Monday, August 16, 2010

मराठी सिनेमासाठी कायदाच हवा!

म टा च्या सौजन्याने

मल्टिप्लेक्समध्ये प्राइम टाइममध्ये मराठी सिनेमाचे १२२ शो करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कायदा करावा, अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. शनिवारी दिलेल्या दणक्यानंतरही मल्टिप्लेक्स मालक मराठी सिनेमाला दुय्यम दर्जाची वागणूक देणार असतील तर त्यांना पुन्हा दणके देऊ, असा इशारा राज यांनी दिला.

आज (सोमवारी) बोलावलेल्या मराठी सिनेनिर्मात्यांच्या बैठकीत बोलताना राज ठाकरे यांनी सरकारने केलेली तांत्रिक चलाखी उघडकीस आणली. राज्य सरकारने मल्टिप्लेक्समध्ये मराठी सिनेमाचे १२२ शो दाखवावेत असा जीआर काढला पण कायदा केलेला नाही. जीआरला कोर्टात आव्हान देता येते मात्र कायद्याला आव्हान देता येत नाही ; असे राज ठाकरेंनी सांगितले. मल्टिप्लेक्स मालकांनी जीआर असल्यामुळे कोर्टात जाऊन मराठी सिनेमांच्या शोची संख्या १२२ वरुन ४४ वर आणल्याचे राज यांनी स्पष्ट केले.

मराठी सिनेमा कात टाकतोय. अशा वेळी मल्टिप्लेक्समध्ये १२२ शो प्राइम टाइममध्ये झाल्यास मराठी सिनेमाला उर्जितावस्था येईल, असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला. त्यांनी प्रत्येक मराठी कुटुंबाला पत्र पाठवून मराठी नाटक-सिनेमा पाहण्याचे आवाहन करणार असल्याची घोषणा केली.

No comments:

Post a Comment