Thursday, December 23, 2010

सेनेचे अशोक मुर्तडक मनसेत!

खालील लेख म टा च्या सौजन्याने


म. टा. प्रतिनिधी। नाशिक

पक्षांतर्गत कटकटींचे शुक्लकाष्ठ नाशिकमध्ये शिवसेनेची पाठ सोडण्यास तयार नसून उपजिल्हाप्रमुख अशोक मुर्तडक यांनी बुधवारी मनसेत प्रवेश केल्याने पक्षाला धक्का बसला आहे. काही दिवसांपूवीर् महानगरपालिकेतील घडामोडींच्या निमित्ताने शिवसेनेतील गटबाजी उफाळून आली असून तिला चालना देणाऱ्यांनाच झुकते माप मिळत असल्याचे पाहून निर्माण झालेल्या अस्वस्थतेमुळे शिवसेना नगरसेवकांमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता चर्चेत आली आहे.

कामगार सेनेतून बेदखल केल्यामुळे आधीच अस्वस्थ असलेल्या मुर्तडक यांना आताही महानगरपालिकेत खांदेपालट करताना डावलण्यात आल्याने ते नाराज होते. सुधाकर बडगुजर यांचे सभागृह नेतेपद काढून घेतल्यानंतर शिवसेनेच्या सतरा नगरसेवकांनी कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून महानगरप्रमुख अजय बोरस्ते आणि अशोक गवळी यांच्यावरही कारवाईची मागणी केली होती. त्या पत्रात सर्वप्रथम मुर्तडक यांनीच स्वाक्षरी केली होती. त्याचप्रमाणे झाल्याप्रकाराचे सत्यशोधन करण्यासाठी आलेल्या समितीकडे त्यांनी गटनेतेपद मिळावे अशी मागणी केल्याचे समजते. पण, त्यावेळी मुर्तडक यांना 'कडक' शब्दांत समज देण्यात आली होती. त्यातूनच मुर्तडक यांच्या नाराजीत भर पडली आणि त्यांनी मनसेत दाखल होण्याचा निर्णय घेतला.

साधारणपणे तीस वर्षांपासून मुर्तडक यांचा शिवसेनेशी संबंध होता. त्यांनी कामगार सेनेतही चिटणीस दीर्घकाळ काम केले. मात्र, वर्षभरापूवीर् त्यांचे हे पद काढून घेण्यात आले. तर नगरसेवकपदी ते चौथ्यांदा निवडून आले आहेत. एक निष्ठावान आणि अस्सल शिवसैनिक असा मुर्तडक यांचा लौकिक होता. पण, सेनेत सातत्याने सुरू असलेल्या शह-काटशहाच्या राजकारणाला ते कंटाळले होते. सेनेच्या मुशीत घडलेले असल्याने मुर्तडक यांना 'ठाकरें'चेच नेतृत्त्व मानवणारे आहे. कदाचित त्यामुळेच त्यांनी मनसेची निवड केली आणि बुधवारी सकाळी राज ठाकरे यांच्या उपस्थितीतच त्यांच्या पक्षात प्रवेश केला. मुर्तडक यांच्या प्रमाणेच शिवसेनेतील अन्य दहा ते अकरा नगरसेवकांची मानसिकता असल्याचे सांगितले जाते. ते सर्व एकत्र येऊन मनसेत प्रवेश करतील किंवा महानगरपालिकेत 'ब' गट स्थापन करतील अशी शक्यता वर्तवली जाते आहे.

महानगरपालिकेतील घडामोडींनंतर नाशिकमध्ये आलेल्या समितीने सर्व नगरसेवकांशी स्वतंत्रपणे चर्चा केली आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या. मात्र त्याचवेळी या समितीने नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना दमात घेऊन कानपिचक्याही दिल्याचे समजले जाते. त्यामुळे या समितीतील एखादा नेता पुन्हा नाशिकच्या संपर्कप्रमुखपदी नेमला गेला, तर त्याच्या गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचेच वर्चस्व राहील अशा भीतीनेही काही नगरसेवकांना ग्रासले आहे.

Wednesday, December 22, 2010

नीलम ताई, तोंडावर थोडा आवर घाला !

काल स्टार माझा वर विशेष बघत होतो त्यात नेहमीप्रमाणे शिवसेने तर्फे नीलम ताई उपस्थित होत्या. जेष्ठ पत्रकार असलेल्या प्रकाश अकोलकरांनी काही वक्तव्य केल्यानंतर नीलम ताई म्हणाल्या कि आम्हाला सल्ला दिला त्याबद्दल धन्यवाद आणि मी त्याबद्दल तुम्हाला १०१ रुपये दक्षणा देईन. एका जेष्ठ पत्रकाराला चर्चा चालू असतांना अश्या पद्धतीने बोलणे कितपत योग्य आहे?

परवा चहा पानावरून वाद झाल्यावर त्या कल्याण डोम्बिवली येथील निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राज साहेबांना उद्देशून म्हणाल्या कि बेड्कीला बैल होता आले नाही .... त्याना कल्पना नसेल तर सांगतो आमचे २७ नगरसेवक निवडून आले आहेत आणि जवळ जवळ ३४ जागांवर आम्ही दुसऱ्या क्रमांकावर आहोत, त्यातील १० -१५ जागा अतिशय थोड्या फरकाने गेल्या आहेत आणि आम्हाला कल्याण डोम्बिवली मिळून १३०००० मते मिळाली आहेत. मनसे ला ह्या के डी एम सी निवडणुकीत मतदारांनी भरघोस मतदान केल्याचं हे उदाहरण आहे आणि आम्ही तटस्थ राहिल्या मुळेच तुमचा महापौर निवडून आला हे तुम्ही कसं काय विसरताय??

आमच्या नेत्यांबद्दल तारतम्य सोडून बोलायला तुम्ही आहातच कोण?... तुमच्या वर निवडणुकीच्या काळात कोल्हापूरची जबाबदारी होती (माझ्या माहितीप्रमाणे) तिथे तर तुमचे पूर्ण पानिपत झाले, मग त्याबद्दल तुम्ही काय बोलणार??? असली बेजबाबदार वक्तव्य करून तुम्ही तुमची स्वताची प्रतिमा खराब करत आहेत ह्याचे तरी भान ठेवा .... केवळ कार्याध्याक्ष्याना आवडेल म्हणून जर असली वक्तव्य केलीत तर ती तुम्हाला भविष्यकाळात फार महागात पडतील ह्यात शंका नाही.

आपला

विनोद शिरसाठ
प्रभाग क्रमांक २
कल्याण (प)

चहापान !!!

चहा पान एवढं रंगेल असे वाटले नव्हते

खालील लेख म टा च्या सौजन्याने .......


भाजपची हूल!

महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रदेश कार्यालयात पाचारण करून चहा पाजण्याची भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची शक्कल भलतीच परिणामकारक ठरली! चहापान राज आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी केले, पण भान मात्र शिवसेनेच्या सवोर्च्च नेतृत्वाचे हरपले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे संतापले, उद्धव यांनी तर थेट माजी उपपंतप्रधान व रामभक्त लालकृष्ण अडवाणी यांना फोन लावला. 'राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर तुम्ही झुणकाभाकर खाता, तेव्हा आम्ही फोन करून तुम्हाला त्रास देतो का', असा सवाल अडवाणी यांनी विचारला की नाही, हे उघड झालेले नाही. मात्र राज ठाकरे यांची पायधूळ भाजपच्या कार्यालयाला लागली तरी पोटात गोळा येण्याइतकी महाराष्ट्रात शिवसेना दुर्बळ झाली आहे काय, असा प्रश्ान् उद्धव यांच्या या अकांडतांडवी प्रतिक्रियेमुळे मतदारांच्या मनात निर्माण करण्याचा हेतू भाजपने साध्य केला आहे. राजकारणात आजचे राजकीय शत्रू उद्याचे मित्र होऊ शकतात हे वास्तव असले, तरी पंचायती वा पालिकांच्या स्तरांवरील सोयरिकींच्या शक्यतांच्या तुलनेत, राज्य वा केंदाच्या स्तरावरील सत्तेच्या समीकरणांत अशा शक्यतांची संख्या मर्यादित असते. तत्त्व म्हणून नाही, तरी राजकीय अपरिहार्यता म्हणून राष्ट्रीय पातळीवरील पक्षांना कोणाशीही आघाडी करता येत नाही. शिवसेनेशी भाजपने युती केली, मात्र त्यासाठी शिवसेनेला मराठी हिताबाबत अधिक उदार भूमिका घ्यावी लागली आणि 'हिंदुत्व' या व्यापक छत्रीचा आश्ाय घ्यावा लागला. आज जैतापूरच्या प्रकल्पाला स्थानिक जनतेच्या हिताच्या नावाने विरोध करणाऱ्या शिवसेनेने गुजरातेतील सरदार सरोवर प्रकल्पाला विरोध करणाऱ्या महाराष्ट्रातील आदिवासींच्या मागे बळ उभे करण्याऐवजी, मुंबईतील गुजराती भाषिक मतदारांच्या अनुनयाला प्राधान्य दिले होते! मुंबई, ठाणे महापालिका व नंतर राज्यात शिवसेनाप्रणीत युती सत्तेवर असताना, साठ व सत्तरीच्या दशकात परप्रांतीयांना वाटणारे शिवसेनेचे भय हळूहळू कमी झाले. सत्तेची अपरिहार्यता म्हणून का होईना, शिवसेनेला व्यापक राजकारणाचा अंगीकार करावा लागला. त्याचमुळे उत्तरेकडील राज्यांत प्रभाव असलेल्या भाजपला शिवसेनेबरोबरील सोयरिकीतून अन्य राज्यांत नुकसान होण्याची भीती वाटली नाही. राज ठाकरे यांच्या सध्याच्या भूमिकेबाबत तशी परिस्थिती नाही. मुंबई महापालिकेतही उघडपणे राज यांच्याबरोबर युती करण्यास भाजपचे केंदीय नेतृत्व तयार होईल, अशी शक्यता कमी आहे. त्यामुळे या घटनेचा वापर भाजपच्याच मताधारात अस्वस्थता निर्माण करण्यासाठी इतरांकडून केला जाऊ शकतो, याची आठवण शिवसेना नेतृत्वाने करून दिली असती, तर भाजपचे हे दबावतंत्र त्यांच्यावरच उलटवता आले असते.

Monday, December 20, 2010

डोंबिवलीत मनसेची 'गांधीगिरी'

खालील बातमी म टा च्या सौजन्याने ..................................




कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीआधी आक्रमक आंदोलनांचा धडाका लावणारी मनसे आता गांधीगिरी करू लागली आहे. शनिवारी मनसेच्या नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांकडून वस्तू विकत न घेण्याचे आवाहन डोंबिवलीकरांना केले. फेरीवाल्यांच्या हैदोसामुळे महापौर वैजयंती गुजर यांनी कारवाईचे आदेश दिल्यापासून स्टेशन परिसरातील फुटपाथ काहीसे मोकळे असल्याचा सुखद अनुभव डोंबिवलीकर घेत आहेत. या कारवाईला पाठिंबा दर्शवत मनसैनिकांनी गांधिगिरी केली.

कल्याण व डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाले व बेशिस्त रिक्षाचालक या दोन्ही समस्या आता प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर गेल्या आहेत. फेरीवाल्यांविरोधात अनेक तक्रारी डोंबिवलीकरांनी केल्यानंतर महापौरांनी पालिका प्रशासनाला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सध्या तरी सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत फेरीवाले हटविले जात असल्याने डोंबिवलीकरांना सुखद धक्का बसला आहे.

या पार्श्वभूमीवर पालिकेच्या कारवाईच्या समर्थनासाठी मनसैनिकही रस्त्यावर उतरले. विरोधी पक्षनेत्या वैशाली दरेकर यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी फडके रोडवरून स्टेशनपर्यंत फेरी काढून लोकांना फेरीवाल्यांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. या आंदोलनात माजी नगरसेवक शरद गंभीरराव, प्रकाश भोईर, नगरसेवक राहुल चितळे आदींनी सहभाग घेतला होता.

काही फेरीवाल्यांनी मनसेच्या आंदोलनानंतर आपल्या उदरनिर्वाहासाठी हा व्यवसाय करणे भाग असल्याचे सांगत मनसैनिकांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शरद गंभीरराव यांनी आक्रमक भूमिका घेत फुटपाथ हे नागरिकांना चालण्यासाठी आहेत, फेरीवाल्यांसाठी नाहीत असे सुनावले. स्थानिक फेरीवाल्यांचा उदरनिर्वाह व्हावा यासाठी त्यांना 'हॉकर्स झोन'मध्ये कोठे जागा देता येईल, याचा पालिका विचार करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

शहर शाखा पदाधिकारी आंदोलनापासून लांब

एरवी डोंबिवलीतील प्रत्येक आंदोलनात हिरिरीने नेतृत्व करणारे शहर अध्यक्ष राजेश कदम, राहुल कामत व अॅड. सुहास तेलंग मात्र या आंदोलनात दिसले नाहीत. त्यामुळे नगरसेवक व शहर शाखा अशा दोन गटांत मनसे विभागण्यास सुरुवात झाल्याची चर्चा आहे.

मनसैनिकांची दादागिरी

मनसेचे नगरसेवक 'गांधीगिरी' करीत असताना मनसैनिकांनी मात्र फूटपाथवर ठाण मांडलेल्या काही फेरीवाल्यांच्या गाड्या उलथवून लावल्या. या गाड्यांवरील सामानही त्यांनी रस्त्यावर फेकून दिले.

औरंगाबाद मनपात सेना नगरसेविकांचा रंगला भीसीचा खेळ

खालील बातमी स्टार माझा च्या सौजन्याने




औरंगाबाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज लज्जास्पद प्रकार पहायला मिळाला. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी महनगरपालिकेची सर्वसाधारण सभा सुरु असताना शिवेसना-भाजपच्या नगरसेविका भिसी लावण्यामध्ये गुंतल्या होत्या.

खरंतर जनतेच्या सेवेसाठी या नगरसेवकांना निवडून दिलं जातं. पण या नगरसेविकांना बहुधा त्याचा विसर पडला असावा. विशेष म्हणजे सभेत खंडणीखोर नगरसेवकांच्या निलंबनाची गंभीर चर्चा सुरु असताना हा प्रकार घडला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे खंडणीखोर नगरसेवक साजीद बिल्डर आणि खलील खान यांचं निलंबन करण्याचा विषय सभेत सुरु होता. त्याचवेळी हा भिसीचा खेळ रंगला होता.


Tuesday, December 14, 2010

लोडशेडिंग-आमदारांचे शड्डू

खालील बातमी म टा च्या सौजन्याने ........................



ठाणे जिल्ह्यात ठाणे, नवी मुंबई शहरांत झीरो लोडशेडिंग होत असताना लवकरच त्यामध्ये कळव्याची भर पडणार आहे. शिवाय, डोंबिवली व भिवंडीतही सध्या दीड तासांहून कमी वेळ लोडशेडिंग आहे. असे असूनही कल्याणमध्ये मात्र तीन तासांहून अधिक काळ अंधाराचे साम्राज्य असते. याविरोधात मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांनी संघर्ष सुरू केला असून कल्याणातही डोंबिवलीप्रमाणे दीड तासच लोडशेडिंग करून रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी विधीमंडळात केली आहे.

ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाणात लोडशेडिंग केले जाते. राज्यात मोठ्या प्रमाणात लोडशेडिंग होत असताना ठाणे व नवी मुंबईत लोडशेडिंग होत नाही. लवकरच कळवादेखील या यादीत समाविष्ट होईल, असे सांगितले जाते. त्यामुळे जिल्ह्यात केवळ कल्याणचा एकमेव शहरीबहुल भाग 'अधिक लोडशेडिंग'च्या क्षेत्रात बाकी राहणार आहे. जवळपास डोंबिवलीइतकीच वीजबिलाची वसुली असली तरी केवळ जास्त वीजचोरीचे कारण देत कल्याणमधील लोडशेडिंग कमी करण्यात आलेले नाही.

वीजचोरी कमी करण्याची जबाबदारी वीज प्रशासनाची आहे. मध्यंतरी महावितरण कंपनीने प्रचंड बंदोबस्त घेऊन मुंब्रासारख्या संवेदनशील परिसरातील वीजचोरी मोठ्या प्रमाणात उघड करून ती पुन्हा होणार नाही, यासाठी उपाययोजना केली होती. तशी कार्यवाही कल्याणात करण्याची इच्छाशक्ती वीज प्रशासन दाखवू शकलेले नाही. वीजचोरांवर गुन्हे दाखल केल्यास तसे करण्यास किमान भविष्यात कोणी धजावणार नाही, हीदेखील वस्तुस्थिती आहेच. त्यामुळे प्रशासनाने कोणाचाही मुलाहिजा न राखता वीजचोरांवर कारवाई करावी, असे मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांचे म्हणणे आहे.

कल्याण झोनचे मुख्यालय कल्याण पश्चिमेला आहे. त्याचा फारसा कोणताही फायदा कल्याणकरांना मिळत नाही. साधे वीज वितरण वाहिन्यांचे जाळेदेखील भूमिगत करण्याचा विचार महावितरणच्या प्रशासनाने केलेला नाही, असा आरोप आमदार भोईर यांनी केला आहे. विजेची मागणी व पुरवठ्यामधील तफावत पाहता कल्याणमधील लोडशेडिंग पूर्णपणे बंद करणे शक्य नाही. परंतु किमान त्यामध्ये घट करणे महावितरणला शक्य आहे. त्यामुळे नजिकच्या भविष्यात कल्याणकरांना दिलासा मिळावा, यादृष्टीने प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी विधीमंडळात उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात ठोस निर्णय घेण्यासाठी विधीमंडळाच्या अधिवेशनानंतर बैठक बोलवावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

जैतापूर : अरिष्ट नव्हे, ही तर दुसरी गंगा!

खालील लेख लोकसत्ता च्या सौजन्याने .....................

लेखक - विनय कोरे, अध्यक्ष्य जनसुराज्य शक्ती पक्ष



केंद्र सरकारची न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ही बडी कंपनी रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील जैतापूर बंदराजवळ मोठा अणुऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. त्याच्याविरुद्ध फार मोठे आंदोलन उभे ठाकले आहे. या विषयाचा विचार करण्याआधी हा प्रकल्प आकाराने केवढा असेल हे आधी पाहू. त्याची क्षमता १० हजार मेगाव्ॉट राहील. मोठय़ा वीज प्रकल्पासाठी आपल्याकडे कोयना व दाभोळ (म्हणजे पूर्वीची एन्रॉन) अशा दोनच मोजपट्टय़ा आहेत. जैतापूर प्रकल्प पूरा झाला की त्यातून कोयनेच्या २० पट तर दाभोळच्या पाच पट वीजनिर्मिती होणार आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर तेथे दर ताशी एक कोटी युनिट विजेचे उत्पादन होईल. त्याच्या उभारणीसाठी ९५ हजार कोटी रुपये खर्च होतील. आपल्या देशात यापूर्वी एवढय़ा अतिप्रचंड खर्चाचा कसलाही प्रकल्प हाती घेण्यात आला नव्हता. या प्रकल्पासाठी अत्याधुनिक तंत्रविज्ञान वापरले जात आहे.
जैतापूर प्रकल्पाला विरोध असणाऱ्यांची तीन वर्गात विभागणी करता येते. या प्रकल्पासाठी ताब्यात घेण्यात येणाऱ्या जमिनींमुळे विस्थापित होणारे पहिल्या वर्गात मोडतात. कोणाचीही विस्थापित होण्याची तयारी नसते. त्यामुळे त्यांचा विरोध समजण्यासारखा आहे. हा प्रकल्प विनाशकारी असून, त्यामुळे आसमंतातील प्रदेश पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. अशा खोटय़ा भयगंडामुळे पछाडलेले संबंधित ग्रामीण लोक दुसऱ्या वर्गात येतात. बाहेरून आलेले पुढारी पहिल्या दोन्ही वर्गांतील मंडळीचे नेतृत्त्व करीत असून, त्यांचा तिसरा वर्ग आहे. या पुढाऱ्यांनी कपोलकल्पित बाबी अतिरंजित स्वरुपात मांडून स्थानिक मंडळींना भडकवले आहे. डॉ. अनिल काकोडकर यांच्याकडून आपण श्रेष्ठ अणुशास्त्रज्ञ आहोत असे गृहीत धरून ही सर्व पुढारी मंडळी बोलत असतात. केंद्र सरकारच्या ऊर्जा व अणुऊर्जा धोरणांनाच हे पुढारी आव्हान देत आहेत. उद्या काहीही घडले तरी त्यांचे जरासुद्धा बिघडत नसल्यामुळे पहिल्या दोन वर्गातील मंडळींनी या एकूण विषयाचा शांतपणे विचार करण्याची गरज आहे.
प्रकल्पाला मोठा निक्षून विरोध केला तर तो रद्द होतो असे पश्चिम बंगालमधील सिंगूर येथील टाटांच्या संकल्पित नानो मोटारींच्या कारखान्याबाबत घडले. तसेच जैतापूरबाबत घडू शकेल, अशी खोटी आशा पुढाऱ्यांनी संबंधितांना दाखविली आहे. खरे म्हणजे जैतापूर व सिंगूर यांची तुलना होऊ शकत नाही. सिंगूर प्रकल्पाला तेथील राज्य सरकारचा पाठिंबा होता, पण ममता बॅनर्जींच्या विरोधामुळे केंद्र सरकार टाटांच्या पाठीशी नव्हते. जैतापूर प्रकल्प केंद्र सरकारचाच असून, त्याला महाराष्ट्र सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे. टाटांच्या सिंगूर प्रकल्पाच्या ५० पटींहून अधिक खर्चाचा जैतापूर प्रकल्प आहे. टाटानी तत्काळ गुजरातमध्ये पर्यायी जागा निवडून तेथे झटकन कारखाना उभारला आणि नानो मोटारीचे उत्पादन सुरू केले. जैतापूरला तसा पर्याय नाही. या प्रकल्पाला शिवसेना व भाजप यांचा विरोध आहे. उद्या भाजपप्रणित मित्रपक्षांचे (शिवसेनेसह) सरकार केंद्रामध्ये पुन्हा सत्तेवर आले तर ते हा प्रकल्प रद्द न करता तो प्रत्यक्षात यावा अशीच भूमिका घेईल. अणुऊर्जा प्रकल्प खासगी क्षेत्रातही उभारावेत असा विचार सध्या प्राथमिक पातळीवर चालू आहे. जैतापूर प्रकल्प खासगी क्षेत्रात असता तो अंबानी उभारणार असते, तर त्याला या राजकीय पक्षांनी मुळीच विरोध केला नसता हे निश्चित. या प्रकल्पाला स्थानिकांचा कडक विरोध आहे हे स्पष्ट झाल्यानंतरही केंद्र सरकारने त्यासाठी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष सरकोझी यांच्याशी करार केला यावरून त्या सरकारचा पक्का निश्चय लक्षात येतो. जैतापूर प्रकल्प मुळीच रद्द होणार नाही हे प्रकल्पग्रस्त व आसमंतातील मंडळी यांनी प्रथम ध्यानात घ्यावयास हवे.
पुढाऱ्यांनी चुकीचे मार्गदर्शन केले आणि अनुयायांना मोठा फटका बसला अशी नुकतीच एक गोष्ट घडली. कोल इंडिया लिमिटेड ही केंद्र सरकारची बडी कंपनी असून, तिने प्रथमच आपले शेअरभांडवल विकायला काढले. या गोष्टीला कामगार संघटनेचा तीव्र विरोध होता. कंपनीचे कामगार व अन्य कर्मचारी सुमारे सव्वातीन लाख आहेत. त्यांना अत्यंत सवलतीच्या दराने कंपनीने शेअर देऊ केले होते. ते घेऊ नका असा युनियनचा आदेश होता. तरीही थोडय़ा जणांनी घेतले. त्यांना तत्काळ प्रचंड लाभ झाला. ज्यांनी घेतले नाहीत ते मग हात चोळत बसले. अशीच अवस्था जैतापूर प्रकल्पामुळे विस्थापित होणारे व आसमंतातील लोक यांची होण्याचा संभव दिसतो. यास्तव त्यांनी या पुढाऱ्यांचा नाद सोडणे त्यांच्या हिताचे ठरेल.
रिलायन्स इन्डस्ट्रीज या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठय़ा कंपनीने गुजरातमध्ये जामनगरजवळ अतिप्रचंड तेलशुद्धी कारखाना उभारला. त्यासाठी चार खेडी उठवावी लागली. त्यातील लोकांच्या पुनर्वसनाची परिपूर्ण योजना रिलायन्सने प्रथम तयार केली आणि नंतर त्या लोकांना सांगितली. ती स्वीकारली गेली आणि कसलाही विरोध न होता हा प्रकल्प त्वरित उभा राहिला. त्याप्रमाणे आपलेही पुनर्वसन व्हावे अशी मागणी जैतापूर-माडबनच्या रहिवाशांनी केली तर ते समजण्यासारखे होईल.
या अणुऊर्जा प्रकल्पामुळे आसमंताचा फार मोठा विकास होणार आहे. राजापूरला गंगा आहेच. हा प्रकल्प म्हणजे प्रत्यक्षात दुसरी मोठी गंगा ठरणार आहे. तिचा लाभ स्थानिकांनी घेतला नाही तर बाहेरचे विशेषत: बिगर मराठी लोक घेतील. त्यामुळे १० वर्षांनी जैतापूरची भाषा हिंदी बनून जाईल, असे होऊ नये यासाठी विरोध बंद करून या प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा आपणाला कसा मिळवता येईल, असा व्यावहारिक विचार स्थानिक मंडळींनी करावयास हवा. या प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्यांचे केवळ पुनर्वसन होऊन चालणार नाही, तर जामनगरप्रमाणे ते सुस्थापित झाले पाहिजेत. विरोध करीत राहिल्यास, मिळालेले नुकसानभरपाईचे पैसे ते प्रथम फस्त करतील आणि नंतर देशोधडीला लागतील. मग त्यांच्याकडे पाहणार कोण? पुढारी मंडळी तर त्याआधीच पसार झालेली असतील.
या अणुऊर्जा प्रकल्पातील अधिकारी, तंत्रज्ञ, कामगार आदींना राहण्यासाठी वसाहत उभी केली जाईल, ती प्रत्यक्षात छोटीशी नगरीच होईल. तेथील सर्व पूरक सेवांचे काम अग्रक्रमाने विस्थापितांना व नंतर आसमंतातील लोकांना मिळाले पाहिजे. या नगरीतील मंदिरांच्या पुजाऱ्यापासून सर्व स्थानिक असले पाहिजेत. शिंपी, सुतार, गवंडी, नाभिक, धोबी, चर्मकार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेपरवाला, टेलिफोन बूथ, मोबाईल दुरुस्ती आदी सर्व कामे बाहेरच्यांना न मिळता स्थानिकांना उपलब्ध व्हावयास हवीत. येथील दुकाने आणि पेट्रोल पंप व गॅस एजन्सी स्थानिकांचीच असावीत, असा आग्रह धरावा लागेल. अशा कटाक्षाने भर दिला नाही तर हिंदीभाषिक तरुण जैतापूर बंदरात मासे खरेदी करून ते या नगरीत विकण्याचा व्यवसाय सुरू करतील. सध्या असे काही तरुण जैतापुरात मच्छीमारांकडे नोकरीला आहेत. प्रकल्पाला विरोध करीत राहिल्यास ‘भैय्या हातपाय पसरी’ याचे प्रत्यंतर येईल.
या अणुऊर्जा प्रकल्पात रुग्णालय, पब्लिक स्कूल आदी कित्येक सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. मूळ प्रकल्प व या सुविधा या सर्वांमध्ये असणाऱ्या नोकऱ्यांपैकी शक्य तेवढय़ा जास्त स्थानिकांना कशा मिळतील हे पाहावयास हवे. ही गोष्ट केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीमध्ये बसत नाही. तथापि, त्या सरकारला हे पटवून द्यावे लागेल. या प्रकल्पाला लागणारी सर्व यंत्रसामग्री फ्रान्समधून न आणता, जी भारतात तयार होऊ शकेल ती येथूनच घेतली पाहिजे अशी अट भारत सरकारने घातली आहे. लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, भारत फोर्ज आदी कंपन्या अशी यंत्रसामग्री द्यायला तयार आहेत. हेच तत्त्व स्वीकारून स्थानिकांना नोकऱ्या देण्यात प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे करता येईल. नजीकच्या भविष्यकाळात उपलब्ध होणाऱ्या या नोकऱ्यांसाठी स्थानिक इच्छुकांना प्रशिक्षित करण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा लागेल.या प्रकल्पासाठी देशी व परदेशी बडे कंत्राटदार येतील. त्यांच्याकडेही नोकऱ्या उपलब्ध होतील, तसेच या प्रकल्पातील शेकडो छोटी कंत्राटे व उपकंत्राटे यांपैकी काही स्थानिक मंडळी घेऊ शकतील. या सर्वांकडे लक्ष ठेवले पाहिजे. या प्रकल्पाच्या नगरीला दूध, अंडी, भाज्या, फळे, फुले आदींचा पुरवटा करावा लागेल. त्यांचे उत्पादन स्थानिक पातळीवर होण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे लागेल.
या प्रकल्पाच्या निमित्ताने वाहतुकीच्या गरजा लक्षात घ्यावयास हव्यात. त्यासाठीची जलवाहतूक जयगड (धामणखोल) बंदरातून करावी लागेल. पुरेशा क्षमतेचे दुसरे बंदर जवळपास नाही. रत्नागिरी हाच जवळचा विमानतळ राहणार आहे. त्याची धावपट्टी अधिक लांबीची करावी लागेल. हे लक्षात घेता, सागरी महामार्गाचा जयगड-रत्नागिरी-जैतापूर हा भाग विशेष दर्जाचा करणे भाग पडेल. मुंबई-कोकण-गोवा या राष्ट्रीय मार्ग १७ वरून जैतापूरला जाणारा रस्ता सध्या राज्य महामार्ग आहे. त्याची क्षमता वाढवावी लागेल. जैतापूरला कोल्हापूर हे जवळचे बडे शहर आहे. त्यासाठी कोल्हापूर-गगनबावडा-भुईबावडा-खारेपाटण हा राज्य महामार्ग अधिक दर्जाचा करणे गरजेचे राहील. कोकण रेल्वेच्या राजापूर रोड व वैभववाडी या स्टेशनांच्या दरम्यान नवे स्टेशन स्थापन करून तेथून जैतापूरला ब्रँच लाइन टाकण्याचा विचार करावा लागेल. अणुऊर्जा प्रकल्पाच्या निमित्ताने वाहतुकीच्या चांगल्या सुविधा कशा निर्माण होणार आहेत याची यावरून कल्पना यावी. जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प ही दुसरी गंगा आहे हे या सर्व विवेचनावरून लक्षात येईल. तिचा लाभ घेण्याकरिता मार्गदर्शन करण्यासाठी बिनसरकारी किंवा निमसरकारी यंत्रणा उभी राहिली पाहिजे, पण हे ऐकण्याच्या मन:स्थितीत विस्थापित होणारे व आसमंतातील लोक नाहीत. त्यांनी योग्य दिशेने जावे यासाठी त्यांना प्रवृत्त करण्याकरिता आता मुंबईतील जैतापूरकरांनी पुढाकार घ्यावयास हवा. त्यांनी एक सभा निमंत्रित करून साधकबाधक विचार करावा आणि या विकासपर्वाचा मार्ग सुकर करावा. जैतापूरकरांनी सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारला तर नवे मुख्यमंत्री त्यांना सक्रीय पाठिंबा देतील याबद्दल त्यांनी नि:शंक असावे.

Tuesday, December 7, 2010

जैतापूर, बरा की वाईट ???

महाराष्ट्राला विजेची गरज तर आहे, मग अश्या प्रकल्पांना विरोध केला तर विकास कसा होणार??
फ्रांस मध्ये ७८ % वीज अणु उर्जेपासून निर्माण केली जाते, मग त्यांना अणु भट्ट्या पासून त्रास नाही झाला?
मी ह्या विषयातला तज्ञ नाही त्यामुळे मला ह्याबाबतीत बोलता येणार नाही पण ह्या विषयावर अधिक माहिती गोळा करून ती लोकांसमोर ठेवणं गरजेचं आहे.

भारतीय जनता पार्टी ने जैतापूर वीज प्रकल्पाबद्दल एक अभ्यास समिती नेमून चांगली सुरवात केली आहे ... निदान तज्ञांकडून कळू तरी द्या कि हा प्रकल्प विकासाचा आहे कि विनाशाचा??

तुम्हाला काही माहित असेल तर कळवा .....

सादर करीत आहे म टा मधील डॉ बाळ फोंडके चां लेख ................................

आपला विनोद



पर्यावरण आणि विकास

>> डॉ. बाळ फोंडके

विकासप्रकल्प पर्यावरणविरोधी आहेत ही समजूत जनमानसात रुजते आहे. पण या विषयाकडे काळा आणि पांढरा या दोन रंगातच पाहिले जाते. या दोन टोकाच्या रंगांमध्ये करड्या रंगाच्या अनेक छटा आहेत, हे आपण विवेकबुद्धीने समजून घेणार आहोत की नाही, हा प्रश्न जैतापूर प्रकल्पाच्या निमित्ताने पुन्हा एकदा उभा राहिला आहे.....................

पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या, आणि चचेर्चा विषय बनलेल्या, प्रकल्पांना अलीकडेच हिरवा कंदिल दाखवला आहे. नवी मुंबईतील विमानतळाला त्यांनी दिलेली मंजुरी राजकीय मजबुरीपोटी दिलेली आहे, असा आक्षेप या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या पर्यावरणवादी मंडळींनी घेतला आहे. तसंच जैतापूर इथल्या प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पालाही फ्रान्सच्या अध्यक्षांच्या होऊ घातलेल्या भेटीचा संदर्भ आहे, असाही आरोप केला गेला आहे. अर्थात या आक्षेपांची रमेश यांना कल्पना होतीच. म्हणून तर त्यांनी माझे निर्णय पर्यावरणवादी मंडळींना आवडणार नाहीत, असं याआधीच जाहीरपणे सांगून टाकलं आहे.

त्यांनी दिलेल्या मंजुरीमुळं या प्रकल्पांविषयी असणाऱ्या समस्यांवर तोडगा निघाला आहे की काय, हे जरी आपण निश्चितपणे सांगू शकत नसलो, तरी त्यांनी एका कळीच्या प्रश्नाचं उत्तर मात्र देऊन टाकलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये पर्यावरण हा एक परवलीचा शब्द बनला आहे. त्यातच प्रसारमाध्यमांनी पर्यावरणाच्या बाजूनं बोलणारा तो पुरोगामी आणि त्याविषयी यत्किंचितही शंका काढणारा प्रतिगामी, अशी ढोबळ विभागणी करून टाकलेली आहे. त्यामुळंच असावं कदाचित, पण पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीत अतिरेकी आग्रह धरणारी मंडळी एका बाजूला आणि विकासाचा नारा बुलंद ठेवू पाहणारे दुसऱ्या बाजूला, असा संघर्ष गेली काही वर्षं आपण पाहतो आहोत.

या परिस्थितीपोटीच पर्यावरण संवर्धनाचा आग्रह विकासविरोधी आहे, असा सिद्धांत रूढ होऊ पाहत होता. पर्यावरणाचा विनाश केल्याशिवाय विकास साधलाच जाऊ शकत नाही, असा उपसिद्धांतही दृढ होत आहे. त्यामुळंच 'पर्यावरण की विकास' असा प्रश्न आ वासून पुढं उभा राहिला होता. जयराम रमेश यांनी मात्र दोन्ही टोकाच्या भूमिकांचा त्याग करत विवेकाची कास धरून पर्यावरणाचं संवर्धन करूनही विकास साधता येऊ शकतो, हे स्पष्ट केलं आहे. एवढंच नाही तर विकासाचा नऊ टक्के दर गाठण्यातही काही अडचण येऊ नये, असंही मत प्रदशिर्त केलं आहे. 'पर्यावरण की विकास' या प्रश्नाचं मूळच उखडून टाकून त्यांनी 'पर्यावरण आणि विकास' असा नि:संदिग्ध संदेश दिला आहे.

पर्यावरण संवर्धन म्हणजे जैसे थे परिस्थितीच कायम ठेवणं, असं नव्हे. तसा आग्रह धरला जातो कारण पर्यावरणात होणारा बदल आणि पर्यावरणाची हानी यात नेहमीच गल्लत केली जाते. कोणताही विकास प्रकल्प उभा करायचा तर पर्यावरणात बदल होणं क्रमप्राप्त आहे. साधा रस्ता बांधायचा तर जैसे थे परिस्थिती ठेवून तो बांधला जाऊ शकत नाही. वाटेत येणाऱ्या प्रत्येक वृक्षाला वळसा घालूनच पुढं जाणंही व्यवहार्य ठरत नाही. पण त्यापायी घटलेल्या वृक्षराजीच्या जागी नवीन वृक्षारोपण केल्यास पर्यावरणाची हानी होत नाही. यासंबंधीचे नियमही आहेत. त्यांची कडक अमलबजावणी करण्याचा आग्रह धरता येतो. पण चुकीच्या गृहीतापायी रस्ताच नको असा पवित्रा घेणं कितपत समंजसपणाचं होईल?

आज 'बिजली, पानी आणि सडक' या मूलभूत गरजा झाल्या आहेत. याविषयी कोणाच्या मनात किंतू असलाच तर त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या बिहारमधील निवडणुकांच्या निकालाचं परिशीलन करावं. गेल्या वीस वर्षांमध्ये झालेल्या आथिर्क प्रगतीपायी नागरिकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. त्या पूर्ण करणं हे कोणत्याही सरकारचं कर्तव्यच ठरतं. आणि त्या पूर्ण करायच्या तर जैतापूर किंवा विमानतळासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना पर्याय नाही. दाभोळ विद्युतकंेदामधून तयार होणारी वीज महागडी आहे असा आक्षेप घेत तो प्रकल्प समुदात बुडवायला निघालेली मंडळी आता इतर कंेदामधून नागरिकांना मिळणारी वीज त्याहीपेक्षा दुप्पट महाग झाल्यावरही मूग गिळून बसली आहेत.

विजेचा तुटवडा ही फार मोठी गंभीर समस्या सध्या देशाला भेडसावते आहे. त्यापायी औद्योगिक वाढीलाही आळा बसतो आहे. परिणामी रोजगारनिमिर्तीची लक्ष्यं गाठणंही अवघड होऊन बसलं आहे. वीजनिमिर्तीचे औष्णिक, जल, अणु हे जे व्यवहार्य स्त्रोत आहेत त्यापैकी अणुऊर्जा ही सर्वात जास्ती पर्यावरणप्रेमी असल्याचं आता जगभर मान्य केलं जात आहे. त्यामुळंच अनेक देशांमध्ये नव्यानं अणुवीजकंेदांच्या उभारणीला चालना मिळत आहे. पर्यावरणवादी हे मान्य न करता सौरऊर्जा किंवा पवनऊर्जा यासारख्या स्त्रोतांचा आग्रह धरतात. पण मोठ्या प्रमाणावर वीजनिमिर्तीसाठी या स्त्रोतांचा वापर करता येईल, असं तंत्रज्ञान अजून विकसित झालेलं नाही. उपलब्ध तंत्रज्ञानाचा वापर केल्यास ही वीज फारच महाग पडते. शिवाय जर सौरऊर्जानिमिर्तीसाठी सोलर फार्म बांधायचं असेल तर त्यासाठीही फार मोठ्या प्रमाणात जमीन लागणारच. आज जैतापूरला होत असलेल्या विरोधात, किंवा इतरही प्रकल्पांच्या विरोधात, जमीनसंपादनाचा मुद्दा कळीचा झाला आहे. तो सौरऊर्जा कंेदाच्याही आड येईलच.

अणुऊर्जा प्रकल्प पर्यावरणविरोधी आहेत, हे एक चुकीचं गृहितक आहे. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या प्रवक्त्यांनी अणुऊर्जा कंेदातून किरणोत्सार होतो आणि त्याचा पर्यावरणावर अनिष्ट परिणाम होऊन त्यापायी हरितपट्टा निकालात निघतो, असं विधान केल्याचं वृत्त प्रसारित झालं आहे. हे विधान त्यांनी कोणत्या आधारावर केलं? कारण त्याच्या पुष्टीसाठी त्यांनी कोणताही ठोस, सबळ आणि विश्वासार्ह पुरावा दिलेला नाही. वस्तुस्थितीशी ते विसंगत आहे. जैतापूरचा प्रकल्प ज्या फ्रान्सच्या सहकार्यानं उभा होत आहे त्या फ्रान्समधली ७८ टक्के वीज अणुऊर्जा कंेदांमधून मिळते. एकूण ५९ अणुभट्ट्या तिथं कार्यरत असून त्यातून ६३ हजार मेगावॉट वीज तयार केली जाते. फ्रान्समधील ही वीज सर्वात स्वस्त असल्यामुळं तो देश फार मोठ्या प्रमाणात विजेची निर्यातही करतो.

फ्रान्सचं एकूण क्षेत्रफळ ५ लाख ४५ हजार किलोमीटर वर्ग एवढं आहे. त्यावर ५९ अणुभट्ट्या म्हणजे दर दहा हजार किलोमीटर वर्ग क्षेत्रफळात एक अणुभट्टी असं प्रमाण पडतं. किंवा दर साडेआठ हजार किलोमीटर वर्ग प्रदेशात एक हजार मेगावॉट अणुऊर्जानिमिर्ती होते. त्यातून जर असह्य प्रमाणात किरणोत्सार होत असेल तर संपूर्ण देश बेचिराखच व्हायला हवा. त्या देशाला भेट देणारा कोणीही तेथील हरितभूमीनं प्रभावित झाल्याशिवाय राहत नाही. फ्रान्सच कशाला, अण्वस्त्रांच्या भीषण संहारकतेचा अनुभव घेतलेल्या जगातील एकमेव अशा जपानमध्येही २५ टक्के वीज अणुऊजेर्च्या माध्यमातून मिळविली जाते. आपल्या देशात जैतापूरनंतरही हे प्रमाण दहा टक्क्यांवरसुद्धा पोचणार नाही.

अणुवीजनिमिर्ती कंेदाजवळ किरणोत्सार होत असतो हे विधान दिशाभूल करणारं आहे. कारण त्याचा अर्थ असा होतो की, जिथं अणुवीजनिमिर्ती कंेद नाही तिथं किरणोत्सार अजिबात नसतो. पुण्यामध्ये अणुवीजनिमिर्ती कंेदही नाही की संशोधनासाठीची अणुभट्टीही नाही. नागपूरला नाही, दिल्लीला नाही. इतर अनेक ठिकाणी नाही. म्हणून तिथं अजिबात किरणोत्सार नाही, अशी परिस्थिती नाही. नैसगिर्करीत्या काही किरणोत्सार सर्वत्र होतच असतो. याला बॅकग्राऊंड रेडिएशन म्हणतात. त्यापासून प्रत्येकाला काही डोस मिळतच असतो. त्याची जागतिक सरासरी २.५ मिलिसिव्हर्ट एवढी आहे. किमान एक आणि कमाल दहा असं त्याचं प्रमाण आहे. विमानातून प्रवास करताना तर त्याहून अधिक डोस मिळत असतो. अणुवीजकंेदाच्या परिसरात ही सरासरी उल्लंघली गेली तरच तिथं टाळता येण्याजोगा किरणोत्सार होतो, असा दावा करता येईल. ती सरासरी ओलांडली जाऊ नये यासाठीचे नियम इंटरनॅशनल कमिशन फॉर रेडिएशन प्रोटेक्शन (आयसीआरपी) या संस्थेनं घालून दिले आहेत. त्यांचं काटेकोर पालन सर्वच देश करतात. ते तसं आपल्या देशातल्या अणुवीजकंेदांमध्ये केलं जात नाही असा दावा असेल, तर त्या परिसरात वाढीव किरणोत्सार होत असल्याचे ठोस आणि विश्वासार्ह पुरावे सादर केले जायला हवेत. ते न करताच अशी बेछूट विधानं करणं हे सर्वसामान्यांच्या सारासार विचाराऐवजी भावनेला आवाहन करत त्यांची दिशाभूल करणंच आहे. अणुऊजेर्चा प्रश्न सध्या प्रचलित असल्यामुळं त्या क्षेत्राचं हे उदाहरण घेतलं असलं तरी पर्यावरणवादी नेहमीच अशी निराधार आणि खळबळजनक विधानं करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्यापायीच पर्यावरण संवर्धन हे विकासविरोधी असल्याची भावना प्रबळ होत जाते. आणि ज्यांना विकासाची आवश्यकता वाटते त्यांचा पवित्राही ताठर बनत जातो. संवादाची शक्यताच मावळून जाते.

अणुऊजेर्विरुद्ध किंवा कोणत्याही नव्या विकासप्रकल्पाविरुद्धचा सगळा एकांगी आणि सत्यस्थितीशी विपरित असणारा व माणसाच्या मनात असलेल्या भीतीच्या मूलभूत भावनेला आवाहन करणारा प्रचारच विकासप्रकल्प पर्यावरणविरोधी आहेत ही समजूत जनमानसात रुजवत असतो. खरं तर पर्यावरण संवर्धन विकासविरोधी आहे की नाही, एवढाच विचार नेहमी केला जातो. केवळ काळा आणि पांढरा या दोन रंगांमध्येच या विषयाचं चित्रण केलं जातं. ते चुकीचं आहे. त्या दोन टोकाच्या रंगांमध्ये अनेक करड्या रंगाच्या छटा आहेत. शिवाय आज या विषयाला आंतरराष्ट्रीय राजकारण, समाजकल्याण, अर्थकारण, औद्योगिकीकरण असे अनेक पैलू आहेत. सध्या संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या हवामानबदलाबाबतीत कोणतंही एक राज्य किंवा कोणताही एक देश स्वतंत्ररीत्या काही उपाययोजना करू शकत नाही की कोणतंही धोरण आखू शकत नाही. पर्यावरणविषयक सर्वच मुद्द्यांबाबतीत हीच परिस्थिती आहे. त्यामुळं एकांगी विचार टाळत विवेकाची कास धरून मध्यममागीर् निर्णयच घ्यावे लागतील, हा संदेश जयराम रमेश यांनी दिला आहे. त्याचं आपण स्वागतच करायला हवं.
....................

विरोधकांचे आक्षेप

आण्विक किरणांमुळे कर्करोग, वंध्यत्व येणे, मुले विकृत होणे, त्वचा जळणे असे परिणाम होऊ शकतात. अणुभट्टीतील इंधनाच्या राखेतील किरणोत्सगीर् दव्ये शेकडो वषेर् वातावरणात टिकून राहतात. या अणुऊर्जा प्रकल्पामुळे कोकणच्या निसर्गरम्य भूमीची, सागरी पर्यावरणाची अपरिमित हानी होईल. कोकणच्या निसर्गरम्य परिसरातील जैवविविधता आणि निसर्ग धोक्यात येईल. प्रकल्पाची जागा भूकंपप्रवण क्षेत्रात मोडते, याकडे सरकारकारने दुर्लक्ष केले आहे.

Monday, December 6, 2010

आदरांजली

भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज ५४ वी पुण्यतिथी, "मी महाराष्ट्र महाराष्ट्र माझा" तर्फे ह्या महा मानवास महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली

Thursday, December 2, 2010

दोस्त दोस्त ना रहा...

शिवसेना आणि राष्ट्रवादी ची युघाडी (युती / आघाडी) अटळ आहे.

शिवसेनेला एकच सांगणे आहे कि आता एकदाचं लग्न लाऊन टाका कि, किती दिवस बी जे पी च्या गळ्यात गळे घालून राष्ट्रवादी ला डोळे मारणार? प्रत्येक ठिकाणी दोघं एक मेकाची मदत घेतात मग विधानं सभेत गोंधळ घालण्याचं नाटक का करता???

वाचा म टा चा संपादकीय लेख .......




शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची युती गेली दोन-अडीच दशके अभेद्य आहे, असा डिंडिम त्या दोन्ही पक्षांचे नेते सतत वाजवत असतात. अधूनमधून कोणी तरी 'शत प्रतिशत' ची घोषणा देतो, मग दोन्ही बाजूचे नेते भुजा सरसावून युतीतल्या आपल्या 'मित्रा'ला त्याची जागा दाखवून देण्याचाही प्रयत्न करतात; नाही असे नाही. तरीही पुन्हा लगोलग या दोन्ही पक्षांचे नेते हातात हात घालून छायाचित्रकारांना 'पोज' देतात आणि युती अभेद्य असल्याच्या तुताऱ्या फुंकू लागतात! असा खेळ महाराष्ट्रात गेली जवळपास २५ वषेर् सुरू आहे. त्यामुळेच विधान परिषदेच्या निवडणुकीत जळगावातच आपल्या मुलाच्या पदरी पराभव आल्याने विरोधी पक्षनेतेपद भूषवणारे भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांना अतोनात दु:ख झाले असले, तरी राज्यभरातील जनतेला त्यामुळे कवडीचेही आश्चर्य वाटलेले नाही. त्याचे प्रमुख कारण म्हणजे राज्यात आघाडीचे सरकार असले आणि विरोधी बाकांवर युती असली, तरी त्या चारही प्रमुख पक्षांमध्ये स्वत:ची ताकद वाढवण्यासाठी सतत शह-काटशहाचे डावपेच खेळले जात आहेत. तरीही कल्याण-डोंबिवली महापालिकेत पदरी आलेला पराभव आणि त्यास कारणीभूत ठरलेली शिवसेेनेची रणनीती यामुळे भाजपचे महाराष्ट्रातील नेते कमालीचे अस्वस्थ झाले होते. आता त्यापाठोपाठ 'दादागिरी'च्या माध्यमातून शिवसेनेने खडसे यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांची जागा तर दाखवून दिली आहेच; शिवाय त्यामुळेच राष्ट्रवादी काँगेसचे शिवसेनेशी किती मधुर संबंध आहेत, त्यावरही प्रकाश पडला आहे. याची परिणती युतीतील या दोन पक्षांमध्ये वितुष्ट येण्यात होणार, हे उघड आहे आणि खुद्द खडसे यांनी 'दगाबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू परवडला!' असे उद्गार काढून त्याची प्रचीती आणून दिली आहे. भाजपचे राज्यातील नेतेही निखिल खडसे यांच्या या पराभवामुळे कमालीचे नाराज झाले असून आता या मित्रपक्षाला एकही वैधानिकपद मिळू न देण्याचा निर्णयही त्यांनी घेतला असल्याचे वृत्त आहे. अर्थात, शिवसेना आणि भाजप यांच्या 'मैत्री'वर हा घाव घालण्यास राष्ट्रवादीने आखलेले डावपेच कारणीभूत ठरले आहेत, हे उघड आहे. खरे तर या निवडणुकीत जळगावातून राष्ट्रवादीने अनिल चौधरी यांच्या रूपाने अधिकृत उमेदवार उभाही केला होता. पण सरळ लढत झाली असती, तर खडसे यांचे चिरंजीव निवडून येणार हे स्पष्ट होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच तेथे ईश्वरलाल जैन यांच्या चिरंजीवांना बंडखोरी करण्यास नुसते भागच पाडले असे नव्हे तर सुरेशदादा जैन या सध्या शिवसेनेत असलेल्या आपल्या जुन्याच नेत्याच्या सहकार्याने निवडूनही आणले! अर्थात, त्यासाठी पैशांची किती उधळण झाली आणि कोणाकोणाला परदेशवारीचे सौख्य लाभले, त्याच्या कहाण्या आता खानदेशाच्या सीमा पार करून थेट विदर्भातील उपराजधानीत म्हणजे नागपुरात सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात चचिर्ल्या जाऊ लागल्या आहेत. शिवसेना आणि भाजप यांच्यातील रुंदावत चाललेल्या या दरीमुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आनंद होणे साहजिकच आहे; कारण मुंबईतील 'आदर्श' सोसायटीच्या घोटाळ्यानंतर अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी झाली, तेव्हा राज्यात कमालीची बेदिली माजली होती. विलासराव देशमुखांपासून नारायणराव राणे यांच्यापर्यंत अनेक नेते या पदासाठी दावे करत होते आणि काँगेस हायकमांड स्वच्छ चारित्र्याच्या नेत्याच्या शोधात होती. अशा परिस्थितीत पृथ्वीराज यांनी राज्याची धुरा हाती घेतली, तेव्हा त्यांना पुढच्या १५ दिवसांत सुरू होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनाला तोंड देणे कठीण होईल, असे चित्र उभे राहिले होते. 'आदर्श' घोटाळ्यावरून विरोधक कमालीचे आक्रमक होते. पण जळगावातील या एका पराभवामुळे सारे चित्र पुरते पालटून गेले आहे. खुद्द खडसे मनात 'दोस्त दोस्त ना रहा...' हे गीत आळवत आहेत आणि त्यामुळे सत्ताधारी आघाडी आनंदित होणे स्वाभाविक आहे. पण त्याचवेळी बहुधा मुख्यमंत्र्यांच्या ओठावरही तेच गीत असेल, तर तो योगायोग म्हणता येणार नाही. कारण गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची शिवसेनेशी जवळीक वाढत चालली आहे. त्याचे पहिले प्रत्यंतर नव्या मुख्यमंत्र्यांना कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने ज्या पद्धतीने तटस्थ राहण्याची भूमिका घेऊन शिवसेनेला महापालिका बहाल केली त्यावरून आले असणारच. आता त्यापाठोपाठ जळगावातही शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या 'युती'तूनच मनीष जैन यांच्या विजयाची गुढी उभारली गेली आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनाला सामोरे जाताना पृथ्वीराज चव्हाण यांना या खेळामुळे दिलासा मिळाला असला, तरी वर्षभरात सामोऱ्या येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही सेना-राष्ट्रवादी यांचे प्रेम असेच कायम राहिले, तर ही प्रतिष्ठेची महापालिका काँगेसच्या हाती येणे कठीण आहे, हे लक्षात आल्याने त्यांच्या पोटात गोळा आलेला असू शकतो. हे सारे राजकारण लक्षात घेऊनच आपल्याला पुढे वाटचाल करावयाची आहे, हे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आले असेलच.

Wednesday, December 1, 2010

भ्रष्ट अधिकाऱ्याला वाचविण्यासाठी शिवसेनेने चुकविली कारवाईची बस

लोकसत्ता च्या सौजन्याने ............................



सुमारे सात कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारात चौकशी समितीने दोषी ठरविलेले बेस्टचे निलंबित उपमहाव्यवस्थापक एस. ए. पुराणिक यांना पुन्हा एकदा शिवसेनेने अभय दिले. आज झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत पुराणिक यांच्या बडतर्फीचा प्रशासनाने दिलेला प्रस्ताव पुराणिक यांच्या निवृत्तीपूर्वी म्हणजेच सायंकाळी पाच वाजण्यापूर्वी मंजूर होण्याची आवश्यकता असताना प्रत्यक्षात तो पाच वाजल्यानंतर मंजूर झाला. त्यामुळे शिवसेनेने भ्रष्टाचारी अधिकाऱ्यास पाठीशी घातल्याचा आरोप करीत भाजप आणि काँग्रेसने सभात्याग केला.
बेस्टमध्ये उपमहाव्यवस्थापक (वीज पुरवठा) या पदावर कार्यरत असताना पुराणिक यांनी कुचकामी मिटर खरेदी करणे, कंपन्यांना लाखो रुपयांची बिले कमी करून देणे अशा प्रकारे कोटय़वधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवून त्यांना २३ जुलै २००९ मध्ये निलंबित केले होते. त्यानंतर या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश राजन कोचर यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालात पुराणिक यांना १७ पैकी १५ आरोपांत दोषी ठरविले असून त्यांनी बेस्टचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान केल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पुराणिक यांना बडतर्फ करण्याची महत्वपूर्ण शिफारसही या अहवालात करण्यात आली असून त्यानुसार पुराणिक यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव आज बेस्ट समितीच्या बैठकीत प्रशासनातर्फे मांडण्यात आला होता.
पुराणिक आज सायंकाळी पाच वाजता सेवानिवृत्त होणार असल्याने त्यापूर्वी त्यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव मंजूर होणे आवश्यक असताना सत्ताधारी शिवसेनेने मात्र त्याना वाचविण्याचाच आटोकाट प्रयत्न केला. पुराणिक यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव त्वरित मंजूर करण्याची मागणी भाजपा आणि काँग्रेसच्या सदस्यानी लावून धरली. मात्र त्यांना वाचविण्याचा शिवसेना आटोकाट प्रयत्न करीत असल्याचे लक्षात येताच भाजपासह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यामुळे कोरम अभावी सभा तहकूब करण्याची आफत सत्ताधारी शिवसेनेवर ओढवली. शेवटी भाजप सदस्यांची समजूत काढीत त्याना पुन्हा सभागृहात बोलावण्यात आले आणि पुराणिक यांच्या बडतर्फीचा प्रस्ताव मंजुरीच्या विसंबास प्रशासकीय घोळच कारणीभूत असल्याचा आरोप सेनेने केला.
अखेर पाच वाजून पाच मिनिटांनी म्हणजेच पुराणिक यांच्या निवृत्तीनंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्याचवेळी पुराणिक यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला.