Tuesday, July 26, 2011

पाहुण्याची वाट कशाला पाहता?- राज

खालील लेख म टा च्या सौजन्याने ........................



नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या सोयी-सुविधांचे उद्घाटन करण्यासाठी प्रमुख पाहुण्याची वाट पाहात थांबू नका, काम पूर्ण झाल्यावर त्याचे उद्घाटन करा आणि मोकळे व्हा, असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नगरसेवकांना दिला.

पुणे महापालिकेतर्फे प्रभाग क्र. ६३ वनाज कंपनी भागात नव्याने विकसित करण्यात आलेल्या कै. सचिन बाळासाहेब आंग्रे उद्यानाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला महापौर मोहनसिंग राजपाल, मनसेचे पालिकेतील गटनेते रवींद्र धंगेकर, नगरसेवक किशोर शिंदे, मनसेचे शहराध्यक्ष प्रकाश ढोरे आदी उपस्थित होते.

' पुणे शहराच्या गरजा वाढत आहेत. याचे भान सर्व पक्षांनी ठेवायला हवे. शहरातील नागरिकांना मैदाने, बागा आदी सुविधा मिळाल्या नाहीत तर वाढत्या लोकसंख्येबरोबर येथील रोगराईही वाढेल. त्यामुळे नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी नगरसेवकांची आहे. पालिकेकडून नागरिकांसाठी उभारण्यात येणा-या सुविधांच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुण्याची प्रतीक्षा न करता त्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करा,' असे ठाकरे यावेळी म्हणाले.

' महापालिकेच्या राखीव असणाऱ्या जागांवर बागा, मैदाने करा. नागरिक सर्व प्रकारचे कर भरता आहेत, त्यांच्या मोबदल्यात त्यांना शुल्लक गोष्टी मिळत नसतील तर ती सत्ता चाटायची आहे का? निवडणूक लढवून उपयोग काय?,'असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

पुण्या-मुंबईत बिल्डर मोठ्या सोसायट्या उभ्या करताना त्याठिकाणी बाग, स्विमिंग पूल, जॉगिंग टॅक या सुविधा देऊ असे सांगतात. वास्तविक पाहाता या सुविधा महापालिकेने द्यायला हव्यात मात्र, ते बिल्डरला विकावे लागत आहे. पुणे आता मोठे शहर होत आहे. अनेक भागातले लोक पुण्यात राहायला येत आहेत. लोकसंख्या आणि वाढत्या रोगराईमुळे हॉस्पिटल हा धंदा म्हणून पुढे येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

मराठी मातीत मिसळा....

महापौरासारखी मराठी मातीत मिसळणारी माणसे हवीत. जी माणसे मराठी संस्कृती समजून घेत नाहीत त्या माणसांना कुठे लाथ मारायची हे माहीत असल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले.

Friday, July 22, 2011

मनसे आमदार दालनाबाहेरच!

खालील लेख म टा च्या सौजन्याने .....


गिरणी कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी गेले महिनाभर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे वेळ मागत होतो. परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने शेवटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट मागितली व ती त्यांनी तातडीने दिली. मात्र त्याचवेळी मुख्यमंत्र्यांच्या दालनात त्याच विषयावर चर्चा असल्याने पवार यांच्या सूचनेवरून मुख्यमंत्र्यांकडे चचेर्साठी गेलो. मुख्यमंत्र्यांनी भेट सोडाच, उलट दालनात बसवून ठेवले, असा आरोप मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी केला. तर आपण चचेर्साठी बोलविले होते. पण ते निघून गेले, असा खुलासा मुख्यमंत्री चव्हाण यांनी केला.

पाचवेळा मी गिरणगावातून निवडून येत असल्याने आम्हाला गिरणी कामगारांच्या प्रश्ानंची जाण आहे. त्यामुळे त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी गेले महिनाभर आम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ मागत होतो. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने उपमुख्यमंत्र्यांची वेळ मागितली. त्यांनी चचेर्ची वेळ दिली. त्यानंतर गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नसल्याने त्यांचे गिरणी कामगारांच्यावतीने आभार मांडण्यासाठी बुधवारी मी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात गेलो, असे मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी आम्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे कळताच मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने गुरुवारी गिरणी कामगारांच्या घरासंदर्भात बैठक लावली, गुरुवारी उपमुख्यमंत्री पवार यांचा आम्हाला फोन आला, मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे, तुम्ही प्रथम त्यांच्यापुढे गिरणी कामगारांचे प्रश्न मांडा, असे त्यांनी सांगितल्यानेच तेथे गेलो, असे नांदगावकर म्हणाले.

..........................................

मुख्यमंत्री काय चेस खेळतात?

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना गिरण्यांच्या प्रश्नांवर मनसेच्या आमदारांना चर्चा करण्यासाठी वेळ नाही. आमदारांचा अवमान करतात. परंतु त्यांचा अवमान करण्याची संधीही आम्हाला मिळेल, असा टोला मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी लगावला. मुख्यमंत्री जनतेच्या प्रश्नासाठी वेळ देत नाहीत तर ते काय वर्षा बंगल्यावर चेस खेळत असतात की काय, अशी खोचक टीका राज यांनी केली.



खड्ड्यांचा वाद रस्त्यावर!

मुजोर महापौर आणि उदासीन प्रशासनाचा धिक्कार असो .........


खालील लेख म टा च्या सौजन्याने ....


कल्याण - डोंबिवलीतील रस्त्यांनापडलेल्या खड्ड्यांच्यामुद्द्यांवरून गुरुवारी मनसे आणिशिवसेनेच्या कार्यकर्त्यांत तुंबळजुंपली . खड्ड्यांविरोधातआंदोलन पुकारणाऱ्यामनसैनिकांनी महापौरांविरोधातघोषणाबाजी केल्याने त्यांनीपालिकाविरोधात शहरभरझळकवलेले बॅनर काढूनटाकण्याचे आदेश दिले .

त्यामुळे संतापलेल्या मनसैनिकांनी महापौरांना अडविल्याने दोन्ही सेना एकमेकांसमोरउभ्या ठाकल्या . धक्काबुक्कीनंतर प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्यानंतर एकमेकांविरोधातगुन्हा दाखल करण्याचा निर्णय झाल्याने अखेर दोन्ही सेना माघारी फिरल्या .

शहरातील रस्ते मृतवत झाल्याचा आरोप करीत मनसेच्या रस्ते आस्थापनाविभागातर्फे गुरुवारी डोंबिवलीत रस्त्यांचे श्राद्ध घालण्याचे आंदोलन करण्यात आले .आंदोलनादरम्यान मनसैनिकांनी महापौर वैजयंती गुजर पालिका प्रशासनाविरोधातजोरदार घोषणाबाजी केली . याबाबत माहिती मिळताच महापौर डोंबिवलीत दाखलझाल्या , मात्र तोपर्यंत मनसैनिकांचे आंदोलन संपुष्टात आले होते . त्यामुळेमनसैनिकांनी रस्त्यांच्या दुर्दशेबद्दल महापालिकेविरोधात शहरभर झळकवलेले बॅनर होर्डिंग तातडीने काढून टाकण्याचा आदेश प्रशासनाला दिला .

महापौरांच्या आदेशामुळे पालिका कर्मचाऱ्यांनी लगेचच मनसेची होर्डिंग उतरविली .ही माहिती मिळताच संतापलेल्या मनसैनिकांनी शहराध्यक्ष राजेश कदम यांच्यानेतृत्वाखाली इंदिरा गांधी चौकात महापौरांना अडविले . तिथे महापौर मनसैनिकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली . ' आंदोलन करतानामहापौरांविरोधात घोषणाबाजी करण्याची गरज काय ?', असा संतप्त सवाल वैजयंतीगुजर यांनी केला . तर ' दीड महिन्यांपूर्वी खड्ड्यांच्या मुद्द्यावर मनसैनिकांनी पालिकाअधिकाऱ्यांविरोधात आंदोलन केले , त्यावेळी तुम्हीच प्रशासनाला पाठीशी घालतमनसैनिकांवर गुन्हे दाखल करणे भाग का पाडले ?', असा सवाल राजेश कदम यांनीकेला .

या चकमकीची बातमी डोंबिवलीत वेगाने पसरली त्यामुळे दोन्ही सेनांचे पदाधिकारीघटनास्थळी जमा झाले . शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे , माजी शहरप्रमुखसदानंद थरवळ , आमदार रवींद्र चव्हाण , महिला आघाडीप्रमुख स्मिता बाबर तरमनसेकडून आमदार रमेश पाटील , विरोधी पक्षनेत्या वैशाली दरेकर , राहुल कामतआदी समोरासमोर उभे ठाकल्याने वातावरण तंग झाले होते . हा जमाव पाहून इंदिरागांधी चौक परिसरातील दुकानदारांनी दुकाने बंद केली . तोपर्यंत रामनगर पोलीसहीघटनास्थळी दाखल झाले .

पोलिसांच्या उपस्थितीतच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत धक्काबुक्की सुरू झाली . प्रकरणहाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी सर्वांना पोलीस स्टेशनला आणले. तिथेही घोषणाबाजी सुरू झाल्याने परिस्थिती चिघळण्याची चिन्हे दिसू लागली .परंतु मनसेचे आमदार रमेश पाटील यांनी मध्यस्थी करत दोन्ही पक्षांच्यापदाधिकाऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले तणाव निवळला .

महापौरांच्या राजीनाम्याची मागणी

मनसेचे शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी महापौर वैजयंती गुजर यांचा राजीनाम्याचीमागणी केली असून मनसेचे नगरसेवक सभागृहात शिवसेनेला सहकार्य करणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे . तर मनसैनिकांनी अकारण आंदोलने करू नयेत ,असे गुजर यांनी म्हटले आहे.

Wednesday, July 20, 2011

विभाग अधिकाऱ्याला मनसे नगरसेवकांनी नाल्यात बुचकळले

खालील बातमी लोकसत्ता च्या सौजन्याने ....



कल्याण परिसरातील नालेसफाईच्या पहाणीसाठी निघालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी आज उद्धट वर्तन करणारे महापालिकेचे विभाग अधिकारी काशीनाथ पडवळ यांना थेट नाल्यातील सांडपाण्यात बुचकळून बाहेर काढल्याने महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली. ‘माझी आता बदली झाली आहे, त्यामुळे एक पेग मारुन येतो’, असे उद्गार काढल्यानेच पडवळ यांना नाल्यात ढकलल्याची सारवासारव या घटनेनंतर मनसेच्या नगरसेवकांना करावी लागली. दरम्यान, महापालिका वतुळात मात्र या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विशेष म्हणजे, यावेळी संतापलेल्या मनसे नगरसेवकांनी आरोग्य निरीक्षक प्रशांत पुरी यांच्यावरही दांडगाई करत त्यांनाही गटाराच्या चेंबरमध्ये फावडे घेउन गाळ साफ करण्यासाठी उतरवून दांडगाईचे प्रदर्शन घडविले.
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या वैशाली दरेकर-राणे, मनसेचे गटनेते नरेंद्र गुप्ते व महापालिकेतील पक्षाचे अन्य नगरसेवक ‘ब’ प्रभागात सकाळपासून नाले सफाईची पाहणी करीत होते. ‘ब’ प्रभागात अनेक ठिकाणी नाले, गटारे तुंबले असल्याचे व जागोजागी पाणी साचल्याचे पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे संतापलेल्या दरेकर आणि गुप्ते यांनी मोबाईल करून प्रभाग अधिकारी पडवळ यांना घटनास्थळी बोलविले. पाऊण तासानंतर पडवळ व त्यांचे साथीदार घटनास्थळी आले. नालेसफाई झाली नाही, सर्वत्र पाणी तुंबले आहे, तुम्ही काय करता अशी प्रश्नांची सरबत्ती मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पडवळ यांच्यावर केली. मात्र, पडवळ यांनी तो विषय हसण्यावारी नेऊन ‘आता कुठे पाऊस पडतो आहे. माझी बदली झाली आहे. एक पेक मारून आता झोपणार अशी’ असे वक्तव्य केल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. या वक्तव्यामुळे संतापलेल्या मनसे नगरसेवकांनी पडवळ यांना थेट नाल्यातच ढकलले. नाल्यातील सांडपाण्यात बुचकळून पडवळ यांना बाहेर काढले.
पडवळ यांना हिसका दाखविल्यानंतर सहाय्यक आरोग्य निरीक्षक पुरी याला गटारातील चेंबरमध्ये उतरविण्यात आले. तेथील गाळ उपसण्यास पुरी यांना भाग पाडण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी वैशाली दरेकर यांच्याशी संपर्क साधला असता पडवळ यांना नाल्यात बुचकळून बाहेर काढण्यात आलेले नाही, अशी माहिती दिली. लहानसे गटार होते, त्यात त्यांना ढकलण्यात आले. या गटारात त्यांचा पाय अडकला, असे दरेकर म्हणाल्या. पडवळ यांनीही नाल्यात बुचकळल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे.

Monday, July 18, 2011

बातमी लिहिण्याचे धडे देणार राज ठाकरे

खालील लेख स्टार माझा च्या सौजन्याने ......



मुंबईत बॉम्ब स्फोट झाल्यावरही परप्रांतीयांवर आसूड उगारणाऱ्या ‘संपादक’ राज ठाकरे यांनी बातमी कशी लिहावी, कशी समजून घ्यावी याचे धडे आज पत्रकार परिषदेत दिले. मुंबईतील बॉम्ब स्फोट हे परप्रांतीयामुळेच होतात, असा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला.
raj thackeray
raj thackeray
मुंबईत १३ जुलैला झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर हे बॉम्ब स्फोट परप्रांतीयांमुळेच झाले असल्याचे राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. या वृत्ताचा मीडियाने विशेषतः हिंदी चॅनल्सने कसा विपर्यास केला या संदर्भात स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिले.
मुंबईत झालेले बॉम्ब स्फोट हे उत्तर भारतीयांमुळे नाही तर त्या येणाऱ्या लोंढ्यामुळे झाले असल्याचे त्यांनी सांगितले. यात सर्व उत्तर भारतीयांना मी दोषी धरत नाही. परंतु आज उत्तर भारतातून ४८ रेल्वे मुंबईत येतात. कोण येतो, कुठं जातोय. कोणाचा कोणाला थांगपत्ताच नाही. त्यात दहशतवादीही आले असतील, याचा कोणी विचार केलायं का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मी प्रतिक्रिया दिल्यानंतर यांचं टायमिंग चुकलंय. आता लोंढ्याचं राजकारण करण्याची गरज आहे का, अशा बातम्या छापून आल्या. मी काय म्हटलो, हे नीट समजून न घेता विनाकारण बातम्या ट्विस्ट करून दिल्या जातात. बातमी नीट समजून घ्या, असाही संपादकीय सल्ला राज ठाकरे यांनी यावेळी दिला.

अबू आझमीची चौकशी करा
बॉम्ब स्फोटांच्या वेळीच या अबू आझमीला उत्तर भारतीयांचा का कळवळा येतो. त्याच वेळी तो प्रतिक्रिया द्यायला येतो. पोलिसांच्या तपासला वेगळे वळण देण्यासाठी अबू आझमी हे उद्योग करतो. पहिले त्याची चौकशी करा. यापूर्वीही बॉम्ब स्फोटाप्रकरणी त्याची चौकशी झाली आहे. सरकारने अशा गोष्टीकडे लक्ष न देता पोलिसांना तपासाचे स्वातंत्र्य द्यावे, अशीही सूचनाही त्यांनी यावेळी केली.

गृह खाते काँग्रेसकडे असते तर दहशतवादी घाबरले असते
गृहखाते राष्ट्रवादीला देणे घोडचूक होती, या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत राज ठाकरे म्हटले. गृहखाते काँग्रेसकडे असते तर काय दहशतवादी घाबरले असते. नको नको बाबा, गृहखाते काँग्रेसकडे आहे. असे म्हटले असते. स्वतःच्या अपयशाचे बोट दुसऱ्याकडे दाखवण्याचा प्रकार आहे. सत्ता तुमची आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही सत्तेत आहेत, असे दुसऱ्याकडे बोट दाखवणे योग्य नाही.

कामतांना नंतर सुचलेले शहाणपण
माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री गुरूदास कामत यांच्यावरही टीकेची झोड उठवत राज ठाकरे म्हणाले, कामत यांचं मंत्रीपद गेल्यामुळे त्यांना आता राज्य सरकारचं अपयश दिसत आहे. त्यांना नंतर सुचलेले शहाणपण आहे.

आर. आर. आबा लक्ष कुठेयं
काल एका वर्तमान पत्रात पोलिसांची उलटी पडलेली स्पीड बोट पाहिली. तसेच ठाण्याच्या पोलिसांकडे बॉम्बचा सूट नाही. हे आर. आर. पाटील करतायं काय त्याचं कुठे लक्ष आहे. पक्षाच्या अंतर्गत राजकारणातचं त्यांचं लक्ष दिसतयं, असा टोलाही त्यांना लगावला.

पोलिस भरती करतायं का कपडे शिवताहेत

पोलिसांची संख्या कमी आहे. दरवेळा ओरड असते. पोलिसांची भरती होते, तेव्हा छाती फुगवलेल्या तरुणाचे फोटो छापून येता. कुठे गेल्या त्या छात्या. असा सवाल उपस्थित करून राज ठाकरे म्हणाले, पोलिस भरती करताहेत का छात्यांची मापं घेऊन कपडे शिवताहेत. पोलिसांमध्ये माणसं भरू शकत नसाल, तर काय करताहेत तुम्ही. याचं लक्ष फक्त सूत गिरण्या, साखर कारखान्यांमध्ये आहे. बाकीकडे लक्ष द्यायला यांना वेळ नाही.

मायवती आपल्या घराकडे लक्ष द्या

मायवतींना आपले राज्याकडे लक्ष द्यावे, त्यांना बोलायला काय जातं आहे. माझ्या टीका करण्यापेक्षा आपल्या राज्याकडे लक्ष द्या. मायावती म्हणतात, मुंबईत उत्तर भारतीयांना लोकांना घरं दिले पाहिजे, मग तुम्ही द्या घरं. स्वतः सत्तेवर बसायचं आणि दुसऱ्याला बोलायचं.

नीतिश कुमारांच कौतुक
नीतीश कुमार यांनी केला ना बिहारचा विकास. बिहारमधून बाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. औद्योगिक विकास केला, असे कौतुक राज ठाकरे यांनी केले आहे.

उस्मानीच्या चौकशीत गैर काय? - राज ठाकरे

खालील बातमी म टा च्या सौजन्याने ..........................


फैज उस्मानी जेलमध्ये असलेल्या एका दहशतवाद्याला सातत्याने भेटत होता. अशा परिस्थितीत मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात पोलिसांनी संशयावरुन फैजची चौकशी केली तर त्यात गैर काय? ... या फैजचा अबू आझमी यांना एवढा कळवळा का ?गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचीच अबू आझमी यांना एवढी सहानूभूती का वाटते ?, असे सवाल आज (सोमवारी) राज ठाकरे यांनी उपस्थित केले.

मुंबईत घडणा-या गुन्ह्यांमध्ये ७० ते ८० लोकं उत्तर प्रदेश आणि बिहार पट्ट्यातील असतात. तिथून दररोज ४८ गाड्या मुंबईत येतात. अशा परिस्थिती सुरक्षेच्या दृष्टीकोनातून येणा-या लोंढ्यावर लक्ष ठेवणं आवश्यक असल्याचे राज यांनी सांगितले.

दहशतवादी कारवाया रोखायच्या असतील तर मुंबईत बाहेरुन कोण येतं ? , का येतं ?हे बघायलाच पाहिजे. दहशतवाद्याच्या संपर्कात असलेल्या फैज सारख्याची बाजू घेणा-या अबू आझमीचीच चौकशी व्हायला पाहिजे, असेही राज ठाकरे म्हणाले.

दहशतवाद रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम हवीच. ही यंत्रणा सक्षम करण्याची जबाबदारी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचीच आहे. जर ते आपलं काम योग्य प्रकारे करत नसतील तर त्यात लक्ष घालण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहे.

मुंबईच्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस कमी आहेत. त्यांच मनुष्यबळ वाढवायला हवं हे गृहमंत्र्यांना माहिती आहे. मग एवढे दिवस ते काय करत होते ? ठाणे जिल्ह्यात पोलिसांकडे बॉम्ब शोधक पथक नाही. समुद्रात गस्त घालायला स्पीड बोट आहेत पण पेट्रोल नाही. ही अशी परिस्थिती निर्माण होईपर्यत गृहखातं काय करत होतं ? , अशा शब्दात राज यांनी गृहमंत्र्यांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित केले.

गृहखातं कोणाकडे आहे यापेक्षा ते कशा प्रकारे काम करतं हे महत्त्वाचं आहे. गृहमंत्री राष्ट्रवादी ऐवजी काँग्रेसचा असता तर काय दहशतवादी घाबरणार होते ? साखर कारखाने आणि सूत गिरण्या चालवणे, एकमेकांची उणीदुणी काढणे हे असलं राजकारण करण्यापेक्षा सुरक्षा यंत्रणा मजबूत करा. दहशतवादाशी लढायच असेल, देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा सुधारायची असेल तर आधी अंतर्गत व्यवस्थेत सुधारणा करा, असे राज यांनी सांगितले.

Wednesday, July 13, 2011

कल्याण-डोंबिवलीचा पुरस्कार 'खड्ड्यांत' पाठवा!

चला खासदार साहेबांना उशिरा का होईना जाग आली .....

खालील लेख म टा च्या सौजन्याने ....................


कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांची खडड्यांमुळे पुरती चाळण झाली असताना , कल्याण-डोंबिवली महापालिकेला उत्कृष्ट रस्त्यांचा पुरस्कार मिळतो
हा येथील नागरिकांचा अपमान आहे. शिवसेनेकडे महापालिका असताना सेनेचेच खासदार सांगताहेत
, की हा पुरस्कार परत करा. तुम्हीही पुढे या आणि या पुरस्काराला ' खड्ड्यांत ' पाठवा...

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्यसंस्थेने उत्कृष्ट रस्त्यांसाठीचा हा राष्ट्रीय पुरस्कार कल्याण-डोंबिवली महापालिकेला का दिला ? हे न उमगणारे कोडे आहे. प्रत्यक्षात निकृष्ट रस्त्यांवरूनपालिकेच्या तीन वरिष्ठ अधिका-यांना आयुक्तांनी ' कारणे दाखवा ' नोटीस बजावलीआहे . तरीदेखील पालिकेला हा पुरस्कार मिळाल्याने स्थानिकांमध्ये आपली क्रूर थट्टाझाल्याची भावना बळावली आहे .

शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे यांनीही हा पुरस्कार स्वीकारल्याबद्दल सेनेचीच सत्ता असलेल्या महापालिकेचे कान उपटले आहेत. रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि नागरिकांमध्ये उमटलेली तीव्र प्रतिक्रिया पाहता केडीएमसीने उत्कृष्ट रस्त्यांसाठीचा हा नगररत्न पुरस्कार स्वतःहून परत करावा असे , परांजपे यांनी सांगितले आहे.

नागरिकांची ही चेष्टा थांबायला हवी असे वाटत असेल , तर तुम्हीही पुढे व्हा. ज्या राष्ट्रीय संस्थेने हा पुरस्कार दिला , त्यांना कळू दे की येथील रस्त्यांची अवस्था काय आहे ते ? त्यासाठी एवढेच करा की कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवरील खड्ड्यांचे ,तेथील अतिक्रमाणांचे , दुरावस्थेचे फोटो या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्यसंस्थेला खालील पत्त्यावर पाठवा. फोटो शक्य नसेल तर किमान चार ओळींचे पत्र लिहून आपल्या भावना कळवा.... (त्याची एक क़ॉपी आम्हालाहीteammtonline@gmail.com या पत्यावर पाठवा)

अशी आहे कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांची अवस्था (फोटोफीचर)

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट
एम. एन. रॉय ह्युमन डेव्हलपमेंट कॅम्पस ,
प्लॉट नं. ६ , एफ-ब्लॉक , वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स ,
टीपीएस मार्ग क्र. १२ , टिचर्स कॉलनीच्या मागे ,
वांद्रे (पूर्व) , मुंबई- ४०००५१
ई-मेल- dgaiilsg@gmail.com

हास्यास्पद .....

शिवसेनेच्या महापौरांना राष्ट्रपतींच्या हस्ते कसला पुरस्कार मिळणार होता तेच माहित नव्हते ..... आयला कल्याणकर आणि डोम्बिवली कर काय बोळ्याने दुध पितात की काय ???? कैच्याकै ..............................

आपला

विनोद


खालील लेख लोकसत्ता च्या सौजन्याने ........


पुरस्कार कसला हे व्यासपीठावर जाईपर्यंत माहीतच नव्हते

महापौर वैजयंती गुजर यांची मुक्ताफळे
कल्याण/प्रतिनिधी

कल्याण डोंबिवली पालिकेला राष्ट्रपतींच्या हस्ते एक पुरस्कार मिळणार असून तो पुरस्कार आपण स्वीकारणार आहोत एवढेच मला माहिती होती. पुरस्कार स्वीकारण्याच्या व्यासपीठावर जाईपर्यंत तो पुरस्कार कसला आहे. हे आपणास माहिती नव्हते. आताच्या रस्त्यांसाठी तो पुरस्कार असता तर आपण त्याचा विचार केला असता. शेवटी महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण असल्याने आपण त्या पुरस्काराची विचारणा केली नाही, असे महापौर वैजयंती गुजर यांनी अहमदाबाद येथून ‘ठाणे वृत्तांत’शी मोबाईलवरून बोलताना सांगितले.
अहमदाबाद शहराला उत्कृष्ट नगररचनेचा पुरस्कार मिळाला आहे. आपण आता त्या शहरातच आहोत. येथील सर्व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. म्हणजे त्यांनी हा पुरस्कार स्वीकारूच नये का? असा प्रश्न करून महापौर गुजर म्हणाल्या, कल्याण डोंबिवली पालिकेला २००९-२०१० या काळात केलेल्या उत्तम रस्त्यांसाठी नागर रत्न पुरस्कार मिळाला आहे. त्या काळात शहरातील रस्ते चांगले होते. म्हणून तो पुरस्कार स्वीकारण्यात आला. व्यासपीठावर जाईपर्यंत आपणास पुरस्कार कसला मिळणार हे माहिती नव्हते, असे महापौर गुजर यांनी सांगितले.
दरम्यान, पालिकेतील काही सुत्रांनी सांगितले, पुरस्कार मिळण्यापूर्वी चार ते पाच दिवस अगोदरच पालिकेत पत्र आले होते. ते महापौरांना प्रशासनाने दाखविले नव्हते का? त्या पत्रावर कशासाठी पुरस्कार हे स्पष्ट अधोरेखीत असेल. म्हणजे महापौर गुजर यांना प्रशासन अंधारात ठेवत आहे असे दिसून येत आहे. कल्याणमधील रोटरी क्लबच्या कार्यक्रमात महापौरांनी पालिकेला पुरस्कार मिळणार असून तो आपण स्वीकारणार असल्याचे कौतुकाने जाहीर केले होते, असे या कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांनी सांगितले.
आताच्या रस्त्यांसाठी तो पुरस्कार असता तर आपण त्याचा विचार केला असता असे सांगणाऱ्या महापौर गुजर यांनी अलीकडेच कल्याणमधील रोटरी क्लबच्या कार्यक्रमात पालिकेला पुरस्कार मिळणार असून तो आपण स्वीकारणार असल्याचे कौतुकाने जाहीर केले होते.

मनसेने बसवले कंत्राटदाराला खड्डय़ात!

खालील लेख लोकसत्ता च्या सौजन्याने ........................


मुंबईतील पूर्व द्रुतगती तसेच पश्चिम द्रुतगतीमार्गावरील जवळपास प्रत्येक उड्डाणपुलावर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले असून त्याचा मोठा फटका मुंबईकरांना बसत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज दादर पश्चिम येथील राम गणेश गडकरी उड्डाण पुलावरच खड्डे बुजविण्याचे कंत्राट घेतलेल्या एका कंत्राटदाराला चांगला चोप देऊन खड्डय़ात बसवून ठेवले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अलीकडेच लालबाग येथील उड्डाणपुलाचे उद्घाटन केल्यानंतर अवघ्या काही दिवसातच या नव्या उड्डाण पुलावर खड्डे पडले. यामुळे प्रचंड टीका झाल्यानंतर खडबडीने जागे झालेल्या मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या या कामाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या चौकशीतून काय निष्पन्न झाले ते अद्यापि जाहीर झाले नसले तरी मुंबईतील जवळपास प्रत्येक उड्डाणपुलावर पावसामुळे मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. यातील बहुतेक उड्डाण पुलांची कामे एमएमआरडीएने केली असून खड्डे बुजविण्याची जबाबदारी पालिकेच्या माथी मारण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दादरचा राम गणेश गडकरी उड्डाण पूल हा थेट पालिकेच्या केईम रुग्णालयाजवळ जात असून या उड्डाण पुलावरील खड्डे तात्काळ दुरुस्त करावे अशी लेखी विनंती मनसेच्या दादर येथील उपविभागअध्यक्ष अमेय खोपकर यांनी संबंधित कंत्राटदाराकडे गेल्या आठवडय़ात केली होती. मनसेच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार या कंत्राटदाराला एकूण चाळीस उड्डाण पुलावरील खड्डे बुजविण्यासाठी आठ कोटी नव्वद लाखांचे कंत्राट पालिकेने दिले होते. मात्र त्याने मनसेच्या लेखी निवेदनाला दाद न दिल्यामुळे अमेय खोपकर यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी या कंत्राटदाराची गचांडी धरून त्याला गडकरी पुलावर नले. तेथे त्याला भरपूर चोप देण्यात आला तसेच उठाबशाही काढायला लावल्या. यानंतर या कंत्राटदाराला उड्डाणपुलावरील खड्डय़ात बसविण्यात आले. या उड्डाण पुलावर किमान पन्नास खड्डे असल्याचे खोपकर यांनी सांगितले. कंत्राटदाराप्रमाणेच एमएमआरडीए तसेच पालिकेच्या सनदी अधिकाऱ्यांना झटका देण्याची खरी गरज असल्याचे मनसेच्या एका सरचिटणीसाने सांगितले. मोठ मोठी कंत्राटे देताना कामाचा दर्जा तसेच ते योग्य प्रकारे होत आहे अथवा नाही, हे आयएएस अधिकारी कधीतरी पाहणार आहेत की नाही, असा सवालही या सरचिटणीसाने केला. राज्यातील बहुतेक सनदी अधिकारी वेळोवेळी परदेशात जात असतात. तेथील रस्त्यांप्रमाणे किमान पंधरा वर्षे टिकेल, असा एकही रस्ता आजपर्यंत का बांधण्यात आलेला नाही, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. सामान्य रस्ते वेळोवेळी विविध कामांसाठी खणावे लागतात. तशी स्थिती उड्डाणा पुलांची नसते. मात्र त्यावरही खड्डे पडणे ही गंभीर बाब असून केवळ कंत्राटदारालाच नव्हे तर संबंधित विभागाच्या सर्वोच्च अधिकाऱ्याला त्यासाठी जबाबदार धरले पाहिजे असे अमेय खोपकर म्हणाले.

Tuesday, July 12, 2011

कल्याण-डोंबिवलीतील हे खड्डय़ांतील रस्ते

खालील लेख लोकसत्ता च्या सौजन्याने .....



भगवान मंडलिक - मंगळवार, १२ जुलै २०११
bhagwan.mandlik@expressindia.com
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर कल्याण-डोंबिवली परिसरातील रस्त्यांना ‘सिंगापूर टच’ देण्याच्या वल्गना करत कोटय़वधी रुपयांचा खर्च करणाऱ्या महापालिकेतील अभियांत्रिकी विभागाचे पितळ आता उघडे पडू लागले असून अवघ्या दोन वर्षांपूर्वी तयार केलेले चकाचक रस्ते यावर्षी पहिल्याच पावसात शरपंजरी पडल्याचे चित्र दिसू लागले आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विकास योजनेच्या माध्यमातून साधारण दोन वर्षांपूर्वी महापालिकेने डोंबिवली स्थानक, मानपाडा, मुरबाड रोड भागांत रस्त्यांना नवा मुलामा चढविण्याचा प्रयत्न केला. याच रस्त्यांच्या जोरावर अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून थेट देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पुरस्कारही पदरात पाडून घेतला. प्रत्यक्षात जे रस्ते पाहून या पुरस्काराकरिता शिफारस करण्यात आली, त्यापैकी बहुतांश रस्त्यांची वर्षभरातच खराब अवस्था झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राष्ट्रपतींच्या हस्ते मोठय़ा ऐटीत पुरस्कार स्वीकारणाऱ्या महापौर आणि आयुक्तांवर सध्या नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.
२००९-१० या काळात कल्याण-डोंबिवली पालिकेने चांगले रस्ते केल्याबद्दल पालिकेला अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा ‘नागररत्न’ पुरस्कार राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते नुकताच मिळाला. हा काळ साधारपणे महापालिका निवडणुकीचा होता. शहरातील रस्ते चहूबाजूंनी पोखरले गेल्याने सत्ताधारी चांगलेच अडचणीत सापडले होते. याच काळात जवाहरलाल नेहरू अभियानाचा ‘ताजा’ पैसा उपलब्ध होत असल्याने माजी आयुक्त गोविंद राठोड यांच्या पुढाकाराने शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांना नवा मुलामा चढविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
निवडणुका तोंडावर आल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार एकनाथ िशदे यांनीही याकामी पुढाकार घेतला. यासाठी खास विदेशी तंत्रज्ञानाचा उपयोग करत नवे रस्ते तयार करण्याचे नक्की करण्यात आले. शहरातील दोन-चार रस्ते देखावा म्हणून चांगले करण्यात आले. निवडणुकांच्या तोंडावर रात्रीचा दिवस करून कल्याण-डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरातील रस्ते सिंगापूर धर्तीचे करण्यात आले. याच रस्त्यांच्या आधारे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून पुरस्कारासाठी शिफारसही करण्यात आली आणि पुढे तो पटकाविण्यात आला. प्रत्यक्षात हा पुरस्कार ज्या रस्त्यांच्या आधारे मिळाला आहे, तेथील सध्याची परिस्थिती अत्यंत भीषण बनली असून बहुतांश या सर्व रस्त्यांची आता वाताहत झाली आहे.
पालिकेतील एका अधिकाऱ्याचे सध्या ‘आयएएस नॉमिनेशन’ मंत्रालयात प्रलंबित आहे. हा अधिकारी राष्ट्रपतींच्या मूळ मतदारसंघाच्या आसपासचा आहे. बढतीच्या या फाईलला एक ‘झालर’ म्हणून या पुरस्काराचा वापर करण्याचा प्रयत्नही जोमाने सुरू असल्याची चर्चा आहे. चार महिन्यांपूर्वी ६४ कोटी खर्च करून शहरातील रस्त्यांची पावसाळ्यापूर्वी योग्य डागडुजी करण्याचा एक प्रस्ताव मंजूर करण्यात आला. महापौर वैजयंती गुजर यांनी रस्त्यांची सध्याची अवस्था पाहून पावसाळ्यात डांबरीकरणाची कामे करू नयेत, असे आदेश दिले आहेत. या पाश्र्वभूमीवर उत्तम रस्त्यांसाठी महापौर-आयुक्तांनी स्वीकारलेला पुरस्कार हास्यास्पद ठरू लागला आहे.
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विकास योजनेच्या माध्यमातून साधारण दोन वर्षांपूर्वी महापालिकेने डोंबिवली स्थानक, मानपाडा, मुरबाड रोड भागांत रस्त्यांना नवा मुलामा चढविण्याचा प्रयत्न केला. याच रस्त्यांच्या जोरावर अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून थेट देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पुरस्कारही पदरात पाडून घेतला. प्रत्यक्षात जे रस्ते पाहून या पुरस्काराकरिता शिफारस करण्यात आली, त्यापैकी बहुतांश रस्त्यांची वर्षभरातच खराब अवस्था झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
खराब असलेले रस्ते
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा, कोळसेवाडी, काटेमानिवली रस्ता, मुरबाड रोड, पत्रीपूल ते दुर्गाडी पूल, संतोषी माता रोड, नांदिवली रोड, आयरे रोड, गरीबाचावाडा, महाराष्ट्रनगर, नवापाडा, गणेशनगर, मोठागाव, मानपाडा रोड.
नागरिक काय म्हणतात
भाऊ साठे - पुरस्कार देण्यापूर्वी पुरस्कार जाहीर करणारी निवड समिती कधी कल्याण-डोंबिवलीत आली होती का? या समितीने आता या शहरांमध्ये यावे. रस्त्यांच्या वाईट परिस्थितीमुळे घराबाहेर पडणे नको वाटते. अशी परिस्थिती असताना पालिकेला स्वच्छ सुंदर रस्त्यांसाठी पुरस्कार शासन देणार असेल तर त्या पुरस्काराची, देणाऱ्याची ती क्रूर थट्टा आहे. राष्ट्रपतींचा हा अवमान आहे. जनता या रस्त्यांमुळे त्रस्त झाली आहे. लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम या पुरस्काराने केले आहे.

सतिश पाठक - शालेय शिक्षणातील लातूर पॅटर्न नागररत्न पुरस्कारात आणून राजकारणी मंडळीही भ्रष्ट मार्गाचा अवलंब करू शकतात हे एकवार पुन्हा सिद्ध झाले. न केलेल्या कामाचे कौतुक राष्ट्रपतींकडून करून घेऊन त्याच्या हसतमुखाच्या छब्या या करदात्या जनतेच्या जिव्हारी लागल्या आहेत. खडी, खड्डे, डबकी यांच्यामधून कल्याण-डोंबिवलीतील जनता चाचपडत चालत आहे आणि महापौर, आयुक्त निलाजरेपणे हसतमुखाने राष्ट्रपतींना अंधारात ठेवून न केलेल्या कामाचे कौतुक म्हणून पुरस्कार स्वीकारतात. यासारखी निषेधार्ह गोष्ट नाही.

डॉ. आनंद हर्डिकर -
कल्याण-डोंबिवली ही शहरे आहेत की डोंगर पठारावरील आदिवासी पाडे आहेत. आता आदिवासी पाडेही चकाचक रस्त्यांनी जोडले गेले आहेत. मग महासत्तेच्या उंबरठय़ावर असलेली कल्याण-डोंबिवली शहरे जगाच्या पलीकडे जाऊन खड्डयात का पडली आहेत? सर्वत्र खड्डय़ांचे थैमान असताना महापौर, आयुक्त पंधरा लाख जनतेला फसवून मोठय़ा कौतुकाने चांगल्या रस्ते कामाचे पुरस्कार स्वीकारतात हे पाहिल्यानंतर कपाळावर हात मारून घेण्याव्यतिरिक्त सामान्य माणूस काहीच करू शकत नाही.

दिलीप काणे - गेल्या वीस दिवसांपूर्वी पालिकेत जे सुनील जोशी प्रकरण घडले. त्या प्रकरणात पालिकेतील सत्ताधारी, सर्व पक्षांचे पदाधिकारी यांची लाज निघून गेली. ती आता परत मिळणे कठीण झाले. मग जोशी प्रकरणात जी माया ज्यांना मिळाली त्यांनी ती माया पुरस्कार देणाऱ्या संस्थेला देऊन नागररत्न पुरस्कार पालिकेने मिळवला असावा. कारण या पुरस्काराच्या निमित्ताने पालिकेची गेलेली लाज पुन्हा परत मिळेल असे शासक, प्रशासकांना वाटले असावे. चांगल्या माणसांना, व्यक्तींना कधीच पुरस्कार मिळत नाही. भ्रष्ट मार्गानेच बहुतांश पुरस्कार दिले जातात. त्यातील एक प्रकार कल्याण-डोंबिवली पालिकेतील चतुरस्र बुद्धीच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी केला असावा.

साधना जोशी - अग्नीने सीतामाईला जसे पोटात घेतले तसे हे खड्डे कोणाला अपघात, इजा करण्यापूर्वीच आम्हाला पोटात घेतील तर ते बरे होईल, असे हल्ली वाटतंय. कागदपत्रांवर खोटय़ानाटय़ा रेघोटय़ा ओढून त्या आधारे राष्ट्रपती पुरस्कार देणार असतील आणि मतदार जनता त्याच रस्त्यांवरून ठेचकळत, रडतखडत चालणार असेल तर त्या पुरस्काराचा तो घोर अपमान आहे. राष्ट्रपतींचा शासनानेच केलेला अवमान आहे. पक्षांचे जाहिरनामे बघून मतदार मतदान करतो आणि असे खोटे पुरस्कार माथी मारून घेतो. याचेच दर्शन या नागररत्न पुरस्काराने घडविले आहे. म्हणजे दोघेही कोणाच्या तरी हातातले बाहुले आहेत हेच स्पष्ट होते.

हे कसले नगररत्न?

एक मजेशीर बातमी - कल्याण डोम्बिवली महानगर पालिकेला अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने सर्वोत्कृष्ठ रस्त्यांकारिता पारितोषिक मिळाले आहे.

मागेच आपल्या सन्माननीय महापौर वैजयंती घोलप ह्यांनी दिल्लीत जाऊन पुरस्कार घेतला ... कल्याण डोंबिवलीतील एक रस्ता धड शिल्लक राहिला नाही आणि महापौर मात्र उड्या मारत दिल्लीला गेल्या ... लाज कशी वाटत नाही ह्यांना .... निदान त्या संस्थेला कळवायचं तरी की आम्ही ह्या पुरस्काराकरिता पात्र नाही ..... कल्याण - डोम्बिवली करांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे .....

आपला विनोद

खालील बातमी म टा च्या सौजन्याने ......

पुरस्कार मिळालेल्याच्यानावलौकीकामुळे पुरस्काराचेमोठेपण वाढले पाहिजे . मात्रअखिल भारतीय स्थानिकस्वराज्य संस्थेने नगररत्नपुरस्कारांच्या नावे काहीमहापालिकांना राष्ट्रपती प्रतिभापाटील यांच्या हस्ते खिरापतवाटून आपल्या पुरस्कारांचीप्रतिष्ठा धुळीला मिळवली .कल्याण - डोंबिवलीमहापालिकेला उत्कृष्टरस्त्यांकरिता तर पुणेमहापालिकेला नियोजनबद्धविकासकामांचा पुरस्कार दिल्याने डोंबिवलीकर आणि पुणेकर पुरस्कार देणा्रयांच्याबुद्धीची कीव करीत आहेत . पुण्यातील नियोजित पाच भुयारी पादचारी मार्ग रद्दकरण्याची नामुष्की आली असताना त्यांना पुरस्कार देण्याची भामटेगिरी केली गेलीआहे . पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता भुयारी पादचारी मार्गाचीतातडीने गरज आहे . मात्र तरीही पुण्याचे नगररत्न ठरणे संशयास्पद आहे . कल्याण -डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत ३३५ कि . मी . लांबीचे रस्ते आहेत .जेएनयुआरएम योजनेखाली भुयारी गटारे , पाणीपुरवठा आणि पावसाळी गटारेयोजनेकरिता मोठी रक्कम या महापालिकेला मिळाली . विकास कामांकरिता रस्तेखणले जात असल्याने नागरिकांनी सहकार्य सोशिकता दाखवली . मात्र कामे पूर्णझाल्यानंतर पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्ते पूर्ववत करण्याची तत्परता प्रशासनानेदाखवली नाही . परिणामी कल्याण - डोंबिवलीमधील १७०कि . मी . लांबीचे रस्तेसध्या उखडलेल्या अवस्थेत आहेत . वस्तुत : जेएनयुआरएम योजनेत रस्ते पूर्ववतकरण्याकरिता पैसे दिले जातात . काही ठिकाणी डांबरीकरण केल्याची धूळफेककरण्यात आली . मात्र अवघ्या ते महिन्यात हे रस्ते पावसाने उखडले . गतवर्षीकल्याण - डोंबिवली महापालिकेची निवडणूक समोर दिसताच अत्यंत खराब अवस्थेतअसलेल्या रस्त्यांचे डोंबिवली आणि शिवसेनेशी नाते असलेल्या एका मातब्बरकंपनीकडून काम करून अब्रु वाचवण्याचा प्रयत्न केला गेला . अन्यथा यामहापालिकेतील रस्त्यांची कामे नव कंत्राटदार बनलेल्या स्थानिक गावगुंडांच्या हातीअसून उणे अथवा अधिक दराच्या निविदा दाखल करून थातूरमातूर कामे करण्याचीहडेलहप्पी केली जाते . लाचखोर सुनील जोशी हेच नगररचनाकार या नात्यानेसुशिक्षितांच्या या शहरातील रस्त्यांची गावगुंडांच्या साथीने वर्षानुवर्षे देखभाल करीतहोते . त्याच जोशींना पायघड्या घालून महापालिकेत पुन्हा आणण्याचा घाटघालणा्रया निलाज्रया लोकप्रतिनिधी प्रशासनाला आपण लायक नसतानारस्त्याकरिता पुरस्कार स्वीकारताना वैशम्य वाटेल ही अपेक्षा करणेच गाढवपणाचेआहे .

Monday, July 11, 2011

तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल








तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल ।
देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल ॥१॥

माता विठ्ठल, पिता विठ्ठल ।
बंधु विठ्ठल, गोत्र विठ्ठल ॥२॥

गुरू विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल ।
निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल ॥३॥

नामा म्हणे मज विठ्ठल सापडला ।
म्हणुनि कळिकाळा पाड नाही ॥४॥

Friday, July 8, 2011

अजितदादा-राज ठाकरे जुंपली!

खालील लेख लोकसत्ता च्या सौजन्याने .........................



मुंबई, ७ जुलै/ विशेष प्रतिनिधी
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या खाद्यांवर बंदुक ठेवण्यापेक्षा हिम्मत असेल तर मनसेने माझ्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढावीत असे प्रतिआव्हान देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज ठाकरे यांच्यासमोर शड्डू ठोकले. मात्र, अण्णांच्या खांद्यावर बंदुक ठेवण्याची गरज नाही, तुम्हाला पोहोचवायला आमचे खांदे भक्कम आहेत, असा टोला राज ठाकरे यांनी लगावल्याने, आता राज-दादा यांच्यात जुंपणार, अशी चिन्हे स्पष्ट झाली आहेत.
अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकात लक्ष न देता आता उपमुख्यमंत्री अजित पवार व छगन भुजबळ यांची प्रकरणे काढली व त्यात लक्ष घातले तर मनसेची संपूर्ण ताकद अण्णांच्या पाठीशी उभी करू असे विधान नाशिक येथील एका कार्यक्रमात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. या विधानाचा आज अजित पवार यांनी जोरदार समाचार घेतला. मनसेचे बारा आमदार विधानसभेत आहेत. त्यांच्या मदतीने राज यांनी आपली प्रकरणे जरूर विधानसभेत काढावीत असे आव्हानच अजितदादांनी दिले. अण्णांच्या खांद्यावर बंदुक ठेवण्यापेक्षा तुमच्या आमदारांना कामाला लावा की, असे सांगून, लोकांना खुष करण्यासाठी असली विधाने करणे सोपे असते असा टोलाही अजितदादांनी राज यांना लगावला. अण्णा हजारे हे देशपातळीवर काम करत आहेत तेव्हा त्यांचे काम त्यांना करू द्या, तुमच्याकडे तेरा आमदार होते. त्यापैकी एकाचे दुर्देवाने निधन झाले आहे. उर्वरित बारा आमदारांकडे तरी माझ्या विरोधातील पुरावे शोधण्याचे आणि माझी प्रकरणे काढण्याचे काम सोपवा असेही त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्यासारख्या व्यक्ती बाहेर अशीच केवळ भाषणे करत सुटतात. लोकांना आवडणारे बोलणे आणि पुराव्यानीशी बोलणे वेगळे असते, असे सांगून मनसेचे आमदार काही कामाचे नसल्याचेच अजितदादांनी अप्रत्यक्षरित्या सुचविले. मुंबईत काँग्रेस व शिवसेनेत सुरु असलेल्या वडय़ाच्या राजकारणाबाबती त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुंबईतील सारेच प्रश्न सुटले असून केवळ वडय़ाचाच प्रश्न शिल्लक असल्याच्या थाटात प्रसारमाध्यमांकडून याला जी प्रसिद्धी दिली जाते ती अयोग्य असल्याचेही अजितदादा म्हणाले.
दरम्यान अजित पवार यांनी हाणलेला टोला राज ठाकरे यांनीही टोलविला असून, आमचे काम सुरुच आहे, असा इशाराही दिला आहे. अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील व मराठी असल्यामुळेच पवार व भुजबळांची प्रकरणे बाहेर काढण्याचे आवाहन त्यांना केले, असे राज ठाकरे म्हणाले. मला दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुक ठेवण्याची गरज नाही, असे वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राज म्हणाले. तुम्हाला पोहोचवायला आमचे खांदे भक्कम असल्याचा टोला राज यांनी अजितदादांना लगावला.

Friday, July 1, 2011

राज ठाकरेंना मोदींचा पाहुणचार

खालील लेख म टा च्या सौजन्याने .....


- ऑगस्टमध्ये आठवडाभर गुजरातचा दौरा
- विकासकामांच्या ब्ल्यू प्रिंटसाठी पाहणी

- संजय व्हनमाने

गुजरातमधील विकासकामे पाहण्यासाठी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना तब्बल आठवडाभराच्या मुक्कामाचे निमंत्रण दिले असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज गुजरातचा दौरा करतील. राज यांना गुजरातचे सरकारी पाहुणे होण्याचा बहुमान लाभणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे आपली ब्ल्यू प्रिंट तयार करीत असताना राज यांचा होणारा हा गुजरात दौरा शिवसेनेची डोकेदुखी वाढवणारा ठरणार आहे.

राज ठाकरे नेहमीच गुजरात आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद मोदी यांची तोंडभरून स्तुती करतात. गुजरातमधील विकासकामांचे ते अनेकदा दाखले देतात. गेल्याच आठवड्यात मोदी यांनी स्वत: राज ठाकरे यांना फोन करून गुजरातला येण्याचे निमंत्रण दिल्याचे कळते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी स्वत: राज यांच्या दौऱ्याची बारकाईने काळजी घेणार असल्याचे समजते. आठवडाभराच्या या दौऱ्यात राज गुजरातमधील विविध विकासकामे, तेथील शहरांचे नियोजन, विजेच्या समस्येवर केलेली मात, महिला आणि शाळेतल्या मुली यांच्यासाठी दिलेल्या सोयीसुविधा याची माहिती घेणार आहेत.

गुजरातमधील विकासकामांविषयी केवळ ऐकीव माहितीवर भरभरून बोलणारे राज गुजरातच्या दौऱ्यानंतर विकासकामांच्या अधिक प्रेमात न पडले तर नवलच, असा विश्वास गुजरात भाजपमधील पदाधिकारी व्यक्त करीत आहेत. राज यांनी पक्ष स्थापन केला तेव्हा आपल्याकडे सत्ता सोपवल्यास विकासाची ब्ल्यू प्रिंट जनतेसमोर सादर करू, असा शब्द दिला होता. मुंबई महापालिका निवडणुकीपूवीर् आपल्याला मुंबई नेमकी कशी असायला हवी याची ब्ल्यू प्रिंट राज यांना तयार करावी लागणार आहे. साहजिकच गुजरातभेटीमुळे त्यांच्या ब्ल्यू प्रिंटवर गुजरातचा प्रभाव असेल. त्यामुळे हा दौरा भविष्यात शिवसेनेला डोकेदुखी ठरणार आहे.

............

शिवसेनेची प्रतिक्रिया काय?

राज ठाकरे यांना महाराष्ट्रातील भाजपने चहा पाजला तर शिवसेना संतापली. आता नरेंद मोदी राज यांना आठवडाभर सरकारी पाहुणचार घडवणार असल्याने त्यावर शिवसेनेची प्रतिक्रिया कोणती असेल याबद्दल राजकीय वर्तुळात कुतूहल व्यक्त केले जात आहे.

कळवा हॉस्पिटलवर मनसेची धडक

खालील लेख म टा च्या सौजन्याने ...................




औषधांचा काळाबाजार, पेशंटची हेळसांड, स्वच्छतेचे तीन तेरा, निष्काळजी डॉक्टर आणि डोळ्यांवर कातडे ओढून बसलेले प्रशासन अशा अनंत व्याधींमुळे ठाणे महापालिकेचे कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल अखेरच्या घटका मोजत आहे. या बेजबाबदार कारभाराचा निषेध करण्यासाठी मनसेने गुरुवारी हॉस्पिटलवर धडक मोर्चा नेला. पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. आर. टी. केंदे आणि डीन डॉ. मेत्रा यांच्या बेजबाबदार कारभारामुळेच हॉस्पिटलची आरोग्यव्यवस्था कोलमडली असून त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणीदेखील या वेळी करण्यात आली.

या हॉस्पिटलमध्ये पेशंटना योग्य आरोग्यसुविधा मिळाव्यात, यासाठी मनसेचे पदाधिकारी गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा करीत आहेत. त्याबाबतची निवेदनेदेखील संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. मात्र प्रशासन कुठल्याही प्रकारची हालचाल करीत नसल्याने मोर्चा काढून येथील गैरकारभार चव्हाट्यावर आणल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

सुमारे २० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या हॉस्पिटलच्या ओपीडीत दररोज एक हजार पेशंट येतात. मात्र त्यांच्यावरील उपचारांसाठी पुरेशा प्रमाणात डॉक्टर, सिस्टर, वॉडबॉय यांची नेमणूक झालेली नाही. येथील डॉक्टर बेकायदा खासगी प्रॅक्टिस करतात. अतिदक्षता विभाग आणि आणि ऑपरेशन थिएटरची संख्या वाढविण्याची गरज असतानाही त्याकडे लक्ष दिले जात नाही. पुरेसे भूलतज्ज्ञच उपलब्ध नसल्याने ऑपरेशनसाठी आलेल्या पेशंटचा खोळंबा होतो. दोन वर्षांपूवीर् घोषणा झाल्यानंतरही हॉस्पिटलमध्ये २४ तास पोस्टमाटेर्मची व्यवस्था आजतागायत सुरू झालेली नाही. अनेकदा मेडिकल कॉलेजच्या प्राध्यापकांकडून पोस्टमाटेर्म केले जाते. मृतदेह ठेवण्यासाठी पुरेशा शवपेट्याही हॉस्पिटलमध्ये नसल्याची धक्कादायक माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

वीजबचतीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून हॉस्पिटलमध्ये सोलार यंत्रणा बसविण्यात आली होती. मात्र ती यंत्रणाच चोरीला गेली असून त्यातही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. मनोरुग्णांवरील उपचारांसाठी आलेले काही लाख रुपयांचे अनुदान इमारतींच्या नूतनिकरणासाठी वापरण्यात आले. या हॉस्पिटलच्या श्री साई सिध्दी सिटी स्कॅन सेंटरमध्ये ६०० रुपये अशा सवलतीच्या दरात स्कॅनिंग अपेक्षित असताना पेशंटकडून १२०० ते २००० रुपये उकळले जातात. त्याबाबतच्या असंख्य तक्रारी केल्यानंतरही कारवाई होत नाही. टेंडरच्या वादातून हॉस्पिटलचे मेडिकल गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. हॉस्पिटलच्या काही कर्मचाऱ्यांवर राजकीय वरदहस्त असल्याने ते घरबसल्या पगार घेत आहेत. येथील लिफ्ट बंद पडलेली असतानाही तिच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. पेशंटना डिस्चार्ज देताना पुढील महिन्याभराची औषधे देणे अपेक्षित असताना केवळ आठवड्याभराचीच औषधे दिली जातात. अशा असंख्य गैरप्रकारांकडे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आहे.

मनसेचे ठाणे जिल्हा प्रवक्ते आणि सरचिटणीस राजन गावंड, मनोहर सुखदरे, संजय देशमुख, राजेश मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकतेर् या मोर्चात सहभागी झाले होते. मनसेच्या शिष्ठमंडळाने तक्रारी आणि मागण्यांचे निवेदन उपायुक्त के. डी. निपुतेर् यांना सादर केले असून येत्या आठ दिवसांत दोषी अधिकाऱ्यांची हकालपट्टी न झाल्यास त्यांना 'मनसे स्टाइल' धडा शिकविण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.