Tuesday, March 9, 2010

'मराठीजनांशी प्रतारणा नाही!'- राज

म टा च्या सौजन्याने

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
मराठी माणसाच्या भल्यासाठी, भूमिपुत्रांच्या उन्नतीसाठी आणि मराठी अस्मिता जपण्यासाठी आम्ही सतत काम करत राहू। मराठी माणसाशी कधीही प्रतारणा करणार नाही, असं वचन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिलं.

मनसेच्या स्थापनेपासून ते १३ आमदार निवडून देईपर्यंत, प्रत्येक आंदोलनात मराठी माणसांनी आपल्यावर विश्वास टाकलाय, त्यांचा विश्वासघात मी सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला। मनसेच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या मेळाव्यात राज यांनी मनसैनिकांना मार्गदर्शन केलं. त्यावेळी मनसेच्या यशस्वी वाटचालीचं श्रेय त्यांनी मराठी माणसांना आणि प्रसारमाध्यमांना दिलं.

प्रवास चार वर्षांचा

काल घरी एकटा बसला होतो, तेव्हा चार वर्षातल्या सगळ्या घडामोडी डोळ्यासमोरून झरझर सरकल्या। शिवसेनेत झालेल्या घटना, पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय, त्यामुळे झालेला त्रास, पक्षस्थापनेपूर्वी केलेला राज्याचा दौरा, अनेकांनी केलेली बोचरी टीका, उडवलेली खिल्ली, त्यानंतरची आंदोलनं, त्याला मिळालेला प्रतिसाद आणि विधानसभेचा निकाल हा सगळा प्रवास आठवला. मी जे बोललो ते मराठी माणसांना पटलं, त्यांनी माझ्यावर-माझ्या पक्षावर विश्वास टाकला आणि त्यामुळेच आज इथपर्यंत पोहोचू शकलो, अशी कृतज्ञ भावना राज यांनी व्यक्त केली. पैशावरच निवडणुका जिंकल्या जातात, असं आत्तापर्यंत मानलं जात होतं. पण आपण विचारांवर जिंकलो. विचार संपतात तेव्हा पैसे लागतात, काही विचार असेल तर कमी पैसे लागतात, असंही राज यांनी नमूद केलं.

मुंबई, ठाणे आणि अन्य महापालिकांचे निकाल लागले तेव्हा एका वृत्तपत्रानं ‘ पक्ष संपला ’ अशी हेडलाइन दिली होती। ती मी किती दिवस, किती वेळा वाचली होती, मलाही आठवत नाही. कुणी अस्तित्त्व मानायलाच तयार नव्हतं. पण आज चित्र बदललंय आणि भविष्यही उज्ज्वल असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विविध आंदोलनांमध्ये लाठ्याकाठ्या खाणा-या, तुरुंगात जाणा-या, तडीपा-या लावून घेणा-या कार्यकर्त्यांचेही त्यांनी आभार मानले.

गरज मराठीचा...

येत्या काळात जनहिताची आंदोलनं हाती घेणार असल्याचं जाहीर करून राज यांनी पुन्हा एकदा मराठीची गर्जना केली। प्रत्येक गोष्टीचं मराठीकरण करणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनांवर मराठीत घोषणा होते की नाही ते पाहा, राज्यातल्या विमानतळांवर मराठीत घोषणा होत नसेल तर धडक द्या, असा आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

आपण निवेदनं देऊन सांगत होतो, तेव्हा कुणीही ऐकलं नाही। म्हणून हाणामा-या कराव्या लागल्या. आता व्होडाफोन वगैरे स्वतःहून आले की नाही बघा, अशी बाजू राज यांनी मांडली. तितक्यातच, ‘ एअरटेल ’ वर मराठी बोललं जात नाही, तांत्रिक कारण दिलं जातं, असं त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आलं. त्यावर राज म्हणाले, एअरटेलच्या टेक्निकल गोष्टीची मुदत आज संपली. आता एअरटेलची ‘ टेल ’ खेचा. स्टेट बँकेचे व्यवहार मराठीत होतील याकडेही लक्ष ठेवण्याची सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केली आहे.

कुठल्याही भाषेला माझा विरोध नाही। महाराष्ट्रातल्या चांगलं हिंदी बोलणा-या राजकारण्यामध्ये मी पहिल्या पाचमध्ये असेन. माझ्या वडिलांना उर्दू लिहिता, वाचता, बोलता यायची. कशाखाली नुख्ता आला की काय अर्थ होतो हे मला उत्तम कळतं. जास्तीत जास्त भाषा शिकल्या पाहिजेत यात वादच नाही. पण म्हणून हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून आमच्यावर लादू नका, असं राज यांनी निक्षून सांगितलं.

ठाण्यातून मुंबईकडे येणारी पाइपलाइन फोडून झोपडपट्टीवासीय पाण्याची चोरी करतायत। त्याकडे लक्ष ठेवा. कुणी पाइपलाइन फोडताना दिसलं तर तिकडेच फोडून काढा, असंही त्यांनी ठणकावलं.

‘ तो ’ फोटो ‘ असा ’ आला !

मनसे सरचिटणीस शिशिर शिंदे यांचा कृपाशंकरसिंह यांच्यासोबत प्रसिद्ध झालेला फोटो कसा काय आला, याचा किस्सा राज यांनी उलगडून सांगितला। शिशिर शिंदेंना वागीश सारस्वतांनी बोलावलं होतं, तिथल्याच इमारतीत कृपाशंकरसिंह यांची मुलगी राहते. ते वागीशनाही माहीत नव्हतं. तिथे हे आले दाढीची खुंट वाढवून. शिशिर शिंदे दिसल्यावर त्यांनी उचलला यांचा हात...तेव्हा फोटोग्राफर होतेच तिथे, आला फोटो आणि मीही गोंधळलो, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यावेळी ‘ जय जय महाराष्ट्र माझा ’ , हे गाणं सुरू असल्याचंही त्यांनी आवर्जून नमूद केलं.

नोंदणी मोहीम

आजपासून मनसेच्या नोंदणी मोहिमेला सुरुवात झाली असून राज ठाकरे यांनी अर्ज भरून या मोहिमेचा प्रारंभ केला। मला पक्षात प्रवेश दिल्याबद्दल आभार, असं राज म्हणाले तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये हशा पिकला. जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधून अधिकाधिक सदस्य नोंदणी करण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. मराठी माणसाच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत आणि पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये आपल्याला यश मिळो, अशी प्रार्थना राज यांनी यावेळी केली.

No comments:

Post a Comment