्ही गाल पुढे करायची वेळ फक्त आरशासमोर सलूनमध्ये येते. अगले टाइम काळजी घ्या.आजमीसाहब, आपल्याला मराठी बोलता येत नाही, लेकिन तुम्ही या बोलीची इज्जत करता. ती तुम्ही आता शिकूनदेखील घेणार आहात. पण मनसेवाल्यांना हे कधी कळणार नाही. मराठीत न बोलूनच तुम्ही मराठीचा सन्मान केला आहे, हे समझून घेण्याची कुवत त्यांच्यात नाही. अन्य कुणात असेल असे वाटत नाही....अमृताते पैजा जिंकणारी मराठी भाषा आखिर पैजारांच्या भाषेवर आली, याचे मात्र दु:ख जरूर आहे. त्याला निमित्त तुम्ही ठरलात इतकेच. आजमीसाहब आपल्या गालावर सूज असेल, पण आमच्या गालावर आसू आहेत.. कसम से!