Monday, August 1, 2011

राज ठाकरे जाणार गुजरात दौ-यावर

खालील लेख म टा च्या सौजन्याने .....


गुजराती जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण करून सलग तिस-यांदा मुख्यमंत्री म्हणून निवडून आलेले नरेंद्र मोदी यांच्या मॅजिक ने भल्याभल्यांना भुरळ घातली असताना मनसे प्रमुख राज ठाकरे त्याला अपवाद कसे? मोदी मॅजिक नेमकी आहे तरी काय, ते तपशीलवार जाणून घेण्यासाठी राज ठाकरे येत्या ३ ते ११ ऑगस्टदरम्यान गुजरातभर फिरणार आहे.

राज यांच्या दौ-याची सुरुवात अहमदाबादजवळच्या महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमात अभिवादन करुन होईल. त्यानतंर राजधानी गांधीनगर येथे गुजरात सरकारचे अधिकारी राज यांच्यासमोर एक प्रेझेंटेशन सादर करणार आहे. यात गुजरातचा झपाट्याने होत असलेला औद्योगिक विकास, सेझ प्रकल्प, पर्यटन विकास, झोपडपट्टी पुनर्वसन योजना, जल पुनर्प्रक्रिया, जलसंधारण, रस्ते विकास, सौर, औष्णिक व पवन ऊर्जा, मुलींसाठीचे शिक्षण, विमा योजना आदी विषयांवर हे सादरीकरण व त्यानंतर चर्चा करण्यात येणार आहे.

अधिका-यांसोबत ही चर्चा आटोपल्यानंतर ३ ऑगस्टच्या सायंकाळी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज ठाकरे यांची विशेष चर्चा होईल. त्यानंतर ४ ऑगस्टपासून राज ठाकरे गुजरात दौ-यावर निघणार आहे. यात बडोदा, जामनगर, राजकोट, पोरबंदर, कच्छ, भरुच, आदी महत्त्वाच्या शहरांना भेट देऊन तेथील विविध विकास प्रकल्प पाहून त्याचे महत्त्व समजून घेणार आहे. यात गुजरातमधला सर्वात मोठा नर्मदा प्रकल्प, वनबंधू ग्राम योजना, राजकोट ऑटो इंजिनियरिंग, कंकरिया प्रकल्पाचा समावेश आहे.

नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये केलेल्या विकासाचे अवलोकन करून महाराष्ट्राच्या विकासासाठी ते येथे कसे राबवता येतील या हेतुने राज यांच्या गुजरात दौ-याची आखणी करण्यात आली असल्याचे मनसेकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, मुंबई शहरात गुजराती समाजाची मोठी संख्या आहे. राज ठाकरे यांच्या गुजरात दौ-यामुळे आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला राजकीय लाभ मिळू शकतो असे राजकीय निरिक्षकांचं मत आहे.

No comments:

Post a Comment