Wednesday, October 13, 2010

'मनसे' कथांनी राज ठाकरे चकित

म टा च्या सौजन्याने ...................................



* इच्छुक उमेदवारांचे भन्नाट अनुभवकथन
संजय व्हनमाने

' साहेब तुम्हाला अटक करून कल्याणला आणले होते. तेव्हा तुम्हाला बघायला गदीर्त शिरलो तर मागून एसआरपीवाल्यांनी पाठीत काठ्या घातल्या. तेव्हाच मला हा पक्ष आवडला आणि डायरेक्ट पक्षात इंट्री मारली'... कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीतील तिकिटासाठी इच्छुक उमेदवारांची पक्षप्रवेशाची कहाणी राज ठाकरे ऐकत होते. इच्छुकांच्या या भाऊगदीर्त आठ जण तर केवळ राजदर्शनासाठी उमेदवारीचा बहाणा करून आले होते. 'साहेब, आम्हाला उमेदवारी नको. तुम्हाला पाहायचे म्हणून केवळ अर्ज केला', असा खुलासा करून त्यांनी राज यांच्यासह सर्वांना चकित केले. हे सारे पाहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर 'अंजाम ये है तो आगाझ क्या होगा' असे म्हणण्याची वेळ आली.

कल्याण-डोंबिवली पालिकेतील उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी गेल्या आठवड्यात राज ठाकरे यांनी तेथे तीन दिवस मुक्काम ठोकला होता. इच्छुकांना थेट मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले होते. राज यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या मुलाखतींची जबाबदारी आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर, प्रकाश भोईर, रमेश पाटील तसेच शालिनी ठाकरे आणि मनोज चव्हाण यांच्या समितीवर होती. यावेळी राज केवळ 'सायलेंट ऑर्ब्झव्हर' असायचे. ते ना बोलायचे ना प्रश्न करायचे.

प्रत्येकालाच आपण पक्षात का आलात, असा प्रश्न विचारला जायचा. राज ठाकरे यांना अटक करून त्यांची रवानगी मानपाडा पोलीस ठाण्याच्या कोठडीत केली तेव्हा कल्याणमध्ये मनसेच्या कार्यर्कत्यांनी बराच गोंधळ माजवला होता. यावेळी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. यात एका उमेदवारने एसआरपीच्या पोलिसांचा बराच मार खाल्ला आणि पक्षातच प्रवेश केल्याचे सांगितले.

आठ उमेदवारांनी आपल्याला निवडणूक लढवायची नाही हे आधीच सांगितले. आम्हाला केवळ राज ठाकरे यांच्याशी बोलण्याची संधी मिळेल म्हणूनच आल्याचे सांगितले. एका महिला उमेदवाराने तर हॉलमध्ये येताच 'दहा-पंधरा लाख रुपये इलेक्शान खर्च करू, तुमी पैशाची काळजी कराची नाय, मिस्टरांचा केबलचा धंदा हाय ना', असे सांगताच सर्वांनाच हसू फुटले.

...................

स्थानिक आणि बाहेरचे!

तिकीटवाटप निश्चित करण्याआधी पक्षातील इच्छुक उमेदवारांचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. बहुसंख्य उमेदवारांनी स्थानिकांनाच संधी दिली पाहिजे, असा आग्रह धरला आणि घोषणाही दिल्या. त्यावर राज यांनी 'निवडणूक लढविण्यासाठी स्थानिकांना प्राधान्य आणि प्रचारासाठी मात्र बाहेरून मला बोलावणार का', अशा शब्दांत उमेदवारांची फिरकी घेतली.

No comments:

Post a Comment