Thursday, December 23, 2010

सेनेचे अशोक मुर्तडक मनसेत!

खालील लेख म टा च्या सौजन्याने


म. टा. प्रतिनिधी। नाशिक

पक्षांतर्गत कटकटींचे शुक्लकाष्ठ नाशिकमध्ये शिवसेनेची पाठ सोडण्यास तयार नसून उपजिल्हाप्रमुख अशोक मुर्तडक यांनी बुधवारी मनसेत प्रवेश केल्याने पक्षाला धक्का बसला आहे. काही दिवसांपूवीर् महानगरपालिकेतील घडामोडींच्या निमित्ताने शिवसेनेतील गटबाजी उफाळून आली असून तिला चालना देणाऱ्यांनाच झुकते माप मिळत असल्याचे पाहून निर्माण झालेल्या अस्वस्थतेमुळे शिवसेना नगरसेवकांमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता चर्चेत आली आहे.

कामगार सेनेतून बेदखल केल्यामुळे आधीच अस्वस्थ असलेल्या मुर्तडक यांना आताही महानगरपालिकेत खांदेपालट करताना डावलण्यात आल्याने ते नाराज होते. सुधाकर बडगुजर यांचे सभागृह नेतेपद काढून घेतल्यानंतर शिवसेनेच्या सतरा नगरसेवकांनी कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून महानगरप्रमुख अजय बोरस्ते आणि अशोक गवळी यांच्यावरही कारवाईची मागणी केली होती. त्या पत्रात सर्वप्रथम मुर्तडक यांनीच स्वाक्षरी केली होती. त्याचप्रमाणे झाल्याप्रकाराचे सत्यशोधन करण्यासाठी आलेल्या समितीकडे त्यांनी गटनेतेपद मिळावे अशी मागणी केल्याचे समजते. पण, त्यावेळी मुर्तडक यांना 'कडक' शब्दांत समज देण्यात आली होती. त्यातूनच मुर्तडक यांच्या नाराजीत भर पडली आणि त्यांनी मनसेत दाखल होण्याचा निर्णय घेतला.

साधारणपणे तीस वर्षांपासून मुर्तडक यांचा शिवसेनेशी संबंध होता. त्यांनी कामगार सेनेतही चिटणीस दीर्घकाळ काम केले. मात्र, वर्षभरापूवीर् त्यांचे हे पद काढून घेण्यात आले. तर नगरसेवकपदी ते चौथ्यांदा निवडून आले आहेत. एक निष्ठावान आणि अस्सल शिवसैनिक असा मुर्तडक यांचा लौकिक होता. पण, सेनेत सातत्याने सुरू असलेल्या शह-काटशहाच्या राजकारणाला ते कंटाळले होते. सेनेच्या मुशीत घडलेले असल्याने मुर्तडक यांना 'ठाकरें'चेच नेतृत्त्व मानवणारे आहे. कदाचित त्यामुळेच त्यांनी मनसेची निवड केली आणि बुधवारी सकाळी राज ठाकरे यांच्या उपस्थितीतच त्यांच्या पक्षात प्रवेश केला. मुर्तडक यांच्या प्रमाणेच शिवसेनेतील अन्य दहा ते अकरा नगरसेवकांची मानसिकता असल्याचे सांगितले जाते. ते सर्व एकत्र येऊन मनसेत प्रवेश करतील किंवा महानगरपालिकेत 'ब' गट स्थापन करतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे.

महानगरपालिकेतील घडामोडींनंतर नाशिकमध्ये आलेल्या समितीने सर्व नगरसेवकांशी स्वतंत्रपणे चर्चा केली आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या. मात्र त्याचवेळी या समितीने नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना दमात घेऊन कानपिचक्याही दिल्याचे समजले जाते. त्यामुळे या समितीतील एखादा नेता पुन्हा नाशिकच्या संपर्कप्रमुखपदी नेमला गेला, तर त्याच्या गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचेच वर्चस्व राहील अशा भीतीनेही काही नगरसेवकांना ग्रासले आहे.

No comments:

Post a Comment