Friday, May 28, 2010

जिल्हाप्रमुखांचे आढाव्याचे ‘महानाटय़’

सदर लेख हा लोकसत्ता मधील ठाणे वृतांत ह्या पुरवणी तून घेतला आहे

विनोद


लोकसत्ता
२८ मे २०१०
भगवान मंडलिक

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता आहे. गेल्या पाच वर्षांच्या काळातील अडीच वर्षांच्या काळात काँग्रेस आघाडीच्या सत्तेने पालिकेत प्रचंड अनागोंदी कारभार केला. जनतेला नागरी सुविधा नाहीच पण केवळ जनमताची थट्टा आघाडीने केली. मतांची उलटापालट करून अडीच वर्षांनंतर पालिकेतील सत्ता काबीज करण्यात शिवसेनेने महत्वाची भूमिका बजावली. पण, आता युतीच्या अनागोंदी कारभारामुळे काँग्रेस आघाडीचीच सत्ता बरी होती, असे म्हणण्याची वेळ मतदार नागरिकांवर आली आहे.याचे प्रत्यंतर मतदार जनता विविध विकास कामे, त्याचा उडालेला फज्जा या माध्यमातून घेत आहे.

पालिकेत युतीची सत्ता काबीज केल्यानंतर येथील सत्तेवर अंकुश ठेवण्याचे, मतदार जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करून घेण्याचे काम कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, त्यानंतर जिल्हासंपर्कप्रमुख एकनाथ शिंदे यांचे होते. पण नंतर युतीच्या सत्तेने जनतेला काय दिले? ज्या तडफेने महापौर रमेश जाधव यांना शिवसेनेने महापौरपद बहाल केले. ते आपल्या पदाला उतराई झाले का? असे एक ना अनेक प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित झाले आहेत. पालिकेत युतीची सत्ता आणण्यासाठी, मतांची बेरीज वजाबाकी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह रात्रीचा दिवस केला. सत्तांतरात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या हुकमी उमेदवारांना भूमीगत ठेवून हॉटेलची लाखो रूपयांची बिले देऊन उधळपट्टी करण्यात शिवसेनेला आनंद वाटला. गेल्या अडीच वर्षांच्या काळात सत्ता आणण्यासाठी जिल्हासंपर्कप्रमुख एकदाच पालिका सभागृहातील ‘व्हीआयपी’ कक्षात बसले होते.

त्यानंतर एखाद्या महासभेला येऊन महासभेत काय चाललेय, पीठासन अधिकारी तथा महापौर सक्षमतेने काम करतात का, की थिल्लरपणा करतात याचे मूल्यमापन करावे, असे एकदाही शिंदे, त्यांचे सहकारी किंवा भाजपच्या नेत्यांना कधी वाटले नाही. फक्त ‘बीओटी’ प्रकल्प, टेंडर टक्केवारी आणि रात्री १२ नंतरच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका एवढ्याच गर्तेत जिल्हाप्रमुख अडकून पडले. माजी जिल्हाप्रमुख स्व. आनंद दिघे हे दर महिन्याला कोणत्याही कारणाने पालिकेत येत असत. आढावा घेत. वर्तमानपत्रातून एखाद्या विषयावर चर्चा चालू असेल तर त्याची गंभीर दखल घेण्यास पालिकेतील पदाधिकाऱ्यांना भाग पडत असत. पण ते चित्र आता दिसत नाही.

शहराचा ‘राजा’ महापौर रमेश जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पालिकेत प्रचंड अनागोंदी कारभार सुरू केला आहे. त्याला ‘प्रधान’ आयुक्त गोविंद राठोड यांचीही साथ लाभल्याने या अनागोंदीत आणखी भर पडली आहे. राजा आणि प्रधान एकाच टेबलावर सगळे ‘गेम’ खेळत असल्याने वरच्या राजापासून ते पालिकेतल्या राजापर्यंत सर्वत्र आनंदीआनंद आहे.

डोंबिवलीतील क्रीडासंकुलाच्या जागेवर सुरू असलेले मॉलचे काम हे अधिकृत आहे. पण पेपरवाले चुकीच्या बातम्या छापत असल्याची माहिती महापौर जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना गेले वर्षी दिली होती. पण मुख्यमंत्र्यांनीच हे काम अनधिकृत असल्याचे जाहीर केले आहे. या मॉलला शहरातील सर्व जाणकारांचा विरोध आहे. जनमताचा आदर न करता पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजप युतीच्या पदाधिकाऱ्यांनी ठेकेदाराला पाठीशी घालून हा विषय रेटून नेला. याउलट एक दिवस जिल्हासंपर्कप्रमुख शिंदे यांनी संध्याकाळी मॉलच्या ठिकाणी भेट देऊन ‘हे काम जर अधिकृतपणे सुरू असेल तर संबंधित पेपरवाल्यांना खुलासा, नोटीस (ठाणे वृत्तांत)पाठवून द्या’ म्हणून पदाधिकाऱ्यांना सूचित केले होते. भाषाप्रभू कै. पु. भा. भावे यांच्या नावाने ‘भावे स्मारक’ उभारण्याचा निर्णय महापौर जाधव यांनी शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत घेतला होता. उद्धव व रश्मी ठाकरे यांनीही हे स्मारक झालेच पाहिजे म्हणून आग्रह धरला होता. पण महापौर जाधव हे ‘पेपरवाले काहीही छापतात, ते छापतात आणि आपण कशाला ती कामे करायची’ या मताचे असल्याने जिल्हाप्रमुखांनी नेहमीप्रमाणे टंगळमंगळ केल्याने या विषयाकडे दुर्लक्ष केले. अखेर भावे यांची जन्मशताब्दी झाली तरी ‘भावे स्मारकाची’ साधी एक वीटही हलली नाही.

एकनाथ शिंदे यांचा आपल्याच पदाधिकाऱ्यांवर वचक नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या अनागोंदी परिस्थितीचा आता ‘विचका आणि चिखल’ तयार झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या पालिका निवडणुकीत काय करायचे, आताची विकासकामांची परिस्थिती काय याचा आढावा घेण्यासाठी शिंदे यांनी पालिकेत पदाधिकाऱ्यांची अलीकडेच एक आढावा बैठक घेतली. उद्धव ठाकरे परदेशातून आल्यावरच शिंदे यांना आढावा बैठक घेण्याची उपरती का झाली. पेपरमध्ये यासंदर्भात बातम्या प्रसिद्ध व्हाव्यात, असे का वाटले असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.

आतापर्यंत स्वत:च्या मस्तीत दंग असलेल्या शिवसेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पालिकेत विकासकामांच्या नावाने आपण जो ‘चिखल’ तयार केला आहे. मतदार जनतेचा आपण अंत पाहिला आहे, ती मतदार जनता आता मनसेला हाताशी धरून त्याच ‘चिखलात’ आपल्याला गाडल्याशिवाय राहणार नाही, याची भीती युतीच्या नेत्यांना आतापासून वाटू लागली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आढाव्याचे केवळ नाटक केले, असे मानले जाते.

Monday, May 24, 2010

दिलमजाई ची दोन पत्र ... लोकप्रभा

सदर लेख हा लोकप्रभा ह्या अंकातून घेतला आहे ....
खालील लेख ह्या लिंक वर देखील मिळू शकतो ....


हा लेख काल्पनिक आहे ......ह्याची नोंद घ्यावी ....

विनोद

वाचक हो, आजचा दिवस आमच्या आयुष्यातील आत्यंतिक रोमांचक आणि थरारक आणि ‘क’ प्रत्ययांकित काहीतरी असा दिवस आहे. आमचे जानेमाने सन्मित्र राजसाहेब ठाकरे आणि आमचे सज्जन शिवसैनिक आणि कार्यप्रमुख उध्दोजी बाळाजी यांच्या दिलजमाईची स्वप्ने महाराष्ट्रातील डोंगरदऱ्यांना, झाडावेलींना, गाईगुरांना, आणि तमाम मराठी मनांना पडू लागलेली असतानाच आम्हास हा पत्रव्यवहार गवसला. या आत्यंतिक गोपनीय आणि वैयक्तिक पत्रांमध्ये या दिलजमाईचे गुपित साठवले आहे. ते मुळातून वाचलेले बरे! ही पत्रे खोटी आहेत, असे नंतर म्हणायचे ठरल्यामुळे ती खोटी आहेत हे आम्हीच सर्वात आधी म्हणतो आहोत! याउप्पर ती वाचावयाची की नाही याची मर्जी तुमची!!


प्रिय राजा,
खूप दीवसांनी तूला पत्र लिहत आहे. सवय नाही, तरीही लिहत आहे. आजकाल कोणीही पत्र लिहत नाही, हे मला माहीत आहे. मोबाइलवर मेसेज पाठवतात किंवा इमेलवर मेल पाठवतात. पण मेसेज आणि मेल दोन्हीही कोणीही वाचू शकतो,

असे मला सांगीतले गेले. पत्र सेफ असते. जिभ लावून एकदा बंद केले की बास. वाचून झाल्यावर फाडुन टाकावे किंवा सुरनळी करून कानातला मळ काढावा! या पत्राचा वीशय खुप गंभीर आणि सिक्रेट असल्याने मी हे पत्र गपचूप पाठवत आहे. वाचल्यावर इमिजिएट फाडुन टाक. भलत्या कुणाच्या हाति गेले तर चॅनलवाले किमान आठ दीवसाचा पगार खातील! असो.
गेल्या आठवडय़ात तु माझ्या फोटोग्राफीचे जाहीर कौतुक केलेस. अंबरनाथ पालिकेत शिवसेनेला पाठिंबाही दीलास. तूझ्यामुळे आमचा नगराध्यक्ष निवडुन आला. हे तु काय चालवले आहेस? सुरवातीला मला वेगळाच वास आला. यामधे काही तरी गेम (पुर्वीच्या काळी मराठीत ‘गोम’ म्हटले जात होते, असे साहेबांनी सांगितले!) आहे, असे आम्हा सर्वानाच वाटले. चार वर्षे एखाद्या सासूरवाशीणिला यथास्थित मारझोड करून अचानक वाढदीवसाला तीला कोल्हापुरी साज आणुन दीला तर कसे वाटेल? तसे डिट्टो वाटले. अंबरनाथला तर जाम गोची होणार असेच वाटले होते. तीढा सुटणे मुश्किल आहे, असे वाटत अस्तानाच मनसेने पाठिंबा दील्याचा फोन आला. मी तेव्हा तूला एसएमएसवरून मेसेज पाठवला होता. मिळाला का? मी मीलींद नार्वेकरकडून तूझा नवा नंबर घेतला होता. पण तो डॅम्बीस आहे. मागल्या वेळेला छगन भुजबळांचा नंबर मी त्याला वीचारला तेव्हा त्याने मुद्दाम दहा डीजिटचा मोबाइल नंबर सांगण्याऐवजी नऊच आकडे सांगीतले होते. मी शेवटी मनानेच झिरो लावून दहा आकडी नंबर लावून त्यांना मेसेज पाठवला! आश्चर्य म्हंजे माझा आकडा.. आपले सॉरी नंबर करेक्ट लागला!! चार वर्षांपूर्वी तु शिवसेना सोडलीस तेव्हाचा तूझा नंबर अजूनही माझ्या फोनबुकमध्ये आहे. पण सध्या तो नंबर माहीमच्या एका फर्निचरवाल्याकडे आहे. एकदा मध्यरात्री मी सहज तूझी चेष्टा करावी म्हणून त्या नंबरवर फोन केला होता. फारच घाणरडे काही तरी बोलला तो. तुझाच आवाज काढून बोलत होता. मी त्याला दमात घेतला थोडाफार, तर हसायलाच लागला!! मग मी फोन कटच केला!! जाऊ दे फर्निचरवाल्याचे एवढे काही नाही. मुद्दा आपल्या संभाव्यदिलजमाईचा आहे. कारण आपण दोघे ’दोन’ असलो, तरी आपली मने एकच आहेत. आपण एकत्र येणार या कल्पनेने राजा, माझी झोपच उडाली आहे रे!

राजा, लहानपणीच्या आपल्या कितीतरी आठवणी एकत्र आहेत. दादरच्या घरापासुन ते जुन्या मातोश्री बंगल्यापर्यंत. कीतीतरी ठीकाणी आपण इकत्र धमाल केली. लहानपणी आपण बिल्डिंगच्या जिन्यात घसरगुंडी खेळायचो. म्हंजे जिन्याच्या लाकडी कठडय़ावरून घसरत घसरत यायचे आणि जिना सुरू होतो, तेथल्या लाकडी नक्षीदार खांबाशी ब्रेक मारायचा. फार चपळाईने ब्रेक मारावा लागे. पण एकदा तु त्या कठडय़ाला तेल लावून ठेवलेस. पुढे तीनेक महीने मी पत्त्यांचा बैठा खेळ खेळत होतो. पुढे मोठेपणी मला फोटोग्राफीचा नाद लागला. तु आणि बाबा म्हणजे साहेब व्यंगचित्रे काढत बसायचात. मी कॅमेरा गळय़ात घालुन हिंडायचो. मी छान फोटो काढतो, असे सांगुन तु स्वत:चे खुप फोटो साहेबांबरोबर काढून घेतलेस. सुरवातीला नाही, पण नंतर नंतर माझी टय़ूब पेटायला लागली. क्यामेरामनचा कधीही फोटो निघत नसतो. आम्ही आपले येडय़ासारखे फ्लॅश मारतोय, आणि चमकतात, तुमच्यासारखे तिसरेच! हे फोटोग्राफरचे प्राक्तन आहे. माझ्या गळयात क्यामेरा अडकवुन तु पक्षात सटासट प्रगती करतो आहेस, हे मला उशीरा कळले. पण कळले तेव्हा मी तुझ्या गमज्या बंद केल्या.
तु तर साहेबांची सगळीच्या सगळी नक्कल करायचास. (अजुनही करतोस! कबूल कर!!) ते व्यंगचित्रे काढतात, म्हणून तुही काढणार. ते पाइप ओढायचे म्हणून तुही ते पाइपचे झुरके चोरून मारायचास. एकदा असाच पाइप ओढताना रेडहॅण्ड पकडला गेला होतास. आठवते आहे? पाइप भरून तो पेटवून तु थेट साहेबांसारखा खुर्चीत बसून डायलॉग मारत होतास. मी काही कारणाने खोलीबाहेर गेलो, आणि थोडय़ावेळाने साहेब, म्हणजे तुझे काकाच आले!! मग काय!! नंतर चड्डी बदलून तु काही घडलेच नाही, अशा आविर्भावात खेळायला बाहेर आलास! हे जे तुला जमते ना, ते मला अजुनही जमत नाही. तुझ्या मनात काय चालले आहे, याचा थांग लागत नाही. माझ्या पोटात गुरगुरत असले, तरी बाहेर ऐकू येते! तु माझ्या फोटोठााफीचे कौतुक केलेस, खुप बरे वाटले. ‘महाराष्ट्र देशा..’ हा चित्रग्रंथ तयार करताना मी खुप कष्ट घेतले होते. यात एरियल फोटोग्राफीचे नमुने आहेत. एरियल, म्हंजे हवाई फोटोग्राफी फार अवघड असते. विमानात किंवा हेलिकॉप्टरमध्ये जायचे. आडवे व्हायचे. खाली किल्ला दिसत असतो. त्याचे फोटो घ्यायचे. हेलिकॉप्टरमध्ये खरे तर मला मळमळते. पण तरीही मी फोटो घेतले. आडवे झोपुन, बेल्ट लावून फोटो काढावे लागतात. बेल्ट मस्ट आहे. जरा हेलिकॉप्टर तिरके झाले की माणूस घसरतो! दरवाजा उघडा असला की झालेच. बेल्ट बांधलेला असला तर मग काही प्रॉब्लेम नाही. एकदा मी चक्क बेल्ट बांधायला विसरलो! तो पायलट घाबरून ओरडायला लागला. मी जाम हसलो त्याला! पुढे मला इरियल फोटोग्राफीचा चस्का लागला. मी हवेत उंच उडी मारून वाघांचे फोटो काढले. त्यालाही एकाअर्थी एरियल फोटोग्राफीच म्हणावे लागणार! माझ्या आगामी चित्रग्रंथात मी हरीण, वाघ, सिंह यांची एरियल फोटोग्राफी संकलित करतो आहे. चित्रग्रंथाचे नाव मी अ‍ॅक्चुअली, ‘महाराष्ट्र देशी..’ असे ठेवले होते. पण ‘देशी’ फार वाईट दिसते असे सुभाष देसाईंनी तोंडाकडे अंगठा नेत सांगीतले. मग ’देशी’ची वेलांटी खोडून ‘देशा’ केले. दुष्काळावरही मी तिसरा चित्रग्रंथ सिद्ध करत आणला आहे. शेतकऱ्यांची हलाखी दाखवणाऱ्या या पुस्तकासाठी ‘देशा’मधली मात्रा काढुन टाकणार आहे, आणि ‘महाराष्ट्र दशा’ असे नाव ठेवतो आहे. आहे की नाही मी कल्पक? देशी, देशा, अािण दशा!!

राजा, मी तुझ्या प्रत्येक प्लस पाईण्टला मायनस करत चाललो आहे, हे पाहातो आहेस ना? तु भाषण सॉलिड करतोस, (आता) मीही मस्त बोलतो असे संजय राऊत आणि भारतकुमार राऊत हे दोन्ही खासदार संपादक म्हणत असतात. तु इव्हेण्टवाला म्हणून प्रसिध्द झालास, मी तर साक्षात लता मंगेशकरांचा इव्हेट करून दाखवला. तु फोटोबायोग्राफी काढलीस,मी गडकिल्ल्यांचे सरस पुस्तक काढले. तु गर्दी जमवतोस, आता मीही जमवतो. तु मीत्रांच्या टोळक्यात असतोस, आता मीही ठरवून ग्रुप जमवला आहे. आहे की नाही?
पण राजा, असे असले तरी काही गोष्टी बदलणार नाहीत. मी चांगला फोटोग्राफर आहे असे जरी तु म्हणालास तरी मी तुला चांगला व्यंगचित्रकार म्हणणार नाही! कारण तु आजकाल काही काढतच नाहीस. मी मात्र खुप फोटो काढत असतो. पण या सगळया भानगडीत आपण दोघांनी एकत्र येण्याची हालचाल सुरू झाली आहे. कालच दिल्लीहून शरदकाका पवारांचा फोन येऊन गेला. बातम्यांनी चपापले होते. सुशीलकुमार शिद्यांनी फोन करून चौकशी केली. एकंदर लोक हादरले आहेत. इतकेच काय खुद्द आमच्या पक्षात अनेकांचे धाबे दणाणले आहेत. त्यात मीही एक गंमत केली. नारायण राणेंचा फोन येऊन गेल्याची पुडी मी आमच्या लोकात सोडून दिली आहे! म्हंजे तू, मी आणि राणे तिघेही परत एकत्र! भुजबळांचीही तशी तयारी आहेच. आपण सगळे पुन्हा एकत्र आलो, तर गणेश नाईक मागे राहणार नाहीत. अशा परिस्थितीत काँग्रेसवाल्यांना आणि राष्ट्रवादीवाल्यांना गावाकडे जाऊन शेती करण्यावाचून पर्याय राहणार नाही. खरे की नाही? आपण मात्र मुंबई महापालिका ताब्यात ठेवू शकू. तू परत आलास, तर मी तुला शिवाजी पार्क शाखेचा प्रमुख करीन! चालेल ना? सर्वाना आपल्या दिलजमाईची स्वप्ने पडत आहेत. पण आपण सावध पावले टाकली पाहिजेत.
बघ, वीचार कर, आणि मला सांग. पत्रच पाठव. फोन किंवा मेल नको. या पत्रात तुला असंख्य चुका शुध्दलेखनाच्या दीसतील. साहजिकच आहे. हे पत्र मी संजय राऊतांना डिक्टेट केले आहे! तुझाच,
- उ. ठा.
ता. क. : तू चांगला नव्हे, उत्कृष्ट व्यंगचित्रकार आहेस! थँक्यू!!

प्रिय दादू,
पत्र मिळाले, फाडून टाकले. बरं का.. किती अशुद्ध भाषा. शी!! अशाने मराठी भाषा लौकरच रसातळाला जाईल. राऊतांना सांगा, लौकरात लौकर म्हणजे पंधरा दिवसांत शुद्धलेखनाचा प्रश्न सोडवला नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते तो आपल्या पद्धतीने सोडवतील!! आणि त्याची जबाबदारी महाराष्ट्र सांस्कृतिक महामंडळ, मराठी भाषा सुधार समिती आणि प्रेस कौन्सिल यांच्यावर असेल!! असो. तुझे पत्र वाचून खूप बरे वाटले. अक्षर तुझे नाही हे मी ओळखलेच. पण ते राऊतांचे आहे, हेदेखील ओळखले. लहानपणीच्या काही आठवणी तू काढल्यास. या पत्रात अनेक गोंधळाचे मुद्दे आहेत. त्याबद्दल काही खुलासे याप्रमाणे :

१. माझा फोन नंबर तोच आहे. तू फर्निचरवाल्याला नव्हे, मलाच फोन केला होतास! असो!!
२. कठडय़ाला मी तेल लावले नव्हते. टाल्कम पावडर लावली होती!
३. मी आतल्या खोलीत पाइप ओढतो आहे, याची चुगली तूच काकांकडे केली होतीस. मी तेव्हा चड्डी बदलली कारण बाहेर खेळायचे माझे कपडे (अजूनही) वेगळे असतात!
४. मी कधीही काकांची नक्कल केली नाही. माझे नाव जॉनी लीव्हर नाही! काय आहे, ते तमाम महाराष्ट्राला ठाऊक आहे!!
५. मराठी माणसाला कायम गद्दारीचा साप चावतो. मराठी संस्कृतीच्या गंडस्थळावर दंशांवर दंश करणाऱ्या या गद्दारांवरती तुझं चौथं पुस्तक येऊ दे. त्याचं नाव आपण ‘महाराष्ट्र दंशा..’ असं ठेवू! (याला म्हंटात मेरी भी उप्पर एक र्दुी!) पण तुझं पुस्तक खरंच बरंच बरं आहे! असो!
६. तू पुस्तकं आणि फोटोच काढणार आहेस की राजकारण करणार आहेस?
७. क्रमांक पाचच्या मुद्दयात उपस्थित झालेल्या प्रश्नाच्या उत्तरात तू फक्त पुस्तकंच काढणार असशील, तर एकत्र यायला माझी हरकत नाही!
८. नुसतेच फोटो काढणार असशील, तरीही एकत्र यायला माझी हरकत नाही!
९. लता मंगेशकर आणि आशा भोसले या दोन्ही सख्ख्या बहिणी शेजारी शेजारी राहतात. पण गाणी वेगवेगळी म्हणतात! एकच गाणं दोघी म्हणत नाहीत. यावरून काय तो बोध घ्यावा!
१०. शरदकाकांचा मलाही फोन आला होता. बोलणे झाले नाही. सकाळी साडेआठला मिस्ड कॉल आलेला दिसतो आहे!
सारांश, मला तू काढलेले फोटो आवडतात, एवढेच खरे आहे. बाकी सगळा चॅनलवाल्यांचा भंपकपणा आहे. त्यांना मी चांगला ओळखून आहे. सध्या राजकारणात काहीही घडत नव्हते, म्हणून मी संधी साधून जरा टीआरपी मिळवला इतकेच. एवढया भांडवलावर दिलजमाईची भाषा करणे गाढवपणाचे आहे. योग्यवेळी ते मी बोलीनच.
बाकी ठीक. महापालिका निवडणुकीत भेटूच. घोडामैदान दूर नाही!

तुझाच,
राजा




Thursday, May 20, 2010

'टिंग्या'ला मिळाले हक्काचे घर

म टा च्या सौजन्याने

खालील बातमी महाराष्ट्र टाइम्स मधून घेतली आहे

विनोद

आपल्या उत्कट अभियनाच्या जोरावर थेट राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार टिंग्या अर्थात शरद गोयेकेरने पटकावला खरा, पण त्यामुळे त्याच्या आयुष्यातल्या अडचणी संपल्या नव्हत्या. जेमतेम २ माणसे राहू शकतील असे तंबूवजा घर आणि साध्या जेवणाचीही भ्रांत असणाऱ्या टिंग्याच्या कुटुंबाची ही व्यथा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोर आली आणि त्यांनी पुढाकार घेत शरदला तब्बल ८०० चौरस फुटांचा बंगलाच बांधून दिला आहे. त्यामुळे घराविना होणारे या कुटुंबाचे हाल संपुष्टात आले असून, शनिवारी शमिर्ला ठाकरे यांच्या उपस्थितीत गोयेकर कुटुंबाचा गृहप्रवेशाचा सोहळा होत आहे.

मंगेश हाडवळे यांनी दिग्दशिर्त केलेला टिंग्या २००८ मध्ये मराठी चित्रपट रसिकांच्या मनाला स्पर्श करुन गेलाच शिवाय त्याने देश परदेशात अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले. खुद्द राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते दिल्लीत ५५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट बालकलाकारासाठीचा पुरस्कार देऊन शरदला गौरवण्यात आले. या सोहळ्याचे वृत्तांकन करतांना काही टीव्ही चॅनेल्सवर शरदचे जुन्नर तालुक्यातल्या राजुरी या खेड्यातले तंबूवजा घर दाखवले जात होते. आपल्या मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेणाऱ्या एका मराठी कलावंताची ही दूरवस्था राज ठाकरे यांनी पाहिली आणि त्यांनी स्वखर्चातून शरदला प्रशस्त घर बांधून देण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयाच्या अंमलबजावणीची जबाबदारी आमदार शिशिर शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली. शिंदे यांनी तडक राजुरी येथे धाव घेऊन ऐसपैस घराचा आराखडा तयार केला. आपल्या गावातील कर्तबगार मुलासाठी घर बांधायचे आहे हे समजल्यावर स्थानिक बांधकाम व्यावसायिक अशोक आवटी यांनीही नफ्यावर पाणी सोडत तब्बल ८०० चौरस फुटांचे प्रशस्त घर बांधले आहे. साडे सहा लाख रुपये खर्चून बांधलेल्या या घरात २ बेडरुम, हॉल व किचन आहे. घरात जीवनावश्यक वस्तूदेखील पुरवण्यात आल्या असून, शनिवारी शमिर्ला ठाकरे व आमदार शिशिर शिंदे यांच्या उपस्थितीत गृहप्रवेशाचा सोहळा होत आहे. शरदचे वडील यशवंत व आई यमुनाबाई यांचे उत्पन्न फारसे नाही. त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह सुरळीतपणे व्हावा यासाठी राज ठाकरे यांनी यशवंत गोयेकर यांच्या नावावर दीड लाख रुपये बँकेत फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवल्याचे आ. शिशिर शिंदे यांनी सांगितले.

टिंग्याला आथिर्क मदतीच्या घोषणा अनेकांनी केल्या. पण प्रत्यक्षात मदतीचा हात मात्र राज ठाकरे यांनीच दिला. त्यांच्या मदतीमुळे हक्काचे घर मिळाल्याचा आनंद व्यक्त करतानाच यशवंत गोयेकर यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू ओघळले.


Tuesday, May 18, 2010

‘मनसे’ आमदारामुळे फसला बिल्डरचा ‘म्हाडा’चा प्लॉट हडप करण्याचा डाव

लोकसत्ता च्या सौजन्याने

खालील बातमी आजच्या ठाणे वृतांत मधून घेतली आहे आणि ती खालील लिंक वर देखील मिळू शकेल,


विनोद



बिर्ला महाविद्यालय परिसरातील ‘म्हाडा’ कॉलनीमधील एक रिकामा प्लॉट हडप करण्याचा एका बिल्डरचा डाव ‘मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांच्या प्रयत्नामुळे फसला आहे. ‘म्हाडा’चे स्थानिक अधिकारी आणि बिल्डर यांच्या एकत्रित संगनमताने ‘म्हाडा’चा हा प्लॉट विकसित करण्याचा डाव रचण्यात आला होता, अशी माहिती आमदार प्रकाश भोईर यांनी दिली.
आ. भोईर यांनी सांगितले, ‘म्हाडा’ कॉलनीमधील एका रिकाम्या प्लॉटवर एका बिल्डरने स्वत:च्या नावाचा फलक लावून हा प्लॉट आपण विकसित करणार असल्याचे जाहीर केले होते. ‘म्हाडा’चा हा प्लॉट बिल्डर परस्पर कसा काय विकसित करू शकतो, असे प्रश्न स्थानिक नागरिकांना पडले होते. याविषयी उघडपणे कोणी बोलण्यास तयार नव्हते. गेल्या दहा दिवसापासून आमदार भोईर यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी तक्रारी करून ‘म्हाडा’चा एक प्लॉट बिल्डर विकसित करीत असल्याचे निदर्शनास आणले.
आ. भोईर यांनी ‘म्हाडा’च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना संपर्क करून ‘हा प्लॉट कोणा बिल्डरला विकसित करण्यासाठी दिला आहे का, म्हणून विचारणा केली. त्यावेळी त्यांनी ‘कल्याणमध्ये असा कोणताही प्लॉट विकसित करण्यासाठी दिला नसल्याचे सांगितले. मग एका बिल्डरने ‘म्हाडा’च्या जागेवर प्लॉट विकासाचा फलक लावला असल्याचे आ. भोईर यांनी छायाचित्रासह दाखविल्यानंतर अधिकाऱ्याने स्थानिक अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून तात्काळ तो फलक काढण्याचे आदेश दिले. ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांचे हे रॅकेट असल्याचे लक्षात आल्यानंतर आ. भोईर यांनी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्याशी संपर्क साधून या प्लॉटविषयी माहिती विचारली. त्यावेळी अहिर यांनी ‘म्हाडा’च्या अधिकाऱ्यांना तात्काळ त्या प्लॉटवरील फलक काढण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. स्थानिक नागरिकांनी दाखविलेल्या हिमतीमुळे व आमदार प्रकाश भोईर यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे ‘म्हाडा’चा एक प्लॉट बिल्डरच्या घशात जाण्यापासून वाचला असल्याची चर्चा कल्याणमध्ये सुरू आहे.

Tuesday, May 11, 2010

मुंबईच्या पाण्यात राज ठाकरे यांची उडी

म टा च्या सौजन्याने ......


11 May 2010, 1142 hrs IST

कुणाचे रक्त काढून घेण्यापेक्षा पाणीप्रश्नासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर लक्ष द्या.. असा उपदेश करण-या राज ठाकरे यांनी आज मुंबईच्या पाणीप्रश्नामध्ये थेट लक्ष घातले. महापालिका आयुक्तांची भेट घेऊन हा प्रश्न कसा सोडवता येईल यावर सविस्तर चर्चा केली.

काही दिवसांपूर्वी नवी मुंबईला जाताना राज ठाकरे यांनी वाटेत पाणीचोरी पकडून दिली होती. त्यादिवसानंतर राज यांनी पाणीप्रश्नावर आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली असून आज त्यांनी या आंदोलनाबद्दल आयुक्तांना भेटून आपली भूमिका स्पष्ट केली. मंगळवारी सकाळी राज यांनी मुंबई महापालिकेत येऊन आयुक्त स्वाधीन क्षत्रीय यांना मनसेतर्फे प्रस्ताव सादर केला.

या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना राज म्हणाले, की दिवसेंदिवस मुंबईचा पाणीप्रश्न बिकट होत चालला आहे. शहराला पाणीपुरवठा करणा-या तलावांमध्ये असलेला पाणीसाठा कमी होत चालला आहे. जर पावसाळा लांबला तर पाणीटंचाई जीवघेणी ठरू शकते. त्यामुळे याबाबत आत्ताच काहीतरी करणे आवश्यक असल्याने आम्ही ही भेट घेतली.

मुंबईत जा पाऊस पडतो ते पाणी अक्षरशः गटारामध्ये वाया जाते. हे पाणी आपण वाचवू शकलो तर मुंबईच्या पाणीटंचाईवर निश्चित स्वरुपात मात करता येईल. ' रेन वॉटर होर्वेस्टिंग ' हा अत्यंत सोपा आणि परिणामकारक उपाय प्रत्येकाने राबवण्याचा आग्रह महापालिकेने धरावा अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आल्याची माहिती यावेळी राज यांनी दिली.

शहारातील प्रत्येक इमारतीमध्ये ही यंत्रणा अमलात आणायला हवी. महापालिकेच्या मैदानांमध्येही ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबविता येईल. त्यासाठी मनसे पक्ष म्हणून जे जे काही करता येईल. सध्या मुंबईत टँकरमाफियांचे राज्य सुरू असून विहिरीतल्य पाण्यासाठी लोकांची लूट केली जात आहे. ती रोखण्यासाठी पाण्याचा नियमित पुरवणा हेच उत्तर ठरेल असे राज यांनी स्पष्ट केले.

मनसेने राखला सेनेचा गड

आम्ही मनसे ने शिवसेनेला केलेल्या मतदानाचे समर्थनच करतो .... हाच अंकुश राजसाहेबांना हवा होता ... ह्या अंकुशाच्या सहायाने अंबरनाथ चा विकास व्हावा हीच इच्छा ...

आपला

विनोद


म टा च्या सौजन्याने ......


11 May 2010, 0333 hrs IST

मराठी अस्मितेच्या मुद्द्यासाठी एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकणाऱ्या शिवसेना आणि मनसेने अंबरनाथ नगरपरिषदेतील नगराध्यक्षाच्या निवडणुकीत एकमेकांच्या गळ्यात गळे घालून एक नवा अध्याय सुरू केला आहे. या निवडणुकीत मनसेची भूमिका महत्त्वाची ठरली असली तरी त्यांचे नगरसेवक तटस्थ राहतील किंवा काँग्रेसच्या पारड्यात आपले मत टाकतील, असे दावे केले जात होते. मात्र, ते सारे दावे खोटे ठरवत मनसेच्या मदतीने शिवसेनेचे सुनील चौधरी नगराध्यक्ष झाले आहेत.

गेली १५ वषेर् अंबरनाथ नगरपरिषदेवर शिवसेनेची सत्ता आहे. परंतु, गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला बहुमत मिळविता आले नाही. शिवसेना-भाजप युतीपेक्षा (१६) काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे (२०)जास्त उमेदवार निवडून आल्याने त्यांना सत्ता स्थापन करण्याची संधी जास्त होती. परंतु, निवडून आलेल्या सात अपक्षांपैकी एकालाही आपल्या बाजूने वळविण्यात काँग्रेस आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना यश आले नाही. त्याउलट शिवसेनेचे जिल्हा संपर्क नेते आ. एकनाथ शिंदे, नरेश म्हस्के, आनंद परांजपे यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन शिवसेना, मनसे आणि अपक्षांची मोट बांधून पुन्हा सत्ता प्रस्थापित करण्याचा चमत्कार करून दाखविला आहे. मनसेने मदत केली नाही तर राष्ट्रवादीच्या काही नगरसवेकांना मतदानास गैरहजर राहून शिवसेनेला सत्तास्थानी पोहोचवण्यात मदत करण्याचा प्लॅनही आखण्यात आला होता. मात्र, मनसेनेच मदत केल्याने शिवसेनेचे काम सोपे झाले. ५० नगरसेवकांच्या अंबरनाथ नगरपरिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी २६ नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज आहे. शिवसेनेच्या चौधरी यांनी ३० मते मिळविली.

शिवसेना आणि मनसे यांचे संबंध विळ्या-भोपळ्याचे आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे वादही विकोपाला गेले आहेत. अशा परिस्थितीत मनसे शिवसेनेसोबत जाणे केवळ अशक्य असल्याचे दावे काँग्रेस आघाडीच्या नेत्यांकडून केले जात होते. मनसेची भूमिका अंबरनाथ नगराध्यक्षाच्या निवडणुकीत महत्त्वाची असली तरी त्यांना काँग्रेस आघाडीशिवाय पर्याय नाही, अशा भ्रमात आघाडीचे नेते होते. परंतु, सोमवारी मनसेने हा भ्रमाचा भोपळा फोडला. 'आम्ही काँग्रेसच्या मागे फरफटत जाऊ, असा त्यांचा समज होता. परंतु, आम्हाला कुणीही गृहित धरू नये, हे आम्ही दाखवून दिले आहे', असे मनोज चव्हाण यांनी सांगितले.

अंबरनाथचा विकास या एकमेव मुद्द्यावर मनसेने शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केल्याची माहिती मनसेचे नेते मनोज चव्हाण यांनी सांगितले. मनसेचे निवडणुकीपूवीर् शहराच्या विकासाचा एक जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. या जाहीरनाम्यानुसार शहरात कामे करावीत, अशी अटही शिवसेनेला पाठिंबा देण्यापूवीर् मनसेने घातल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. अंबरनाथला नाट्यगृह, खेळासाठी मैदाने, बागा, अंबरनाथ पूवेर्ला स्मशानभूमी अशी मनसेने आश्वासन दिलेली अनेक कामे त्यामुळे मागीर् लागतील, असे चव्हाण यांनी सांगितले. मनसेने शिवसेनेला मतदान केले असले तरी मनसेचे नगरसेवक सत्तेतील कोणतेही पद घेणार नाहीत. आम्हाला दिलेल्या आश्वासनानुसार शिवसेनेने काम केले नाही तर त्यांचा पाठिंबा काढून घेण्याचा पर्याय आमच्याकडे आहे, असेही त्यांनी सांगितले.


Monday, May 10, 2010

क्षमस्व !!! ब्लॉगर मेळाव्याला उपस्थित न राहील्याबद्दल

बरेच दिवसापासून ब्लॉगर मेळाव्याची वाट बघत होतो पण काही अपरिहार्य कारणाने ब्लॉगर्स मेळाव्याला उपस्थित राहू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व. महेंद्र, रोहन आणि कांचन ह्यांनी ह्या मेळाव्याचे यशस्वी आयोजन केल्या बद्दल त्यांचे अभिनंदन. पुन्हा एकदा तुमची क्षमा मागून रजा घेतो .....

विनोद
मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा


Wednesday, May 5, 2010

शिवसेना, भाजपने बदलला ट्रॅक

खालील बातमी म टा च्या सौजन्याने ......

विनोद


म. टा. खास प्रतिनिधी मुंबई
5 May 2010, 0432 hrs IST

उपास... आधी पास, मग नापास

लक्षावधी मुंबईकरांना वेठीस धरणाऱ्या मोटरमेनचे उपास आंदोलन आधी 'पास' ठरवून नंतर 'नापास' ठरवण्याचा चमत्कार शिवसेना तसेच भारतीय जनता पक्षाने साधला असला तरी अचानक ट्रॅक बदलूनही प्रवाशांची टीकाच झेलण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

रेल्वे मोटरमेनचे आंदोलन मुळात सुरू झाले ते शिवसेच्या पुढाकाराने. नंतर त्यात भारतीय जनता पक्षानेही उडी घेतली. आंदोलनर्कत्या मोटरमेनना भेटून त्यांच्या मागण्यांचे समर्थन करण्याइतपत त्यांची गाडी पुढे गेली होती. मात्र या आंदोलनामुळे लक्षावधी मुंबईकरांचे शिव्याशाप मोटरमेनना मिळत असल्याचे चित्र सोमवारी रात्रीपासूनच दिसू लागले. त्याचे स्वच्छ प्रतिबिंब मंगळवारी मीडियात उमटले आणि सर्वप्रथम शिवसेनेने मोटरमेनच्या पाठिंब्याचा झेंडा खाली खेचला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तसे निवेदनच जारी केले. मोटरमेननी संप तत्काळ मागे घ्यावा व रेल्वे गाड्या पूर्ववत रुळांवर आणून जनतेचे हाल थांबवावेत, असे आवाहन त्यांनी केले. आपण स्वत: जनतेच्या बाजूने असून मोटरमेनच्या संपाला शिवसेनेचा पाठिंबा नाही, असे त्यांनी स्पष्ट केलेे.

रेल्वे गाड्या म्हणजे मुंबईची लाइफलाइन. मोटरमेन संपामुळे ही लाइफलाइनच कोलमडली. मोटरमेनच्या मागण्या कितीही न्याय्य असल्या तरी जनता अफाट आहे, अथांग आहे. त्या जनतेचा विचार सर्वप्रथम करावा लागेल. जनता खवळल्यास संपूर्ण प्रकारास घाणेरडे वळण लागेल व महाराष्ट्राचे मोठे नुकसान होईल, असे शिवसेनाप्रमुखांचे निवेदन सांगते. मी फक्त जनतेच्याच बाजूचा असून मला सध्या सुरू असलेले जनतेचे हाल पाहवत नाहीत. खास करून जनतेसाठी व रेल्वे मोटरमेनना हवे असल्यास त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी मी सरकारशीही दोन हात करीन, अशी ग्वाहीही शिवसेनाप्रमुखांनी त्यात दिली.

शिवसेनाप्रमुखांच्या या आदेशाची माहिती कळताच संसदेत शिवसेनेच्या खासदारांनी केंद सरकारवर तोंडसुख घेतले. याच आंदोलनर्कत्यांना पक्षाने केवळ काही तासांपूवीर् पाठिंबा दिला होता, या भावनेचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता!

महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी उपास आंदोलनाला पाठिंबा दिला असताना, संसदेतील या पक्षाचे उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी रेल्वेमंत्री ममता बॅनजीर् याच जणू आंदोलनास जबाबदार असल्याच्या अविर्भावात त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. नंतर संसदेबाहेरही युतीचे खासदार असाच सूर आळवीत होती.




Tuesday, May 4, 2010

ठाणे, कल्याणमध्ये मनसेचं आंदोलन

स्टार माझा च्या सौजन्याने .......

हि बातमी खालील लिंक वर देखील मिळू शकेल


विनोद


दुपारपर्यंत संप बंद करा, नाही तर संध्याकाळी मनसे मोटरमन्स विरोधात आंदोलनात उतरेल असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. मनसेने सीएसटी स्थानकात दुपारी दोननंतर जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर ठाण्याच्या स्टेशन मास्तरांना त्यांच्याच कार्यालयात मनसेच्या कार्यकर्त्यांकडून घेराव घालण्यात आला. कल्याण रेल्वे स्टेशनवरही मनसे कार्यकर्त्यांनी ठिय्या टाकला आहे. जोपर्यंत लोकल सुरू होत नाही तोपर्य़ंत स्टेशन मास्तरांना कुठेही जाऊ देणार नसल्याचं मनसे्च्य़ा कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. राज ठाकरेंनी आपल्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर मनसेने आंदोलन सुरू केलं आहे.

राज ठाकरे यांचा मोटरमनना इशारा

ज्या पद्धतीने मोटर मनने मुंबई करांना वेठीस धरले आहे ते बघून तर कोणीही मुंबई कर संतप्त होणारच ..... काल सकाळी त्यांनी लोकल चालू दिल्या आणि घरी जाताना बंद केल्या .... ह्यांना कल्पना आहे का कि लोकांना त्याचा किती त्रास होतो? .... आता काही नाही जर ह्यांनी आंदोलन बंद नाही केले तर धरून मारा .... अजून काय, किती वेळ लोकांच्या सहन शीलतेचा अंत बघणार हे लोकं ????

खालील बातमी सकाळ च्या सौजन्याने ......

विनोद


सकाळ वृत्तसेवा

मुंबई- मोटरमनने पुकारलेला संप अत्यंत चुकीचा असून, त्यांनी संध्याकाळपर्यंत संप मागे घेतला नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोटरमनच्या विरोधात आंदोलनास उभा राहील. असा सज्जड इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) दिला. मोटरमनच्या मागण्या कितीही रास्त असल्या, तरी आंदोलनाची ही पद्धत चुकीची आहे, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

या विषयावर बोलण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. मोटरमन यांच्या संपाव्यतिरिक्त कोणत्याही अन्य विषयावर बोलणे त्यांनी या वेळी टाळले.

ठाकरे म्हणाले, मोटरमनच्या मागण्यांविषयी आम्हालाही सहानुभुती आहे. पण, आपल्या मागण्या मांडण्यासाठी प्रवाशांना वेठीस धरणे योग्य नाही. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत मोटरमननी आपला संप मागे घ्यावा. अन्यथा मोटरमनच्या विरुद्ध मनसे आंदोलनाला उभा राहील. सरकारनेदेखील कठोर पावले उचलून रेल्वे सेवा सुरळित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. ताब्यात घेतलेल्या १७० मोटरमनना संध्याकाळपर्यंत कामावर हजर राहण्यासाठी सोडून दिले पाहिजे.

मोटरमननी एक महिन्यापूर्वी रेल्वे प्रशासनाला नोटीस दिली होती. मात्र, त्याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही, याबाबत विचारता ठाकरे यांनी सरकारला त्यांच्या जबाबदारीची आठवण करून दिली. सरकारने वेळीच लक्ष घातले असते, तर आजची परिस्थिती उद्‌भवली नसती, असे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र, अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्यांनीदेखील याचा विचार केला पाहिजे. त्यांच्यावर सरकारने चाप लावला पाहिजे, जेणेकरून अशाप्रकारची अडवणूक थांबेल, असे ते म्हणाले.


Monday, May 3, 2010

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सर्व महाराष्ट्र वासियांना "मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा तर्फे" महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा