Sunday, November 29, 2009

निकृष्ट तूरडाळीच्या वाटपाविरोधात मनसेची गोदामावर धडक

सकाळ वृत्तसेवा
Saturday, November 28, 2009 AT 11:45 PM (IST)

कल्याण - कल्याण परिसरातील शिधावाटप केंद्रातून निकृष्ट दर्जाच्या तूरडाळीचे वितरण केल्याच्या तक्रारी कल्याण (प.) मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांच्याकडे आल्या होत्या. आज सकाळी मनसे आमदार भोईर यांनी कल्याण आधारवाडी येथील फूड कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या अन्नधान्याच्या गोदामावर धडक देऊन तूरडाळीची पाहणी केली. त्यातून निकृष्ट तूरडाळ पुरविण्यात येत असल्याचे उघड झाले. आमदारांच्या पाहणी मोहिमेची पुरवठा उपसंचालकांना दखल घ्यावी लागली. कल्याण परिसरातील शिधावाटपाच्या दुकानात तूरडाळीचे वाटप केले जाते. एक किलोसाठी ५५ रुपये मोजावे लागतात. साखर घेतल्याशिवाय तूरडाळ दिली जाणार नाही, अशी सक्ती केली जाते. शिधावाटप दुकानातून दिली जाणारी तूरडाळ निकृष्ट दर्जाची असल्याच्या तक्रारी आमदार भोईर यांच्याकडे आल्या होत्या. डाळीचा पुरवठा नेमका कोठून केला जातो, याची माहिती घेऊन आमदारांनी आधारवाडी येथील फूड कार्पोरेशन ऑफ इंडिया अन्नपुरवठा गोदामास मनसेच्या कार्यकर्त्यांसह धडक दिली. या वेळी गोदाम निरीक्षकाने गोदाम पाहण्यास मज्जाव केला. भोईर यांनी शिधावाटप अधिकारी सावंत यांच्याशी संपर्क साधला. त्या वेळी आमदारांना तूरडाळीचा दर्जा पाहण्याचा अधिकार असल्याचे सावंत यांनी सांगितले. आमदारांनी तूरडाळीची पाहणी केल्यावर ती निकृष्ट दर्जाची आढळले. हा प्रकार सुरू असताना पुरवठा उप-संचालक घटनास्थळी पोहचले. त्यांनी अनेक गोण्यातील तूरडाळ आमदारांनी दाखविली. काही गोण्यांत चांगली; तर काहींमध्ये निकृष्ट दर्जाची तूरडाळ आढळली. गोदामात १६ गोण्या तूरडाळ शिल्लक आहे. पाच गाड्या गेल्यावर केवळ तीन गाड्यांची नोंद केली जाते, असा आरोप आमदार भोईर यांनी केला. तूरडाळीचा पुरवठा हा सरकारी कंत्राटदाराकडून केला जातो. चांगली डाळच वितरित केली जाईल. निकृष्ट दर्जाची वितरित केलेली डाळ परत घेतली जाईल, असे आश्‍वासन अधिकाऱ्यांनी दिले. मात्र यात सुधारणा दिसून आली नाही, तर सरकारी गोदामे फोडण्याचे आंदोलन करण्याचा इशाराही भोईर यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment