म. टा. खास प्रतिनिधी मुंबई
22 Nov 2009, 0148 hrs IST
आयबीएनवरचा हल्ला हे शिवसेनेचं निव्वळ फ्रस्ट्रेशन आहे. राडेबाजी करून आपला गमावलेला केडर बेस गोळा करण्याचा हा प्रयत्न आहे. पण हा तितकाच वेगळ्या वाटेवरून चालण्याचा प्रयत्न करणाऱ्या उद्धव ठाकरेंचा पराभवही आहे. ................. सचिन परब
ऐन रणांगणात रथाचं चाक जमिनीत गेलेल्या कर्णाचं वर्णन 'हसवणूक'मधल्या एका लेखात करताना पुलंना हायवेवर गाडी पंक्चर झालेला ड्रायव्हर आठवला होता. आता पुलं असते तर त्यांना नक्कीच उद्धव ठाकरे आठवले असते. मोठ्या जोशात पाच वर्षं उंच झंेडा ठेवून दौडत आणलेल्या त्यांच्या रथाचं चाक ऐन निवडणुकीत जमिनीत जातंच जातं. गेल्या दोन विधानसभांच्या निवडणुकांत ते घडलंय. या विधानसभेला तर त्यांची धाव जोरदारच होती. उत्तम स्ट्रॅटेजी होती. प्रश्न घेऊन मैदानात उतरले होते. सरकारविरोधी असंतोष त्यांच्याकडे जमा होतोय असं वाटत होतं. लोकसभेत त्याची चुणूक दाखवूनही दिली होती. मैदानातला प्रचार चांगला होताच. इनकमिंग सुरू होतं. बाळासाहेबांची मुलाखत गाजत होती. पण युती आणि तिकिटवाटपावरून मिठाचा खडा पडला. त्याचवेळी राज ठाकरंेनी उसळी मारली. अचानक पहिल्या नंबरचा पक्ष बनण्याची इच्छा बाळगणारा हा पक्ष बावचळला. निकालाच्या सकाळपर्यंत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गोतावळ्यांना युतीची सत्ता येईल, याची खात्री होती. पण गलितगात्र भाजपपेक्षाही कमी जागा मिळाल्या. मुंबईतली दाणादाण अपेक्षितच होती. पण बाकीच्या महाराष्ट्रातही सुपडा साफ झाला. मुंबई-नाशिक पट्ट्यात मनसेने पाडलेल्या सीट जरी जिंकून आल्या असत्या तरी सत्ता येण्याची सुतराम शक्यता नव्हती. उद्धव यांच्यासाठी तो खूप मोठा धक्का होता. कालपरवापर्यंत विदर्भ मराठवाड्यात झालेल्या लाखांच्या सभांना अर्थ उरला नव्हता. शिवसंवादात हाकेला ओ देणाऱ्या शेतकऱ्यांनीच त्यांना उघडं पाडलं होतं. असं असलं तरीही या सगळ्यावरची त्यांची प्रतिक्रिया निव्वळ अगम्य होती. उघड मैदानात येऊन पराभव मान्य करण्यापेक्षा ते तांेड लपवत राहिले. पत्रकार परिषदेत फक्त गांेधळ आणि फ्रस्ट्रेशनच दिसलं. त्यात मराठी माणसाला दोष देण्याचा मूर्खपणा केला. निकालांमधल्या पॉझिटिव्ह गोष्टी शोधून नव्या लढ्याचं रणशिंग फुंकण्याची ती वेळ होती. पण राज यांच्या जयजयकाराने हिरमुसल्या 'मातोश्री'मध्ये काळोखातला प्रकाश पकडण्याची हिंमतच राहिली नव्हती. प्रचाराच्या शेवटी बाळासाहेबांची सभा न घेण्याची हिंमत उद्धव ठाकरंेनी दाखवली होती. पण पराभवाने ते स्पिरिट कुठच्या कुठे हवेत उडून गेलं. निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही होडिर्ंग लावून मतदारांचे आभार मानण्याचा नवीन ट्रेण्ड आहे. तो आता उपचार उरला असला तरी त्यामागची मूळ भावना चांगली आहे. उद्धव आपल्या वागण्यातून असं होडिर्ंग कधी उभारणार? उद्धव यांचं नेतृत्व मान्य करून लाखो मतदारांनी ४४ आमदार निवडून दिले. त्यांच्या अपेक्षांना वाऱ्यावर सोडण्यात कोणता शहाणपणा आहे ? खरं तर मुंबई, ठाण्यातल्या शिवसैनिकांनी पेटून उठून चांगली फाइट दिली. लोकसभेपेक्षा सेनेचा परफॉर्मन्स नक्कीच उजवा होता. माहीम, भांडूप, मागाठाणे अशा उमेदवार चुकलेल्या ठिकाणी फज्जा उडणं स्वाभाविक होतं. पण शिवडीसारख्या मतदारसंघात बाळा नांदगावकरांना दगडू सकपाळांनी फोडलेला घाम खूप काही सांगणारा होता. तिथे काँग्रेसचा उमेदवार कमजोर होता म्हणून, नाहीतर वेगळा निकाल दिसला असता. अनेक मतदारसंघात लोकसभेतली आघाडीची वीस पंचवीस हजारांची लीड सेनेने दहा हजारांच्या आत आणली, हे शिवसैनिकांचं श्रेय आहे. अंधेरीत सुरेश शेट्टी किंवा अणुशक्तीनगरमध्ये नवाब मलिक अशा बलदंड उमेदवारांना लोकांची कामं करणाऱ्या नगरसेवकांनी घाबरवून सोडलं. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप कोण देणार? आणि उद्धव राहतात त्या वांदे पूर्व मतदारसंघात तर बाळा सावंत यांनी झगझगीत प्रकाश दाखवून दिलाय. आणखी काय हवं? शेतकऱ्यांच्या जिवावर उद्धव ठाकरंेनी यल्गार केला खरा. पण त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्यातली प्रस्थापितांना साथ देण्याची मानसिकता समजून घेतली होती का? इथे आणखी मशागत करण्याची आता त्यांची तयारी आहे का? गेल्या निवडणुकीत शून्य रुपये वीजबिलं पाठवून शिंदे सरकारनं लोडशेडिंगच्या मुद्यातली हवा काढून घेतली होती. यावेळी पीकविमा, कर्जमाफी, कापूस एकाधिकारातली बाकी आणि नुकसानभरपाई देऊन शेतकऱ्यांमधला असंतोष दूर करायचा अशोक चव्हाणांचा प्लॅनही यशस्वी झाला. एका शेतकऱ्याच्या खात्यावर एका वर्षात लाख रुपये जमा झाल्याचेही विक्रम घडले. पण शिवसंवाद साधणाऱ्या सेनेकडे त्याला प्रत्युत्तर नव्हतं. सेनेच्या आंदोलनांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून दिली. पण त्याचं श्रेय त्यांना घेता आलं नाही. ते कर्जमाफीतल्या त्रुटी सांगत राहिले. त्याऐवजी शिवाजी पार्कवर सेनेचा मोठा मेळावा भरला असता, तर चित्र वेगळं झालं असतं. तेव्हाचं वातावरण असं होतं की शिवाजी पार्क सहज भरलं असतं. उद्धव ठाकरेही एकहाती पार्क गाजवू शकतात, हे सिद्ध झालं असतं. पण असं घडलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावाने आता खडे फोडण्यात अर्थ नाही. शिवाय नेते अँटिएस्टॅब्लिशमेण्टचे नारे देणारे आणि उमेदवार तीन चार टर्मचे एस्टॅब्लिश आमदार, असा आंतविर्रोध अनेक ठिकाणी होताच. त्यामुळे गुलाबराव पाटील किंवा गावंडे कोमेजले त्यात आश्चर्य नव्हतंच. सेना नेतृत्वाची यातून काही शिकण्याची तयारी आहे का? हा प्रश्न आहे. उद्धव यांनी द्वेषाच्या आधारावरच्या हुकुमशाही पक्षाची पुनर्रचना नव्या जमान्याला अनुसरून करण्याचा प्रयत्न केला होता. शिवशक्ती-भीमशक्तीने प्रबोधनकारांच्या वारशाची आठवण करून दिली होती. 'मी मुंबईकर' तर सेनेसाठी क्रांतीच होती. शेतकऱ्यांसाठी मुंबई ठाण्यातल्या शिवसैनिकांना कामाला लावण्यात मिळवलेलं यश हेदेखील तितकंच महत्त्वाचं. राज्याची सत्ता मिळवण्यात मराठी अस्मिता आणि हिंदुत्व पुरत नाही, हे वारंवार सिद्ध झालेलं असताना मुद्दे घेऊन बेरजेचं राजकारण करण्याला पर्याय नाही. हा नवा मार्ग उद्धव ठाकरे यांची नवी शिवसेना घडवत होता. पण त्या मार्गावर उद्धव ठाकरे यांचा विश्वास उरलेला नाही. बाळासाहेबांच्या सावलीतून स्वत:वर विश्वास उरलेला नाही. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे ज्या लोकांसाठी त्यांना काम करायचंय त्या लोकांवर आणि साहेबांसाठी राबणाऱ्या शिवसैनिकांवर त्यांचा विश्वास उरलेला नाही. आयबीएन लोकमतवर झालेल्या हल्ल्याचा अर्थ तेवढाच आहे.
No comments:
Post a Comment