Friday, November 27, 2009

'२६/११'च्या आठवणीने गहिवरली

मुंबई

26 Nov 2009, 1554 hrs IST

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
मुंबईकरांच्या मनात ' २६ / ११ ' च्या काळ्याकुट्ट आठवणींनी घर केलंय... दहशतवादी हल्ल्यातील १६६ बळींच्या आठवणीने मुंबईकरांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या... शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मेणबत्ती पेटवताना गहिवरून आले ... परंतु मुंबईचं आणि मुंबईकरांचं स्पिरीट कायम असल्याचा प्रत्यय आज पावलापावलावर दिसला। २६ / ११ च्या आठवणींनी गहिवरलेली मुंबई त्याच निमित्ताने एकवटल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. २६ नोव्हेंबर २००८ च्या काळरात्री दहशतवादी हल्ल्याने हादरलेल्या मुंबईच्या काळजाचा ठोका चुकला... पण काही मिनिटांसाठीच ! तीन-चार तासातच मायानगरी मुंबई पुन्हा धावू लागली... घड्याळाच्या काट्यासारखी ! आज त्या दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होतेय. या हल्ल्यात बळी पडलेल्या १६६ मुंबईकरांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईकर रस्त्यावर उतरले. ‘ हिंसाचार संपवा, कसाबला फाशी द्या॥ ’ असे फलक त्यांनी हातात धरले होते. दहशतवादाच्या निषेधार्थ आज एनसीपीए ते गिरगाव चौपाटी अशी परेड मुंबई पोलिसांनी काढली. पोलिस कमांडो, फोर्स वनचे कमांडो, त्यांची अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, आधुनिक संपर्क यंत्रणांनी सुसज्ज वाहने अशी मुंबई पोलिसांची सज्जता या परेडमध्ये पाहायला मिळाली. दहशतवादाशी दोन हात करण्यास मुंबई सज्ज असल्याचा थेट उलटा मेसेज यानिमित्ताने दहशतवाद्यांना पाठवण्यात आला. मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते. दहशतवाद्यांच्या हल्ल्याचे लक्ष्य ठरलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) स्टेशनमध्ये हजारो मध्य रेल्वे प्रवाशांनी २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांची आठवण म्हणून मध्य रेल्वेने स्मृती स्तंभच उभारला आहे. सेंट झेवियर्स कॉलेजच्या ज्या गल्लीत हेमंत करकरे, अशोक कामटे व विजय साळस्कर यांना वीरमरण आले, त्याठिकाणी अनेक मुंबईकरांनी मेणबत्त्या पेटवून व पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. मनसेच्या वतीने याठिकाणी शहीद पोलिसांचे कटआऊटस लावण्यात आले आहेत. त्याशिवाय काँग्रेसच्या वतीने शहीदांना श्रद्धांजली वाहणारे बॅनर्सही उभारण्यात आले आहेत. हॉटेल ताज, हॉटेल ट्रायडंट व नरिमन हाऊस या दहशतवादी हल्ल्यांच्या ठिकाणीही अनेकांनी भेटी देऊन बळींच्या आठवणींना श्रद्धांजली वाहिली. संसदेच्या दोन्ही सभागृहात तसेच कानपूर येथे सुरू असलेल्या भारत-श्रीलंका टेस्ट सामन्याचा खेळ सुरू होण्यापूर्वी २६ नोव्हेंबर हल्ल्यातील बळींना आदरांजली अर्पण करण्यात आली.

No comments:

Post a Comment