Monday, August 16, 2010

मराठी सिनेसृष्टी उद्या 'राज'दरबारी

म टा च्या सौजन्याने


मुजोर मल्टिप्लेक्स मालकांना 'खळ्ळ आणि खटॅक ' चा दणका दिल्यानंतर , राज ठाकरे यांनी आता मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांची महत्त्वपूर्ण बैठक आज सोमवारी बोलावलीआहे. मराठी चित्रपट निर्मात्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना आखण्यासाठी राज ठाकरे यांनी ही बैठक बोलावल्याने निदान थिएटर मालक तरी ' रिळासारखे सरळ ' होतील , अशी अपेक्षा मराठी सिने वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

वारंवार विनंती करूनही मराठी चित्रपट प्रदर्शित न करणा-या मल्टिप्लेक्समध्ये घुसून मनसेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी जोरदार राडा केला. दादर , ठाणे , कांदिवली , वांद्रे भागातील मल्टिप्लेक्सची तोडफोड करण्यात आली. मनसेच्या या आंदोलनावरून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत असताना , अनेक मराठी चित्रपट निर्माते , दिग्दर्शक व कलाकारांनी मात्र मनसेच्या कृतीचे जोरदार समर्थन केले आहे.

या पार्श्वभूमीवर उद्या सोमवारी १६ ऑगस्ट रोजी मनसेच्या वतीने मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांची बैठक बोलावण्यात आली आहे. वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये ही बैठक होणार आहे. मराठी चित्रपट मल्टीप्लेक्समध्ये प्रदर्शित व्हावेत तसेच प्राइम टाइममध्ये ते दाखवले जावेत या मुद्यावर व्यापक चर्चा करण्यासाठी उद्याची बैठक बोलावण्यात आल्याचे समजते. राज ठाकरे स्वतः या बैठकीला हजर राहून मराठी चित्रपट निर्मात्यांच्या अडीअडचणी जाणून घेणार आहेत.

No comments:

Post a Comment